अर्ज केल्यानंतर 15 दिवसांच्या आत ‘टीसी’ देणे बंधनकारक
बेंगळूर : राज्यातील सर्व शाळांमध्ये विद्यार्थ्यांना वेळेवर हस्तांतरण प्रमाणपत्र (टीसी) वाटप करावे, असा महत्त्वाचा आदेश शिक्षण खात्याने जारी केला आहे. राज्यातील अनेक अनुदानित आणि विनाअनुदानित शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे हस्तांतरण प्रमाणपत्रे वेळेवर वितरित झालेली नाहीत. त्यामुळे शाळांमध्ये अधिकृतपणे प्रवेश घेण्यास विलंब होत असल्याने विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत. याबाबत राज्य बाल हक्क संरक्षण आयोगाकडे अनेक तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यामुळे बाल हक्क संरक्षण आयोग कायदा-2005 च्या कलम 13(जे) अंतर्गत मुलांच्या हक्कांचे उल्लंघन झाल्याच्या प्रकरणांमध्ये आयोग तक्रारी स्वीकारून त्यांची चौकशी करत आहे.
देशातील विविध राज्यांच्या राज्य उच्च न्यायालयांमध्ये हस्तांतरण प्रमाणपत्र देण्याबाबत दाखल झालेल्या खटल्यांच्या निकालांनुसार, विद्यार्थ्यांना शैक्षणिक उपक्रमांपासून वंचित ठेवू नये, जर पालकांना मुलांचे शैक्षणिक उपक्रम सुरू ठेवावेत असे वाटल्यास ते मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क कायदा-2009 च्या कलम 5(1) चे उल्लंघन होऊ नये म्हणून अर्ज केल्यापासून 15 दिवसांच्या आत हस्तांतरण प्रमाणपत्र देणे हे मुख्याध्यापकांचे कर्तव्य आहे. मुख्याध्यापकांनी वेळेवर हस्तांतरण प्रमाणपत्र दिले नाही तर पालकांनी गटशिक्षणाधिकाऱ्यांकडे विनंती अर्ज करावा. यानंतर गटशिक्षणाधिकाऱ्यांनी सदर शाळेच्या मुख्याध्यापकांना एक आठवडा कालावधी देऊन कार्यवाही करावी. गटशिक्षणाधिकाऱ्यांनी दिलेल्या मुदतीत हस्तांतरण पत्र दिले नाही, तर सक्षम अधिकारी म्हणजेच जिल्हा उपसंचालक (प्रशासन), शाळा व्यवस्थापन मंडळ व मुख्याध्यापकांवर कारवाई केली जाईल, असा इशारा देण्यात आला आहे.