इस्रोच्या ‘स्पॅडेक्स’ची यशस्वी झेप
अवकाशात दोन यान जोडण्यासंबंधीची मोहीम : अंतराळ क्षेत्रात इस्रोने रचला नवा इतिहास
वृत्तसंस्था/ श्रीहरिकोटा
भारतीय अंतराळ संशोधन संस्था ‘इस्रो’ने सोमवारी रात्री ‘स्पॅडेक्स’ मोहिमेचे यशस्वी प्रक्षेपण करत इतिहास रचला. विश्वसनीय ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपकावरून ‘स्पॅडेक्स’ ही स्पेस डॉकिंग मोहीम प्रक्षेपित करण्यात इस्रोने यश मिळविले आहे. आतापर्यंत स्पेस डॉकिंगचे तंत्रज्ञान काही मोजक्या देशांनीच विकसित केले होते. केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच हे साध्य झालेले असताना आता भारतानेही स्पेस डॉकिंगचे कौशल्य संपादन करत अवकाश क्षेत्रात नवे क्षितीज पादाक्रांत केले. इस्रोचे अध्यक्ष एस. सोमनाथ यांनी यासंबंधीची माहिती देताना अवकाश संशोधन क्षेत्रात ‘मैलाचा दगड’ गाठल्याचा दावा केला आहे.
किफायतशीर तंत्रज्ञान प्रात्यक्षिक मोहीम ‘स्पॅडेक्स’ सोमवार, 30 डिसेंबर रोजी रात्री 9.58 वाजता पीएसएलव्ही-सी60 रॉकेटवरून प्रक्षेपित करण्यात आली. या मोहिमेचे लाईव्ह स्ट्रिमिंग रात्री 09.30 वाजल्यापासून इस्रोच्या यूट्यूब चॅनेलवर दाखविण्यात आले. ‘स्पॅडेक्स’ मोहिमेत बुलेटच्या वेगापेक्षा दहापट वेगाने अंतराळात प्रवास करणारी दोन यान एकत्र जोडण्यात येणार आहेत. दोन यान एकत्र जोडण्याच्या या प्रक्रियेलाच ‘डॉकिंग’ असे संबोधले जाते. प्रक्षेपण यशस्वी झाल्यामुळे रशिया, अमेरिका आणि चीननंतर असे करणारा भारत हा चौथा देश ठरला आहे. भारताची चांद्रयान-4 मोहीम या मोहिमेच्या यशावर अवलंबून असून याद्वारे चंद्रावरील मातीचे नमुने पृथ्वीवर आणण्यासाठी मदत होणार आहे.
पीएसएलव्ही-सी60 रॉकेटमधून प्रक्षेपण
‘स्पॅडेक्स’ मोहिमेत टार्गेट आणि चेझर या दोन लहान अंतराळयानांचा समावेश आहे. ही यान पीएसएलव्ही-सी60 रॉकेटमधून 470 किमी उंचीवर वेगळ्या कक्षेत सोडण्यात आली. प्रक्षेपण केल्यानंतर अंतराळयानाचा वेग ताशी 28,800 किलोमीटर होता. हा वेग व्यावसायिक विमानाच्या वेगाच्या 36 पट आणि बुलेटच्या वेगाच्या 10 पट आहे. या टप्प्यात दोन अंतराळयानांमध्ये थेट संवाद साधता येणार नाही. त्यांना जमिनीवरून मार्गदर्शन केले जाईल. अंतराळयान जवळ आल्यानंतर वेगवेगळ्या टप्प्यात व्हिजुअल कॅमेऱ्यांचा वापर करून त्यावर नजर ठेवली जाणार आहे. यशस्वी डॉकिंगनंतर दोन अंतराळ यानांमधील विद्युत ऊर्जा हस्तांतरणाचे प्रात्यक्षिक केले जाईल. त्यानंतर स्पेसक्राफ्टचे अनडॉकिंग होईल आणि ते दोघेही आपापल्या पेलोडचे ऑपरेशन सुरू करतील. त्यानंतर दोन वर्षांपर्यंत माहितीचे आदान-प्रदान करण्याची प्रक्रिया सुरू राहणार आहे.
स्पेस डॉकिंग प्रणाली...
‘पीएसएलव्ही-सी60’च्या माध्यमातून स्पेस डॉकिंग प्रयोगाचे प्रक्षेपण करण्यात आले असून त्याला ‘स्पॅडेक्स’ नाव देण्यात आले आहे. स्पेस डॉकिंग हे अंतराळात दोन अंतराळयानांना जोडणारे तंत्रज्ञान आहे. या पद्धतीमध्ये अंतराळ यानच आपणहून अंतराळस्थानकाशी जोडले जाऊ शकते. अंतराळात दोन वेगवेगळ्या गोष्टींना जोडण्याचे हे तंत्रज्ञान भारताला स्वत:चे अंतराळ स्थानक निर्माण करणे आणि चांद्रयान-4 प्रकल्पात मदत करणार आहे. स्पेस डॉकिंग हे अंतराळ स्थानकाच्या संचालनासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे.
भारताने मिळविले डॉकिंग यंत्रणेचे पेटंट
‘स्पॅडेक्स’ या डॉकिंग यंत्रणेला ‘इंडियन डॉकिंग सिस्टम’ असे नाव देण्यात आले आहे. इस्रोने या डॉकिंग प्रणालीचे पेटंटही घेतले आहे. आतापर्यंत कोणत्याही देशाच्या अंतराळ संस्थेने या अत्यंत गुंतागुंतीच्या प्रक्रियेचा तपशील शेअर न केल्यामुळे भारताने स्वत:ची डॉकिंग यंत्रणा विकसित केली आहे.
24 पेलोडही प्रयोगासाठी रवाना
सूक्ष्म गुरुत्वाकर्षणाच्या प्रयोगांसाठी या मोहिमेमध्ये 24 पेलोड देखील पाठवण्यात आले आहेत. हे पेलोड पीओईएम (पीएसएलव्ही ऑर्बिटल एक्सपेरिमेंटल मॉड्यूल) नावाच्या पीएसएलव्ही रॉकेटच्या चौथ्या टप्प्यात नेले जातील. यातील 14 पेलोड्स इस्रोचे असून 10 पेलोड हे गैर-सरकारी संस्थांचे आहेत.
मोहिमेसमोरील आव्हाने
इस्रोच्या स्पेस डॉकिंग मिशनमध्ये अनेक आव्हाने आहेत. सर्वात मोठे आव्हान म्हणजे दोन उपग्रहांना पृथ्वीच्या कक्षेत मिलिमीटर-स्तराच्या अचूकतेसोबत जोडणे हे आहे. आता नजिकच्या काळात दोन्ही उपग्रहांदरम्यान संचार आणि नेव्हिगेशन डाटाचे आदान-प्रदान सुरळीतपणे करावे लागणार आहे. ऑटोमॅटिक डॉकिंगसाठी अत्याधुनिक सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरची देखील आवश्यकता भासणार आहे.