For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

भोपाळची विषारी कचऱ्यापासून मुक्तता

07:10 AM Jan 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
भोपाळची विषारी कचऱ्यापासून मुक्तता
Advertisement

युनियन कार्बाईड कारखान्यातून रसायने हटविली :  377 टन कचऱ्याची विल्हेवाट

Advertisement

वृत्तसंस्था/नवी दिल्ली

जगभर गाजलेल्या भोपाळ वायू दुर्घटनेनंतर तब्बल चाळीस वर्षांनी या दुर्घटनेला कारणीभूत ठरलेल्या युनियन काबाईड कारखान्यातील विषारी कचरा हटविण्यात आला आहे. ही दुर्घटना घडल्यानंतर हा विषारी रसायनांचा कचरा या कारखान्यात साठला होता. दुर्घटनेनंतर या कारखान्यातील उत्पादन थांबविण्यात आले होते. तसेच कारखाना ओस पडला होता. मात्र, त्यातील विषारी कचरा तसाच राहिला होता. तो हटविण्याची मागणी अनेक वर्षांपासून केली जात होती. गुरुवारी अनेक ट्रक्सच्या साहाय्याने साधारणत: 377 टन कचरा हटवून तो सुरक्षितस्थळी नेण्यात आला आहे. आता या कचऱ्याची शास्त्रशुद्ध पद्धतीने विल्हेवाट लावण्यात येणार आहे. या विषारी कचऱ्यामुळे आमच्या आरोग्याला धोका निर्माण होत आहे, अशी तक्रार आजूबाजूच्या कारखान्यांमधील कामगारांनी अनेकवेळा केली होती. तथापि, आतापर्यंतच्या कोणत्याही राज्य सरकारने या तक्रारींकडे लक्ष दिले नव्हते. मात्र, मुख्यमंत्री मोहन यादव यांच्या नेतृत्वातील भारतीय जनता पक्षाच्या सरकारने अखेर ही मागणी गुरुवारी पूर्ण केली आहे.

Advertisement

उच्च न्यायालयाकडून नोंद

विषारी कचऱ्याचे हे प्रकरण मध्यप्रदेश उच्च न्यायालयातही पोहचले होते. न्यायालयाने राज्य सरकारला काही प्रश्नही विचारले होते. सर्व कचरा हटविण्यासाठी राज्य सरकारला चार आठवड्यांचा कालावधी देण्यात आला होता. या कालावधीत कचरा हटाविण्यात आला नाही, तर प्रशासकीय अधिकाऱ्यांवर न्यायालयाची अवमानना केल्याप्रकरणी कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला होता. त्यानंतर आता कचरा हटविण्याची कारवाई पूर्ण झाली आहे.

कडेकोट सुरक्षा व्यवस्था

कचरा हटविण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ करण्यापूर्वी कारखान्याभोवतीच्या 200 मीटर परिसरात कडेकोट पोलीस सुरक्षा ठेवण्यात आली होती. याकामी 1000 पोलिसांना नियुक्त करण्यात आले होते. कचरा काढण्यासाठी 100 प्रशिक्षित कर्मचारी नियुक्त करण्यात आले होते. या कर्मचाऱ्यांना सुरक्षित वेषभूषा देण्यात आली होती. या कर्मचाऱ्यांनी एका दिवसात 377 टन कचरा 12 सुरक्षित टाक्यांमध्ये भरला आणि टाक्या कारखान्यातून अन्यत्र नेण्यात आल्या.

कोणते विषारी पदार्थ

या विषारी कचऱ्यामध्ये विषारी माती, कीटनाशकांचे उरलेले पदार्थ, औद्योगिक रासायनिक पदार्थ, दुर्घटनेनंतर उरलेले विषारी रासायनिक पदार्थ, कीटनाशके निर्माण करण्यासाठी आवश्यक असणारा आणि चाळीस वर्षे पडून राहिलेला कच्चा माल, नाफ्थॉलची मळी, अर्धनिर्मित कीटनाशके, कीटनाशक निर्माण करणाऱ्या  भट्टीतील विषारी पदार्थ, सेव्हीन नावाचे विषारी द्रव्य आदीचा समावेश आहे. ज्या रासायनिक द्रव्यामुळे भोपाळ दुर्घटनेत हजारो नागरीकांचा मृत्यू झाला, त्या मिथाईल आयसोसायनेटचाही समावेश या कचऱ्यात आहे, अशी माहिती देण्यात आली.

प्रक्रिया कशी होणार...

हा कचऱ्याची विल्वेवाट लावण्यासाठी अनेक शास्त्रशुद्ध प्रक्रियांचा अवलंब करावा लागणार आहे. विल्हेवाट लावताना वायुप्रदूषण होऊ नये म्हणून विशेष दक्षता घ्यावी लागणार आहे. यासाठी चार स्तरीय गाळण व्यवस्था निर्माण केली जाईल. अनेक रासायनिक पदार्थांचा कचरा जाळण्यात येईल. जाळताना विषारी वायू वातावरणात पसरणार नाहीत, याची दक्षता घेण्यात येईल. जाळल्यानंतर उरलेली राख सुरक्षित अशा द्विस्तरीय कवच असणाऱ्या कुप्यांमध्ये भरण्यात येईल आणि या कुप्या भूमीत खोलवर आणि सुरक्षित स्थळी पुरण्यात येणार आहेत.

काय होती भोपाळ वायू दुर्घटना

चाळीस वर्षांपूर्वी 1984 मध्ये 2 आणि 3 डिसेंबर यांच्या मधल्या रात्री भोपाळच्या युनियन कार्बाईड या कीटनाशक निर्मिती कारखान्यातून अतिविषारी वायूंची गळती होण्यास प्रारंभ झाला होता. काही मिनिटांमध्येच हे विषारी वायू अवतीभोवतीच्या वातावरणात अनेक किलोमीटर अंतरापर्यंत पसरले. कारखान्याच्या भोवती असणाऱ्या मानववस्त्यांमध्ये हे वायू पसरल्याने 5 हजारांहून अधिक जणांचा काही मिनिटांमध्येच मृत्यू झाला. या विषारी वायूसंसर्गातून जे वाचले, त्यांची अवस्था तर अत्यंत दयनीय झाली. पुढे अनेक वर्षे त्यांना विकलांग जीवन जगावे लागले. हजारो जणांना नंतर यातनामय मरण आले. युनियन कार्बाईड कंपनी ही अमेरिकेच्या डो रासायनिक कंपनीची उपकंपनी होती. या कंपनीचे चालक वॉरेन अँडरसन हे नंतर भारतात आले होते. त्यांना अटक करण्याची मागणी केली जात होती. तथापि, त्यावेळच्या केंद्रातील काँग्रेस सरकारने त्यांना अटक न करता अमेरिकेला परत जाण्याची अनुमती दिली होती. यावरुन बरीच टीकाही झाली होती. दुर्घटनेतील बळींना दिल्या जाणाऱ्या भरपाईवरही वाद निर्माण झाला होता.

न्यायालयाच्या आदेशाचा आदर

  • मध्यप्रदेश सरकारने न्यायालयाच्या आदेशानुसार केली योग्य कृती
  • चाळीस वर्षांचा कचरा एक दिवसात हटवून नेला सुरक्षित स्थळी
  • शास्त्रशुद्ध पद्धतीने या विषारी कचऱ्याची लावली जाणार विल्हेवाट
Advertisement
Tags :

.