मराठीचा लढा राजकीय मार्गानेच लढणे अपरिहार्य !
संघटनात्मक बळावर निर्णायक लढ्यासाठी सज्ज व्हा प्रा.सुभाष वेलिंगकर यांचे निर्धार मेळाव्यात आवाहन
फोंडा : मराठी ही गोव्याची केवळ भाषिक व सांस्कृतिक ओळख नसून ती राष्ट्रीयत्वाची ओळख आहे. मराठीचे सर्व निकष डावलून कोकणीला राजभाषेचे स्थान देणे हा राजकीय निर्णय होता. त्याला आता राजकीय मार्गानेच उत्तर द्यावे लागेल. मराठीची अवहेलना करणारा पक्ष किंवा नेते सत्तेवर राहणार नाहीत, असा निर्धार कऊन मतपेढीच्या माध्यमातून निर्णायक लढ्यासाठी सज्ज होण्याचे आवाहन मराठी राजभाषा निर्धार समितीचे निमंत्रक प्रा. सुभाष वेलिंगकर यांनी फर्मागुडी येथील मेळाव्यात केले. येथील श्री गोपाळ गणपती मंदिरच्या सभागृहात फोंडा प्रखंड समितीतर्फे रविवारी सायंकाळी हा मेळावा आयोजित करण्यात आला होता.
फोंडा तालुक्यातील मराठीप्रेमी मोठ्यासंख्येने मेळाव्याला उपस्थित होते व त्यात महिला आणि तरुणवर्गाची उपस्थिती लक्षणीय होती. गेल्या चाळीस वर्षांत स्थानिक नेत्यांपासून राष्ट्रपतीपर्यंत निवेदन देण्यात आली. आता निवडणुकीचे हत्त्यार वापऊन मराठी मतपेढी निर्माण करणे अपरिहार्य आहे. त्यासाठी युवा आणि नारीशक्ती संघटीत करुन येत्या ऑगस्टपर्यंत ग्रामपंचायत पातळीपासून संघटनात्मक बळ वाढवावे लागेल. राजकीय सत्तेच्या आसनांना धक्के बसतील असे मोठे शक्तीप्रदर्शन घडवावे लागेल. विधानसभा निवडणुकीला दोनवर्षे आहेत, तोपर्यंत मराठीची वोटबँक निर्माण करणे हाच एकमेव पर्याय असल्याचे सुभाष वेलिंगकर म्हणाले.
अनैतिकतेची ओळख पुसायला हवी
मराठीशिवाय गोव्यातील भावी पिढ्यांना भवितव्य नसून हा केवळ एका राज्याचा नव्हे तर राष्ट्रीयत्वाचा प्रश्न आहे. कोकणीला पात्रता नसतानाही राजभाषेचा मुकुट चढवून इंग्रजीकरणाचा मार्ग मोकळा केला गेला. कॅसिनो, भ्रष्टाचार व अनैतिकता म्हणून जगभर जी गोव्याची ओळख निर्माण झाली आहे, ती पुसून टाकण्यासाठी मराठी राजभाषा होणे काळाची गरज आहे असे सुभाष वेलिंगकर पुढे म्हणाले. यावेळी व्यासपीठावर या आंदोलनाचे मार्गदर्शक गो. रा. ढवळीकर, फोंडा प्रखंडचे प्रमुख शाणूदास सावंत, समन्वयक जयंत मिरींगकर, दिवाकर शिंक्रे, विनोद पोकळे, हनुमंत नाईक, पणजीचे माजी महापौर अशोक नाईक, उदय डांगी, गोविंद देव, वीणा नाईक, दिव्या मावजेकर व शशांक उपाध्ये हे उपस्थित होते.
मराठी गोव्याची भाषा नसल्याची दिशाभूल
गो. रा. ढवळीकर यांनी मराठी ही मूळ गोव्याचीच भाषा असून ती उपरी असल्याचा गैरसमज तऊण पिढीमध्ये पसरविला जात असल्याचे सांगितले. ज्या गोव्यात सर्वाधिक वृत्तपत्रे मराठीतून चालतात, प्राथमिक शिक्षण देणाऱ्या शाळांची संख्याही मोठ्याप्रमाणात आहे, येथील मराठीचा वाचक आणि साहित्य निर्मितीही विपुल आहे आणि अभिजात भाषेच्या निकषांवर टिकणारी समृद्ध परंपरा आहे हे दुर्लक्षित केले जाते. ज्यांच्या पूर्वजांनीच मराठीला साहित्य व सांस्कृतिक वैभव प्राप्त कऊन दिले, त्यांचे वंशज ही भाषा नाकारतात, याहून मोठे दुर्दैव नाही. मराठी भाषेत नवीन पिढीला व्यापक संधी आहेत, हे सिद्ध करताना गोमंतकीय तरुणांनी नाट्या व कलाक्षेत्रात उभ्या महाराष्ट्रात यशाचे झेंडे फडकावले आहेत. मात्र मराठी भाषेला डावलून दक्षिण काशी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या गोव्याचे सांस्कृतिक संचित नष्ट होताना दिसत आहे. कोकणी म्हणजेच गोव्याची वेगळी ओळख हा भ्रम असून त्याला नवीन पिढीने बळी पडू नये. मराठीतून शिकणाऱ्यांना साहित्य कला व सांस्कृतिक क्षेत्रात उच्च झेप घेण्याचे मोठे अवकाश आहे. कोकणी भाषेला राजभाषेचे निकष नसतानाही केवळ राजकीय बळावर हे स्थान दिले गेले असून तिला मिळालेली साहित्य अकादमीची मान्यता हा मोठा घोटाळा असल्याचा आरोपही त्यांनी केला.
शाणूदास सावंत म्हणाले, मराठीला डावलून कोकणी राजभाषा म्हणजेच असंविधानिक व अलोकशाही मार्गाने केलेला अन्याय आहे. गोव्याच्या भवितव्यासाठी मराठी भाषा अनिवार्य आहे. शशांक उपाध्ये व दिव्या मावजेकर या तरुण वक्त्यांनी मराठीसाठी तरुण पिढीने एकत्र येण्याचे आवाहन केले. जयंत मिरींगकर यांनी प्रास्ताविक भाषणात मराठीला गोव्यातील जनमानसात अढळ स्थान असल्याचे सांगून मुळात गोव्याच्या संस्कृतीचे मराठी हे वैभव असल्याचे नमूद केले. हनुमंत नाईक यांनी स्वागत केले. मराठी नाट्याक्षेत्रात गोव्याचा डंका महाराष्ट्रापर्यंत नेणारे फोंडा येथील हंस नाट्यासंस्था तसेच मंगेशी येथील मांगिरीश युथ क्लब या संस्थेच्या सांस्कृतिक क्षेत्रातील योगदानाबद्दल सन्मान करण्यात आला. हंसतर्फे ज्योती विजयकुमार नाईक तर मांगिरीश क्लबतर्फे केदार मणेरीकर यांनी चषक स्वीकारले. आदिती चितळे व शिल्पा ढवळीकर यांनी वक्त्यांचा परिचय करुन दिला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मच्छींद्र च्यारी यांनी तर राधा गाड यांनी आभार मानले. उपस्थित मराठीप्रेमींना सुभाष वेलिंगकर यांनी मराठीच्या निर्धाराची प्रतिज्ञा दिली.