मलप्रभा नदी पात्राची खोली वाढवणे गरजेचे
आमदार विठ्ठल हलगेकर यांच्याकडून पाठपुराव्याची गरज : उन्हाळ्यात पाणीप्रश्न गंभीर बनण्याचा धोका, पाणी अडवण्यापूर्वीच कारवाई आवश्यक
खानापूर : खानापूर शहराजवळून वाहणाऱ्या मलप्रभा नदीतून पाणीपुरवठा योजनेद्वारे शहराला पाणीपुरवठा करण्यात येतो. यासाठी नव्याने बांधण्यात आलेल्या ब्रिजकम बंधाऱ्याच्या ठिकाणी पाणी अडवण्यात येते. मात्र या ठिकाणी गेल्या सहा-सात वर्षात मोठ्या प्रमाणात वाळू साठल्याने नदीपात्राची खोलीच कमी झाली आहे. यासाठी ब्रिजकम बंधाऱ्यापासून जॅकवेलपर्यंत नदीपात्राची खोली वाढवणे गरजेचे आहे. मात्र याबाबत नगरपंचायत तसेच पाटबंधारे खाते यांचे साफ दुर्लक्ष होत असल्याने मार्च महिन्यानंतर शहराचा पाणीप्रश्न गंभीर बनत आहे. यासाठी पाणी अडवण्याअगोदरच नदीची खोली वाढवणे गरजेचे आहे.
शहराच्या पाणीप्रश्न सोडवण्यासाठी तत्कालीन आमदार प्रल्हाद रेमाणी यांनी जुन्या चौदा मुशीच्या पुलाजवळ ब्रिजकम बंधाऱ्याची निर्मिती केली. मात्र योग्य नियोजनाअभावी या ठिकाणी पाणी साठण्याची क्षमता अवघ्या सहा वर्षातच कमी झाली आहे. यामागे दोन्हीकडील घाट तसेच बंधाऱ्यांचे योग्य नियोजन नसल्याने या ठिकाणी अवघ्या सहा वर्षातच मोठ्या प्रमाणात गाळ आणि वाळू साचल्याने नदीपात्राची खोलीच एकदम कमी झाली आहे. त्यामुळे पाण्याच्या साठवणूक क्षमतेवर परिणाम झालेला आहे.
मार्च महिन्यातच मलप्रभेचे पात्र कोरडे पडते. नवीन ब्रिजकम बंधारा बांधत असताना तो फक्त 16 फूट उंचीचा बांधण्यात आला आहे. पहिल्या चार वर्षात मोठ्या प्रमाणात पाणी साठवणूक होत होती. मात्र गाळ आणि वाळू पात्रात साचत असल्याने बंधाऱ्याच्या दक्षिण बाजूला मोठ्या प्रमाणात वाळू आणि गाळ जमा झाल्याने बंधाऱ्याच्या उंचीबरोबरच वाळू जमा झाल्याने पाणी साठवण्याची क्षमता कमी झाली आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्याप्रमाणात पाऊस होऊनदेखील लवकरच पात्र कोरडे पडण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यासाठी नव्या ब्रिजकम बंधाऱ्यापासून ते जॅकवेलच्या पुढे पाचशे मीटरपर्यंत नदीपात्राची खोली वाढवणे गरजेचे आहे.
पाटबंधारे खात्याकडून याबाबत पाठपुरावा होणे गरजेचे आहे. यासाठी आतापासूनच नियोजन करून पाणी अडवण्यापूर्वी नदीपात्राची खोली वाढवण्यासाठी शासकीय पातळीवर प्रयत्न करणे गरजेचे आहे. पात्राची खोली वाढवण्यासाठी जिल्हाधिकारी, भूगर्भ विभाग यांची परवानगी आवश्यक आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी पाटबंधारे खाते, जिल्हाधिकारी आणि भूगर्भ खात्यांशी तातडीने संपर्क साधून मलप्रभा नदीची खोली वाढवण्यासाठी पाठपुरावा करणे गरजेचे आहे.
खानापूर-हल्याळ रस्त्यासाठी 21 कोटीचा निधी मंजूर
घाटाच्या ठिकाणी साठलेली वाळू काढून पात्र खोल करणे, तसेच हत्ती गुंड्याजवळील कातळ फोडून खोली वाढवणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे खानापूर शहरातून गेलेल्या खानापूर-हल्याळ रस्त्याचा विकास होणार आहे. यासाठी 21 कोटीचा निधी मंजूर झाला असून यात राजा टाईल्सपासून करंबळ क्रॉसपर्यंत सीसी रस्ता बनवण्यात येणार आहे. याचवेळी जॅकवेलजवळील असलेले पूल पाडवून नव्याने बांधण्यात येणार आहे. त्यावेळी जॅकवेलजवळील नदीपात्रातील कातळ फोडून खोली वाढवणे गरजेचे आहे. या पद्धतीने ब्रिजकम बंधाऱ्यापासून 1 कि. मी. मलप्रभा नदीची खोली वाढवल्यास पाणी मोठ्याप्रमाणात साठवणूक होऊन पाण्याचा प्रश्न बऱ्यापैकी मार्गी लागणार आहे. तालुक्यातील सध्या अस्तित्वात असलेल्या मलप्रभा नदीवर आमटे, मळव, देवाचीहट्टी, असोगा, खानापूर, कुप्पटगिरी साखर कारखाना, यडोगा असे बंधारे आहेत. या बंधाऱ्यांच्या वरील पात्रातील खोली वाढवून योग्य नियोजन करून पाणी अडवणे गरजेचे आहे. असे केल्यास पाणीसाठा मोठ्या प्रमाणात उपलब्ध होईल.
बंधाऱ्याची उंची किमान 22 फूट करणे आवश्यक
उन्हाळ्यात शहराला पाणीपुरवठा करण्यात येणाऱ्या जॅकवेलपासून ते नवीन बंधाऱ्यापर्यंत पूर्णपणे पात्र कोरडे पडते. त्यामुळे शहराला पाणीपुरवठा तीन-चार दिवसातून एकदा करण्यात येतो. तर एप्रिल-मे मध्ये पाणीपुरवठा पूर्णपणे बंद करण्यात येतो. यासाठी मलप्रभेच्या पाण्याचे योग्य नियोजन होणे गरजेचे आहे. यासाठी नदीपात्राची खोली वाढवणे आणि सध्या असलेल्या 16 फूट बंधाऱ्याची उंची किमान 22 फुटाच्या वर करणे गरजेचे आहे. यासाठी आमदार विठ्ठल हलगेकर यांनी तातडीने पाठपुरावा करून पाणीप्रश्न सोडवणे गरजेचे आहे.