न्हावेली-पाडलोस-रोणापाल जोडरस्ता दुर्लक्षित
मंत्र्यांच्या आश्वासनाला झाली 5 वर्षे : काम मार्गी लावण्याची मागणी
न्हावेली / वार्ताहर
न्हावेली-पाडलोस-रोणापाल जुना जोडरस्त्याचे काही प्रमाणात खडीकरण डांबरीकरण झाले. उर्वरित दोन किलोमीटर रस्त्याचे काम स्वनिधीतून करणार असल्याची ग्वाही त्या वेळेचे पालकमंत्री तथा विद्यमान शिक्षण मंत्री आमदार दीपक केसरकर यांनी दिली होती. परंतु पाच वर्षांचा कालावधी लोटला तरीही केसरकर यांना दिलेल्या आश्वासनाचा विसर पडला, अन रस्ता खडीकरण डांबरीकरणाच्या प्रतीक्षेत राहिला. त्यामुळे या दुर्लक्षित झालेल्या रस्त्याच्या कामाकडे निदान आता तरी आमदार दीपक केसरकर यांनी लक्ष द्यावे अशी मागणी न्हावेली, पाडलोस, रोणापाल ग्रामस्थांमधून होत आहे.
पाडलोस ते रोणापाल दरम्यान मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून युती सरकारच्या काळात आमदार दीपक केसरकर सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री असताना करण्यात आले. जास्त प्रमाणात काम झाले असून केवळ दोन किलोमीटरचा रस्ता खडीकरण डांबरीकरण होणे बाकी होते. त्यावेळी आमदार दीपक केसरकर यांनी स्वनिधीतून उर्वरित दोन किलोमीटर रस्त्याचे का मार्गी लावू असे आश्वासन दिले होते. याच आश्वासनावर ग्रामस्थांनी आमदार दीपक केसरकर यांना पुन्हा निवडून दिले, परंतु अद्यापही सदर दोन किलोमीटर रस्त्याकडे मंत्री केसरकर यांचे दुर्लक्ष झाले.जनतेला दिलेला शब्द मंत्री केसरकर यांनी पाळला नाही. परिणामी काही मतदारांनी नाराजी व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत आम्ही योग्य तो निर्णय घेणार असल्याचे सांगितले.
गावाच्या विकासासाठी एक गठ्ठा मतदान आमदार दीपक केसरकर यांना झाले. मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या पाडलोस मधील कामावेळी दिलेला शब्द दीपक केसरकर यांनी न पाळल्यामुळे आम्ही आमचा रोष आता मतदानातून व्यक्त करणार. तसेच वेळप्रसंगी जनतेसाठी आंदोलनही छेडणार.
- महेश कुबल, शिवसेना शाखाप्रमुख, पाडलोस (ठाकरे गट)
'त्याच' उमेदवाराला मतदान करणार
2024 मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी जो उमेदवार न्हावेली-पाडलोस-रोणापाल जुना रस्त्याच्या कामाच्या हालचाली करणार त्याच उमेदवारास मतदान करणार आहोत. केवळ आश्वासन देणाऱ्यानी मत मागण्यासाठी येऊ नये असे काही सुजाण मतदारांनी बोलून दाखवले.