साताऱ्यात लवकरच आयटी हब उभारणार
मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची ग्वाही
सातारा
डिझाईनव्हिओ लवकरच मोठी झेप घेणार असून, युवकांचे आयुष्य उजळवण्यासाठी कटिबद्ध आहे. युवकांसाठी आशास्थान ठरणारी ही पहिली आयटी कंपनी ठरेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले. साताऱ्यात लवकरच एक आयटी हब उभारला जाणार असल्याची ग्वाहीही शिवेंद्रराजेंनी यावेळी दिली.
सातारा येथील करंजे पेठ येथे आयोजित युजर एक्सप्रेन्स आधारित डिझाईनव्हिओ प्रायव्हेट लिमिटेड या आयटी कंपनीचे उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी श्री. मालोजीराजे तिसरे संयुक्ताराजे भोसले (राजासाहेब अक्कलकोट) हे देखील उपस्थित होते. कंपनीच्या विस्तारामुळे अनेक युवकांचे भविष्य उज्ज्वल होणार असल्याचे म्हणत, साताऱ्यात आयटी उद्योगाच्या प्रगतीसाठी हा एक महत्त्वाचा टप्पा असून, डिझाईनव्हिओ प्रायव्हेट लिमिटेड भविष्यात स्थानिक विद्यार्थ्यांना डिजिटल क्षेत्रात नवीन संधी उपलब्ध करून देईल, असा विश्वास मंत्री शिवेंद्रराजे यांनी व्यक्त केला.
यावेळी उपशिक्षणाधिकारी रवींद्र खंदारे यांनी उपस्थित राहून मान्यवरांचे स्वागत केले. या कंपनीची स्थापना डिझाईनव्हिओचे सीईओ अनिकेत पवार यांच्या अथक प्रयत्नातून झाली आहे. कोचिंग क्लासेसपासून सुरू झालेल्या या प्रवासाने नोंदणीकृत आयटी कंपनीपर्यंत मजल मारली आहे. त्यांना त्यांच्या बहिणी निलम किर्दत, निशा जगदाळे, पत्नी स्नेहल पवार, आई तसेच लिंब किडगाव केंद्राच्या केंद्रप्रमुख सौ. सुनंदा नारायण पवार यांचे मोलाचे सहकार्य लाभले. कठोर परिश्रम, चिकाटी व समर्पणाच्या बळावर सामान्य कुटुंबातील व्यक्ती देखील असामान्य यश मिळवू शकतात, याचे उत्तम उदाहरण म्हणजे डिझाईनव्हिओ.
यावेळी शिक्षण विस्तार अधिकारी जयश्री गुरव, केंद्रप्रमुख, मुख्याध्यापक, शिक्षक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी नगरसेवक जगन्नाथ किर्दत, शिक्षक बँकेचे माजी व्हाईस चेअरमन अनिल जायकर, ज्येष्ठ मार्गदर्शक फडतरे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
प्रास्ताविक सुशांत साळुंखे यांनी केले, तर सूत्रसंचालन दत्तात्रय कोरडे यांनी केले. डिझाईनव्हिओचे संचालक नारायण पवार यांनी आभार मानले.