इस्त्रोने साकारला ‘व्योममित्र’
भारताच्या जगप्रसिद्ध अवकाश संशोधन संस्था इस्त्रोने एका अत्याधुनिक यंत्रमानवाची (रोबो) निर्मिती केली असून त्याचे नाव ‘व्योममित्र’ असे ठेवले आहे. हा यंत्रमानव इस्त्रोला गगनयान अभियानात मोलाचे सहकार्य करणार आहे. ‘व्योममित्र’ हा पुरुष नसून एक महिला आहे. अर्थातच ती जीवंत महिला नसून यंत्रमानावाला तिचे स्वरुप देण्यात आले आहे. इस्त्रोच्या विविध अभियानांना आपण कसे साहाय्यभूत होणार आहे याची माहिती ही रोबो स्वतः देणार आहे.
इस्त्रोची गगनयान मोहीम ही मानवासहीत असेल. तथापि हा प्रत्यक्ष मानव नसून ‘व्योममित्र’च्या स्वरुपातील असेल. व्योममित्र इस्त्रोच्या यानातून अंतराळ प्रवास करणार असून तेथून महत्त्वाची माहिती पृथ्वीवर पाठवणार आहे. ‘व्योममित्र’चे प्रथम दर्शन 22 जानेवारी 2020 या दिवशी बेंगळूरमधील भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या ऍकॅडमी ऑफ ऍस्ट्रोनॉटिक अँड एस्ट्रॉनॉटीकल सोसायटी ऑफ इंडियाच्या कार्यक्रमात घडले होते. त्यावेळी हा यंत्रमानव प्राथमिक स्वरुपात होता. आता त्यात मोठी सुधारणा करण्यात आली आहे. काही काळातच इस्त्रो गगनयान अभियानाचा प्रारंभ करणार आहे. गगनयान अभियानाच्या पहिल्या प्रयोगात मानवरहित यानाचे प्रक्षेपण केले जाणार आहे. तर दुसऱया प्रयोगात ‘व्योममित्र’ला अंतराळात पाठविले जाणार आहे. हे दोन प्रयोग अपेक्षेनुसार यशस्वी झाल्यास जीवंत मानवाला अवकाशात पाठविण्याचा इस्त्रोचा विचार आहे.