तलवारी पलीकडचे शिवराय समजून घेणे आवश्यक परंतु शिवरायांची तलवार तरी समजली का?: श्री मृण्मय अरबुणे
वाई : तलवारी पलीकडचे शिवराय समजून घेणे आवश्यक परंतु शिवरायांची तलवार तरी समजली का असा प्रश्न श्री मृण्मय अरबुणे यांनी केला. लोकमान्य टिळक स्मारक संस्था संचालित वाई वसंत व्याख्यानमालेच्या द्वितीय पुष्पात शिवछत्रपतींची शस्त्रास्त्रे या विषयावर ते बोलत होते. यावेळी श्री आनंद पटवर्धन हे अध्यक्षस्थानी होते. अरबुणे म्हणाले मानवी उत्क्रांतीतून अश्मयुगात अवजारे निर्माण झाली मात्र शस्त्रे संघर्षातून निर्माण झाली. भारतीय प्राचीन ग्रंथांतील धनुर्वेदात शस्त्रास्त्रांचा तांत्रिक व वैज्ञानिक दृष्टिकोन सांगितला आहे. शिवरायांकडे तीन तलवारी होत्या. या तलवारीची उंची साधारण चार फूट असावी.
जगदंबा तलवार जी सध्या लंडनमध्ये आहे. ही तलवार कोल्हापूरच्या छत्रपती शिवाजी महाराजांनी ( चौथ्या) वेल्स चा राजकुमार एडवर्ड (सातवा) यास भेट दिली होती. दुसरी म्हणजे सर्वपरिचित भवानी तलवार. भवानी मातेने स्वतः छत्रपतींना ही तलवार दिल्याची दंतकथा प्रसिद्ध आहे मात्र प्रत्यक्षात छत्रपतींनी कोकणाच्या स्वारी दरम्यान गोयलकर सावंतांना ३०० होण व मानाची वस्त्रे देऊन ही तलवार घेतली होती. हिचा वापर प्रतापगडच्या युद्धात झाला. तिसरी तुळजा तलवार ही शिवरायांना शहाजी राजांनी जेजुरीच्या भेटीदरम्यान दिली होती. या तलवारीच्या म्यानावर हनुमान व गरुडाचे कोरीव काम आहे.
तुळजा तलवार ही सध्या सिंधुदुर्ग किल्ल्यावरील शिवराजेश्वर मंदिरात स्थित आहे. काही काळ साताऱ्यात ठेवण्यात आलेली व सध्या नागपूर मध्ये असणारी शिवछत्रपतींची वाघनखे शिवरायांच्या मुत्सद्दीपणाचे प्रतीक आहेत. रवींद्र परमानंदांचे शिवभारत, कृष्णाजी अनंत सभासदांची बखर व जेधे शतावली यांत वाघनखाचे उल्लेख सापडतात. पन्हाळ्याच्या युद्धात डोंगर चढण्यासाठी मराठ्यांनी वाघनखांचा वापर केला होता.नुकतीच राज्यशस्त्र म्हणून मान्यता मिळालेले पट्टा हे शस्त्र शिवरायांनी अनेकदा वापरले. वाणी दिंडोरीच्या लढाईत शिवरायांनी घोड्यावर बसून दोन्ही हातात पट्टे घेऊन युद्ध केल्याचे उल्लेख सापडतात.
सध्या अनेकांसाठी अपरिचित असणारे बुर्ज हे अतिदुर्लक्षित गदे सारखे भासणारे शस्त्र शिवरायांकडे होते असे चित्रगुप्त बखर सांगते. शिवरायांच्या बुर्जाचे नाव शंभूप्रसाद होते. हवामान ,भूभाग यांवर शस्त्रे निर्धारित असतात. शिवाजी महाराजांनी स्वतःच्या राज्य निर्मितीसाठी स्वतःची शस्त्रे देखील निर्माण केली. अरबुणे यांनी तलवारी, खंजीर, बिचवे , धनुष्य भाले, शिरस्त्राण ,चिलखते, कट्यारी आदी शस्त्रांची व शिवरायांनी केलेल्या त्यांच्या वापराची माहिती दिली. तसेच प्रतापगडची लढाई, वाणी दिंडोरीची लढाई, कांचनबारीची लढाई, उंबरखिंडीची लढाई आदींत महाराजांची शस्त्रे व युद्धात त्यामुळे पडलेला प्रभाव स्पष्ट केला.
तसेच शिवछत्रपतींच्या चित्रांच्या माध्यमातून सोन्याचा दांडपट्टा, वराहमुखी पट्टा, मोती असणारी तलवार आदि प्रेक्षकांना दाखवले. शिवछत्रपतींविषयी व त्यांच्या शस्त्रांविषयी असणाऱ्या दंतकथांचे निवारण केले. तसेच चित्रपटांत दाखवण्यात आलेल्या चुकीच्या शस्त्रास्त्र मांडणी बद्दल खेद व्यक्त केला. डॉ. लता पाटील यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले तसेच श्री. शिवाजी कदम यांनी प्रमुख अतिथींचा परिचय करून दिला. डॉ. लता पाटील व डॉ. प्रशांत पोळ यांनी कार्यक्रमाचे प्रायोजन केले होते. शिवप्रेमींनी व्याख्यानमालेस उपस्थिती लावली होती.