For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

निरिच्छ होणे अगत्याचे आहे

06:18 AM Nov 26, 2025 IST | Tarun Bharat Portal
निरिच्छ होणे अगत्याचे आहे
Advertisement

अध्याय दुसरा

Advertisement

भगवंत म्हणाले, जिभेचे विषय प्रयत्नाने कमी करता येत नाहीत कारण त्यावाचून जगणे शक्य नाही पण जो साधक परब्रम्हाशी एकरूप होईल, त्याची रसनेंद्रियाची लालसा शिथिल होईल. ब्रह्म मीच आहे, हे अंगात भिनले की, शरीराचा विसर पडतो. त्यामुळे त्याला व्यवहाराचे भान रहात नाही. अशावेळी इंद्रियेही त्यांच्या कार्यातून निवृत्त होतात.

इंद्रियांच्या अफाट ताकदीबद्दल सांगताना भगवंत म्हणाले, सामान्य माणसाची गोष्ट तर सोडूनच द्या, बुद्धिमान व्यक्तीही इंद्रियांनी दाखवलेल्या प्रलोभनांना सहजी फशी पडतात. जोपर्यंत माणसाच्या इच्छा शिल्लक असतात तोपर्यंत बुद्धिमान व्यक्तीने कितीही प्रयत्न केला तरी बलवान इंद्रिये त्याचे मन जबरदस्तीने विषयांकडे ओढतात आणि त्याला त्यांचा मोह पाडतात. त्याने त्यांचा उपभोग घ्यावा म्हणून त्याला विविध प्रलोभने दाखवून विवश करतात. त्यामुळे विषयांचा उपभोग घ्यावा अशी अतीव इच्छा झाली की, इंद्रिये क्रियाशील होऊन त्या विषयांची अधिक माहिती पुरवू लागतात. त्यामुळे योग्याचे मन त्यात गुरफटून जाते. कचाट्यात सापडलेला योगी त्या आकर्षणांना बळी पडतो. इंद्रियांचा जोर हा असा असतो. म्हणून माणसाने एखाद्या विषयाची इच्छा होऊ लागली की, त्याने सावध होऊन तिला आवर घालावा. पुढील श्लोकात भगवंत म्हणाले, कर्मयोगी साधकाने सर्व इंद्रियांना वश करून मन माझ्यात स्थिर करावे. ज्याने इंद्रियांवर विजय मिळविला आहे, त्याची बुद्धी स्थिर झाली, असे समज.

Advertisement

त्यास रोधूनि युक्तीने रहावे मत्परायण । इंद्रिये जिंकिली ज्याने त्याची प्रज्ञा स्थिरावली ।। 61 ।।

माणसाने एखादी गोष्ट अगदी मनापासून करायची ठरवली ना की, तो ती केल्याशिवाय मागे हटत नाही, हे व्यवहारात आपण बऱ्याचवेळा पाहतो. परमार्थातही माणसाला काही मिळवायचे असेल तर त्यात त्याचा मनापासून सहभाग हवा. अमुक एक गोष्ट केल्याने आपले भले होणार आहे हे लक्षात आले की, मनुष्य ती गोष्ट मनापासून करतो. म्हणून श्लोकाच्या विवरणात माउली म्हणतात, भगवंतांनी अर्जुनाला असे सांगितले की, अर्जुना अंत:करणापासून विषयांबद्दल वाटणारी ओढ किंवा आसक्ती सोडली की, त्या विषयांच्या उपभोगांची इच्छा कमी होते. इच्छा कमी झाली की, या इंद्रियांचे सर्वतोपरी दमन होऊन इंद्रियांवर विजय मिळवता येतो. मग ती आपल्या स्वाधीन होऊन आपण ज्याची इच्छा करू त्याच विषयांची माहिती आपल्याला पुरवतात.

दिसताना ही गोष्ट अगदी कठीण वाटते पण रोजच्या व्यवहारात आपण आपली आवड जोपासण्यासाठी इंद्रियांवर ताबा मिळवत असतो. उदाहरणार्थ, समजा आपण टीव्हीवर आपली आवडती मालिका अगदी तल्लीन होऊन पहात आहोत. त्याचवेळी बाहेरून कुणीतरी येऊन आपल्याला काहीतरी सांगू लागला तरी आपले कान आपल्या इच्छेनुसार मालिकेतील व्यक्तींची संभाषणे ऐकण्यात गुंतले असल्याने ते बाहेरून आलेल्या व्यक्तीने काय सांगितले आहे ते ऐकून आपल्याला ती माहिती पुरवण्यास असमर्थ असतात. म्हणजेच कानाने काय ऐकायचे हे आपण ठरवलेले असते आणि ते त्याबरहुकूम त्यांचे काम करत असतात.

म्हणून माउली म्हणतात, ज्याच्या हे लक्षात आले आहे की, योगनिष्ठ होण्यातच आपले भले आहे त्याचे अंत:करण विषयसुखांना भुलत नाही. योगनिष्ठाचे अंत:करण आत्मज्ञानाने परिपूर्ण भरलेले असते, त्यामुळे तो मला कधीच विसरत नाही. त्यासाठी निरिच्छ होणे अगत्याचे आहे. तसे न होता साधकाने वरवर विषयाचा त्याग केलेला असेल पण मनात जर विषयाची थोडीशीही त्यांची उपभोगण्याची लालसा असेल, तर मात्र त्याला संसाराची बंधने जखडून ठेवतात.

क्रमश:

Advertisement
Tags :

.