रुद्रण्णाच्या आत्महत्येला आठ दिवस पूर्ण
तहसीलदारांसह तिघे संशयित अजूनही फरार : पोलिसांवर दबाव नाही
बेळगाव : तहसीलदार कार्यालयातील अधिकाऱ्याच्या आत्महत्या प्रकरणाची कसून चौकशी करण्यात येत आहे. तहसीलदारांसह तिघे जण सध्या फरारी आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात अर्ज दाखल केला आहे. पोलीस दलाच्यावतीने त्यासाठी हरकत घेण्यात आली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त यडा मार्टिन मार्बन्यांग यांनी दिली. रुद्रण्णा यडवण्णावर (वय 34) या अधिकाऱ्याने तहसीलदार कार्यालयातील तहसीलदारांच्या कक्षात आत्महत्या केली आहे. या घटनेला मंगळवारी आठ दिवस पूर्ण होतात. तहसीलदारांसह तिघा जणांवर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. त्या तिघा जणांना अद्याप अटक का केली नाही? पोलीस खात्यावर कोणाचा दबाव आहे का? असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला असता या प्रकरणाच्या तपासात कोणाचाच दबाव नसल्याचे आयुक्तांनी सांगितले.
मोबाईल पोलिसांनी घेतला ताब्यात
रुद्रण्णाचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. तो विधिविज्ञान प्रयोगशाळेत पाठविण्यात आला आहे. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने किती जणांशी संभाषण केले आहे, याचा तपशील मिळविण्यात येत आहे. कुटुंबीयांनी रुद्रण्णाच्या आत्महत्येला तहसीलदारांसह तिघे जण जबाबदार असल्याची फिर्याद दिली आहे. त्या दिशेने तपास करण्यात येत असल्याचे आयुक्तांनी सांगितले. रुद्रण्णावर भूमाफियांचाही दबाव होता का? या प्रश्नावर सध्या आत्महत्येला प्रवृत्त केल्या प्रकरणाचा तपास करण्यात येत आहे. कारण, याच अनुषंगाने एफआयआर दाखल झाल्यामुळे आपले पहिले प्राधान्य रुद्रण्णाच्या आत्महत्येला तहसीलदारांसह तिघे जण जबाबदार आहेत का? याचा तपासही करण्यात येत आहे. या तपासात जर भूमाफियांचा विषय आढळल्यास यासंबंधीही चौकशी करण्यात येणार असल्याचे पोलीस आयुक्तांनी सांगितले.