आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणे महत्त्वाचे
मीरापूर गल्ली शहापूर येथील सागर हंजी कंबरेचे दुखणे त्रासदायक असूनही दिव्यांगावर करतोय मात
बेळगाव : आज 3 डिसेंबर असून या दिवशी दरवर्षी जगतिक दिव्यांग दिन साजरा केला जातो. आपण सुदृढ निरोगी असावे असे प्रत्येकालाच वाटते. परंतु वेगवेगळ्या कारणास्तव कधी कधी दुर्दैवाने कोणाला दिव्यांगत्वही येऊ शकते. परंतु त्याचा बाऊ करून सतत नक्राश्रू ढाळण्यापेक्षा त्याचा स्वीकार करून आयुष्याकडे सकारात्मकपणे पाहणे महत्त्वाचे. कारण जगायचेच असेल तर आनंदाने आणि वास्तवाला सामोरे जात जगणे केव्हाही श्रेयस्कर. सागर हंजी या तरुणाबाबत नेमके असेच म्हणता येईल. कंबरेचे दुखणे त्रासदायक असले तरी त्याने त्याचा सहज स्वीकार केला आहे.
मीरापूर गल्ली शहापूर येथील रहिवासी सागर हंजी याला आई-वडील व दोन भाऊ आहेत. बारावीपर्यंत त्याचे शिक्षण झाले आहे. कधी कधी नियती इच्छा असूनही काही गोष्टींची पूर्तता करत नाही. त्यामुळे सागर पुढे फारसा शिकू शकला नाही. तथापि, आज अनेकांच्या तोंडी त्याचे नाव आहे. त्याचे कारण म्हणजे त्याला येत असणारा उत्तम स्वयंपाक होय. आता स्वयंपाक म्हणजे फक्त महिलांची मक्तेदारी राहिली नाही. हॉटेलमधील शेफ आणि ठिकठिकाणी स्वयंपाक कंत्राट घेणारे आचारी हे याचे उत्तम उदाहरण आहे. विशेष म्हणजे या कामाने अनेकांना रोजगार मिळाला आहे.
सागर सुद्धा गल्लीतीलच एका ज्येष्ठ व्यक्तीबरोबर स्वयंपाकाच्या कामात मदतीसाठी जात असे. त्यानंतर हळूहळू गाठीशी आलेल्या अनुभवाने त्याने ठिकठिकाणी स्वतंत्र कंत्राट घेण्यास सुरुवात केली आणि आज अनेक धार्मिक सोहळ्यामध्ये, कार्यक्रमामध्ये, गणेशोत्सवामध्ये त्याला स्वयंपाकाचे कंत्राट मिळत आहे. तसेच महाप्रसादासाठी तर त्याला सतत मागणी असते. साधारण दुपारी 1 वाजता महाप्रसादाला प्रारंभ करावयाचा असेल तर पहाटे 6 पासून तो तयारीला लागतो.गव्हाची खीर हे तर त्याचे खास वैशिष्ट्या. आदल्या दिवशी तो गहू भिजत घालून दुसऱ्या दिवशी खीर केल्यानंतर त्याचा आस्वाद घेणारा प्रत्येकजण सागरचे कौतुक करतो.
त्याला त्याच्या दोन्ही भावांचीही उत्तम साथ मिळते. वास्तविक मोठ्या पातेल्यांमध्ये खीर, आमटी ढवळणे हे सोपे काम नाही. किंबहुना मुळात इतक्या मोठ्या प्रमाणात चवदार स्वयंपाक करणेसुद्धा ‘येरा गबाळ्याचे काम नाही’ मात्र आज सागर साधारण आठ ते दहा हजार लोकांचा स्वयंपाक सहजपणे करू शकतो. अर्थात भाज्या चिरणे किंवा अन्य कामाची मदत त्याला मिळते. परंतु स्वयंपाकातील मीठ, तिखट, मसाला याची भट्टी अचूक जमल्याने स्वयंपाक चविष्ट होतो हे सागरचे वैशिष्ट्या आहे. आज अनेक ठिकाणी महाप्रसादाच्यावेळी पुरुष मंडळीच स्वयंपाकाचे कंत्राट घेत असून ती जबाबदारी समर्थपणे पार पाडत आहेत. ज्यांना कोणाला दिव्यांगपणामुळे उमेदच हरविल्याप्रमाणे वाटते त्यांनी सागरचे उदाहरण समोर ठेवण्यास हरकत नसावी.