सायबर गुन्ह्यांचा विषय अधिवेशनात चर्चेला घ्या
सॉलीडिरिटी युथ मुव्हमेंटच्या पदाधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत मागणी
बेळगाव : वाढती सायबर फसवणूक आणि डिजिटल गुन्ह्यांमुळे सामान्य नागरिकांना आर्थिक, सामाजिक आणि मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. कर्नाटकातील गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन या संदर्भात तातडीने आणि प्रभावी पावले उचलावीत. तसेच बेळगावातील अधिवेशनात सायबर गुन्ह्यांना चर्चेचा प्रमुख विषय म्हणून घेऊन राज्यव्यापी धोरण आखण्यात यावे, अशी मागणी सॉलीडिरिटी युथ मुव्हमेंटतर्फे करण्यात आली.
कन्नड साहित्य भवन येथे बुधवारी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी सॉलीडिरिटी युथ मुव्हमेंटचे पदाधिकारी बोलत होते. आपल्या संघटनेकडून राज्य, जिल्हा व तालुका यासह जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार, गृहमंत्री डॉ. जी. परमेश्वर यांच्यासह सभापती, सभाध्यक्ष, विरोधी पक्षनेते, मंत्री, आमदार आणि विधानपरिषद सदस्यांना पत्र देण्यात आले आहे. सायबर गुन्ह्यात कर्नाटक राज्य देशात दुसऱ्या क्रमांकावर आहे. त्यामुळे ही बाब गंभीर स्वरुपाची आहे. त्यामुळे बेळगाव अधिवेशनात सायबर फसवणुकीचा एक प्रमुख मुद्दा म्हणून चर्चेला आणावा आणि कठोर धोरणे आखावीत.
राज्यस्तरीय स्वतंत्र सायबर हेल्पलाईन तात्काळ स्थापन करा
फसवणूक झालेल्या नागरिकांचे पैसे परत मिळावेत याची हमी देण्यासाठी सरकारने एक विशेष प्रणाली तयार करावी. राज्यस्तरीय स्वतंत्र सायबर हेल्पलाईन तात्काळ स्थापन करावी. युवक आणि नागरिकांसाठी सायबर सुरक्षा, हॅकींग प्रतिबंध आणि डिजिटल जागरूकता कार्यक्रम व्यापकपणे राबविण्यात यावेत, अशी मागणी यावेळी करण्यात आली.