कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मन आणि बुद्धी ईश्वराला अर्पण करणे सहज शक्य होत नाही

06:25 AM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

माणसाच्या मनात असंख्य विचार येत असतात. त्यापैकी बहुतेक विचार नकारात्मक असतात. कारण परिस्थिती प्रतिकूल झाली की, आपलं कसं होणार ही चिंता त्याला सतत भेडसावत असते आणि बुद्धी त्या विचारांना खतपाणी घालत असते. भक्ताची त्यातून सुटका व्हावी आणि त्याचे मन ईश्वर भक्तीकडे लागावे म्हणून बाप्पा म्हणतायत, मन आणि बुद्धी मला अर्पण करा म्हणजे तुम्ही आपोआपच मला येऊन मिळाल, ह्या अर्थाचा अतो भक्त्या मयि मनो विधेहि बुद्धिमेव च । भक्त्या यजस्व मां राजंस्ततो मामेव यास्यसि ।। 10 ।। हा श्लोक आपण अभ्यासत आहोत. बाप्पा म्हणतात, मन आणि बुद्धी तुम्ही माझ्या चरणी अर्पण केलीत की, मी तुम्हाला दैवी बुद्धी देतो. त्यामुळे तुम्ही माझ्या विचारानं पुढे जाऊ लागाल आणि माझं सगुण रूप होऊन जाल. म्हणून करूणाष्टकात समर्थ श्रीरामांना विनवतात, रघुपति मति माझी आपुलीशी करावी. रामा माझी बुद्धी तुझ्यासारखी कर म्हणजे माझी वर्तणूक तुझ्याबरहुकूम होईल. रामाची वर्तणूक आदर्श मानली जाते. कारण ज्याच्याबरोबर जसं वागायला पाहिजे त्याप्रमाणे राम आयुष्यभर वागलेला आहे. असं जरी असलं तरी मन आणि बुद्धी ईश्वरार्पण करणं हे सहजसाध्य नाही हे बाप्पा जाणून आहेत. मन, बुद्धी व अहंकार यांची युती झाली की, मनुष्य स्वत:ला कर्ता समजू लागतो. आपण म्हणू तीच पूर्व दिशा हे सगळ्यांनी मान्य करावं असं त्याला वाटू लागतं, जोडीला अभिमान असतोच. अभिमान म्हणजे मीच सर्व काही करू शकतो अशी खात्री वाटणं व अहंकार म्हणजे माझ्यासमोर इतर सर्व तुच्छ आहेत अशी अहंमान्यतेची वागणूक इतरांना देणं. इतरांचं काहीही ऐकून न घेता आपलाच हेका चालवणं. इत्यादि गोष्टी अहंकारी व्यक्तीच्या हातून सहजी घडू शकतात कारण स्वत: म्हणजेच सर्व जग असं त्यांना वाटत असतं. हा अहंकार सत्तेचा, पैशाचा, विद्ववत्तेचा व विशेष म्हणजे साधनेचासुद्धा असू शकतो. भल्याभल्यांची या अहंकाराने वाट लावली आहे. अहंकाराने तमोगुणाची वृद्धी होते व मनुष्य ईश्वरी कृपेपासून दूर दूर जाऊ लागतो. म्हणून असं म्हणतात की, बुद्धीच्या बळावर मोठमोठ्या ज्ञानी पंडितांना ईश्वराचं स्वरूप समजू शकेल पण ते त्याची भक्ती करत नसतील तर त्यांना ईश्वराची प्राप्ती होत नाही. त्याहून गम्मत म्हणजे त्यांनी त्यांच्या प्रवचनातून ईश्वरी स्वरूपाच्या केलेल्या वर्णनानुसार, त्यांनी सांगितलेल्या भक्तांच्या कथा ऐकून अडाणी भोळे भक्त मनापासून ईश्वराची भक्ती करू लागतात व त्यांना ईश्वरप्राप्ती होऊन जाते पण हे पंडित मात्र ज्ञानाच्या अहंकारामुळे ईश्वरीस्वरूप लक्षात येऊन सुद्धा त्याच्या प्राप्तीपासून वंचित राहतात. आपल्या भक्ताचं असं होऊ नये म्हणून बाप्पा कटाक्षाने भक्ताच्या मन व बुद्धीची मागणी करत आहेत. मन व बुद्धी ईश्वरार्पण केली की, भक्त स्वत:चा रहातच नाही तो केव्हाच ईश्वरी स्वरूपात मिसळून जातो. भक्तानं त्यासाठी प्रयत्न सुरु केले की, बाप्पांना त्याचं खूप कौतुक वाटतं व मन व बुद्धी त्याला ईश्वरार्पण करणं सोपं जावं म्हणून ते त्याला पुढील श्लोकात उपाय सुचवतात तो असा, असमर्थोऽ र्पितुं स्वान्तं एवं मयि नराधिप । अभ्यासेन चे योगेन ततो गन्तुं यतस्व माम् ।। 11 ।।

Advertisement

अर्थ-हे राजा, याप्रकारे माझे ठिकाणी मन अर्पण करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास व योग यांचे योगाने मजकडे येण्याचा प्रयत्न कर.

Advertisement

विवरण-मन व बुद्धी माझ्याचरणी अर्पण करण्यास असमर्थ असशील तर अभ्यास आणि योग यातून माझ्याशी जवळीक साधायचा प्रयत्न कर असा उपदेश बाप्पा करत आहेत. एकदा भक्त बाप्पांना सन्मुख झाला की, त्याचं अत्यंतिक कल्याण कसं होईल याची सर्व काळजी बाप्पा घेतात. सविस्तर पाहुयात पुढील भागात ..

क्रमश:

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article