काम करण्यास पद नव्हे, इच्छाशक्ती महत्वाची
सभापती रमेश तवडकर यांचे मत
पणजी : एखादे काम करण्यासाठी इच्छाशक्ती महत्वाची असते. त्यासाठी पदाची आवश्यकता नसते किंवा एखादे पद असेल तरच आपण काम करू शकतो, असाही प्रकार नसतो. त्यामुळे सध्या आहे त्या पदावर समाधानी आहे. तरीही भविष्यात पक्षश्रेष्ठींनी वेगळी जबाबदारी दिली तर ती स्वीकारेन, असे प्रतिपादन सभापती रमेश तवडकर यांनी केले. मंगळवारी पणजीत एका कार्यक्रमादरम्यान ते पत्रकारांशी बोलत होते. लवकरच मंत्रीमंडळात फेरबदल होण्याची वंदता असून त्यात आपणाला मंत्रीपद देण्यात येईल अशीही चर्चा असल्याबद्दल विचारले असता, तवडकर यांनी वरीलप्रमाणे प्रतिपादन केले. खरे तर विद्यमान पदावर दोन वर्षांसाठी आपली वर्णी लावण्यात आली होती. तो कार्यकाळ पूर्ण झाला आहे. तरीही आपण कोणतीही मागणी केलेली नाही. कारण आपण आपले समाजकारण चालूच ठेवले आहे. सर्वात महत्वाचे म्हणजे हे एक पवित्र पद आहे. तेथे कुणीही तुमच्या चारित्र्यावर संशय घेऊ शकत नाहीत. डाग लावू शकत नाही. आरोपही करू शकत नाहीत. आपण बरे की आपले काम बरे, या न्यायाने याच पदावर समाधानी राहून पुढील काम करत राहणार आहे, असे तवडकर यांनी पुढे सांगितले.
आयआयटी, फिल्म सिटीचे स्वागतच
काणकोणमध्ये आयआयटी प्रकल्प व्हावा ही तेथील कोमुनिदाद, नागरिक यांच्याबरोबरच आपलीही इच्छा आहे. आम्ही त्याचे स्वागतच करू असे तवडकर म्हणाले. त्याशिवाय लोलये पठारावर फिल्म सिटी प्रकल्पही प्रस्तावित आहे. हे दोन्ही प्रकल्प सत्यात आल्यास स्थानिकांसाठी मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असा विश्वास तवडकर यांनी व्यक्त केला.