For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Solapur News | औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम अंगीकारणे गरजेचे : पंतप्रधान नरेंद्र मोदी

04:46 PM Oct 09, 2025 IST | NEETA POTDAR
solapur news   औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये व्यवसाय अभ्यासक्रम अंगीकारणे गरजेचे   पंतप्रधान नरेंद्र मोदी
Advertisement

 आयटीआयमधील अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन प्रणालीने उद्घाटन

Advertisement

सोलापूर : वाढती लोकसंख्या आणि त्यासोबत तरुणांना मोठ्या प्रमाणावर रोजगार देण्याचे आव्हान पेलण्यासाठी सर्व औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये असलेल्या पायाभूत सुविधांचा पुरेपूर वापर करून अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम अंगीकारणे ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

येथील विजयपूर रोडवरील महात्मा बसवेश्वर आयटीआय महाविद्यालयात सुरु करण्यात आलेल्या अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते बुधवारी मुंबई येथून ऑनलाईन प्रणालीने करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती होती.

Advertisement

तरुणांमधील शिकण्याची उर्मी आणि वाढत्या औद्योगिकरणाची गरज यांचा ताळमेळ बसवण्यासाठी अल्पमुदतीचा अभ्यासक्रम हा एकमेव पर्याय आहे. अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमातून केवळ रोजगार व शिक्षण हाच हेतु नसून, यापूर्वी घेतलेल्या शिक्षण व प्रशिक्षणाला आधुनिक तंत्रज्ञानाची जोड देऊन स्वतः ला सदैव काळाच्या पुढे ठेवण्याचेही हे प्रभावी माध्यम आहे.

एक रोजगारक्षम युवक हा समृद्धी आणि सामाजिक चेतनेचे वलय घेऊन समाजात वावरत असतो आणि या तरुणाईच्या उर्जेला साथ देण्यासाठी शासन व प्रशासन एकदिलाने काम करत असून त्यांच्या प्रयत्नांचे मूर्त स्वरूप म्हणजेच हे नव्याने सुरू होणारे आधुनिक तंत्रज्ञानाशी निगडित अल्पमुदतीचे व्यवसाय आहेत, याचा तरुणांनी पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले.

सोलापूर येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत या विशेष प्रसंगी शासनाच्या विश्वकर्मा योजनेचे लाभार्थी सुवर्णकार
सिद्धराम पोतदार यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात अभ्यास वर्गाचे फीत कापून औपचारिक उद्घाटन झाले. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एस. एस. नंदी होते.
सोलापुरातील कार्यक्रमात संस्थेचे प्राचार्य सुरेश भालचिम यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना म्हणाले, सध्या तीन अल्पमुदतीचे व्यवसाय अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आहेत.

त्यामध्ये १) दू कीलर सर्विस असिस्टंट, २) सी.एन.सी. ऑपरेटर व्ही.एम.सी. आणि ३) सोलर पीव्ही इन्स्टॉलर इलेक्ट्रिकल हे अभ्यासक्रम आहेत. आगामी काळात यामध्ये आणखी भर पडून एकूण बारा व्यवसाय अभ्यासक्रम सुरू होणार आहेत. अत्यल्प प्रशिक्षण शुल्क आकारून सुरू झालेल्या या अभ्यासक्रमामध्ये आधुनिक यंत्रसामुग्री, कुशल व अनुभवी प्रशिक्षक वर्ग यांच्या मदतीने दर्जेदार प्रशिक्षण दिले जाणार असल्याने त्याचा जास्तीत जास्त युवकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमास संस्था व्यवस्थापन समिती सदस्य दशरथ वहतिले उपस्थित होते.

यावेळी जिल्हा कौशल्य रोजगार मार्गदर्शन अधिकारी हनुमंत नलावडे, किर्लोस्कर उद्योग समूहाच्या सायली मंत्री, बरमैक्स इंजिनिअरिंग सोलापूरचे व्यवस्थापक किरण भिसे, अल्ट्राटेक सिमेंटचे एच.आर. मॅनेजर एस. एस. नंदी, स्वदर्श इंजिनिअरिंगचे व्यवस्थापक शंकर शिंदे, तसेच संस्थेतील वरिष्ठ गटनिदेशक सिद्राम गोलेकर, स्मिता शिंदे, निर्मला म्हेत्रे, अशोक मिरगणे, कार्यालयीन अधीक्षक प्रदीप दराडे, बालाजी माळी यांसह संस्थेतील निदेशक व कर्मचारी उपस्थित होते.

Advertisement
Tags :

.