For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रोची भरारी

06:58 AM Mar 15, 2025 IST | Tarun Bharat Portal
इस्रोची भरारी
Advertisement

भारतीय अवकाश संशोधन संस्था अर्थात इस्रोने मागच्या दहा वर्षांत विदेशी सॅटेलाईट लॉन्च करून तब्बल 143 मिलियन अमेरिकन डॉलर परदेशी चलन मिळविल्याची केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी लोकसभेत दिलेली माहिती देशाच्या दृष्टीने अभिमानास्पदच ठरावी. पीएसएलव्ही, एलव्हीएम3, एसएसएलव्ही रॉकेटच्या माध्यमातून भारताने आत्तापर्यंत 34 देशांचे सॅटेलाईट लॉन्च केले आहेत. यामध्ये सर्वाधिक म्हणजे 232 इतके सॅटेलाईट हे एकट्या अमेरिकेचे आहेत. तर इंग्लंडचे 83, सिंगापूरचे 19, पॅनडाचे 8, दक्षिण कोरियाचे 5, लक्समबर्ग आणि इटलीचे प्रत्येकी 4, जर्मनी, फ्रान्स, बेल्जिअम आणि फिनलंडच्या प्रत्येकी 3 सॅटेलाईटचा समावेश असल्याचे दिसून येते. याशिवाय भारताकडून जपान, इस्रायल, स्पेन, ऑस्ट्रेलिया, संयुक्त अरब अमिराती आणि ऑस्ट्रिया यांसारख्या देशांची सॅटेलाईटही लॉन्च करण्यात आली आहेत. भारतासारखा देश अंतराळ क्षेत्रात नवी झेप घेतो आणि केवळ जानेवारी 2015 ते 2024 या कालावधीत 12 अब्ज भारतीय ऊपयांपेक्षाही अधिक विदेशी चलन त्यातून प्राप्त करतो, ही क्रांतिकारकच घटना म्हणता येईल. वास्तविक मागच्या काही वर्षांतील इस्रोचा प्रवास थक्क करणाराच म्हणता येईल. 1962 मध्ये मुहूर्तमेढ रोवल्या गेलेल्या इस्रोने प्रत्येक टप्प्यागणिक एकेक शिखरे पादाक्रांत केली आहेत. इस्रोने ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यान अर्थात पीएसएलव्ही 1990 मध्ये विकसित केल्याचे सांगण्यात येते. 1993 साली त्याच्या मदतीने पहिला उपग्रह अवकाशात झेपावला. इस्रोसाठी ही फार महत्त्वपूर्ण बाब ठरते. यापूर्वी अशी प्रणाली केवळ रशियाकडे होती. रशियानंतर भारतानेदेखील ही प्रणाली विकसित करून अंतराळ क्षेत्रातील आपले स्थान मजबूत केल्याचेच यातून अधोरेखित होते. 15 फेब्रुवारी हा दिवस तर इस्रोच्या इतिहासातील सुवर्णक्षणच म्हणता येईल. याच दिवशी श्री हरिकोटा येथील सतीश धवन अवकाश केंद्रातून पीएसएलव्ही सी 37 या यानाने एक, दोन नव्हे, तर तब्बल 104 उपग्रहांचे प्रक्षेपण केले. तत्पूर्वी रशियाने 3, तर अमेरिकेने एका वेळी 29 उपग्र्रहांचे अवकाशात प्रक्षेपण केल्याचा इतिहास सांगितला जातो. यातील आणखी एक वैशिष्ट्या म्हणजे 104 पेकी केवळ तीनच उपग्रह भारताचे, तर उर्वरित 101 उपग्रह इतर देशांचे असल्याचे दिसून येते. 2006 ची चांद्रयान मोहीम भारतीयांच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवणारी ठरते. भारताच्या चांद्रयानाने अवकाशात घेतलेली भरारी व चंद्रावर चितारलेला तिरंगा, हा समस्त भारतीयांसाठी अविस्मरणीयच प्रसंग होय. त्यानंतरच्या मोहिमेत अडथळे आले असले, तरी कोणत्याही मोहिमेतील चढउतार हे काहीतरी नवे शिकवत असतात. इस्रो व इस्रोच्या शास्त्रज्ञानांनीही कठीण प्रसंगातून वेगळे काहीतरी शिकण्याचा आपला दृष्टीकोन कायम ठेवल्याने त्यांचे पाऊल पुढे पडत आहे. मंगळयान हीदेखील एक महत्त्वाकांक्षी मोहीम. पहिल्याच प्रयत्नात ही मोहीम यशस्वी होते, यावरूनच तिचे महत्त्व लक्षात यावे. खरे तर अमेरिका, रशियासारख्या पुढारलेल्या देशांनाही पहिल्या प्रयत्नात मंगळावर स्वारी करण्यात यश आले नव्हते. इस्रोने ही मजल मारावी, यातूनच या अवकाश संस्थेचा आवाका आणि मेहनत अधोरेखित होते. भविष्यात इस्रोकडून अनेक नव्या मोहिमांची आखणी करण्यात आली आहे. त्यात गगनयानसारखी मोहीम यशस्वी झाली, तर भारताचा चंद्र आणि मंगळावर माणूस पाठविण्याचा मार्ग खुला होणार आहे. याशिवाय सूर्याचा वेध घेण्यासाठी आदित्यसारखी योजनादेखील एक क्रांतिकारी पाऊल होय. स्पेडेक्स मिशनदेखील कुतूहल वाटावे असेच. यामार्फत अंतराळात दोन लहान अंतराळयानांच्या डॉकिंगचे प्रात्यक्षिक करण्यात येणार आहे. हे तंत्रज्ञान भविष्यातील चंद्र मोहिमांसाठी, भारतीय अंतरिक्ष स्टेशन बांधण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरू शकते. यातून स्पेस डॉकिंग क्षमता असलेल्या राष्ट्रांच्या एलिट क्लबमध्ये भारत सामील होण्याचा मार्ग मोकळा होऊ शकेल. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी आपल्या कष्ट आणि जिद्दीच्या बळावर आजवर अनेक मोहिमा तडीस नेल्या. आगामी काळात भारतीय अवकाश संशोधन क्षेत्राला आणखी नव्या उंचीवर नेण्याच्या दृष्टीने इस्रोने विविध मोहिमांची पायाभरणी करून ठेवली आहे. देशाच्या गरजा ओळखून अवकाश संशोधनाचा फायदा देशातील सामान्यातील सामान्य माणसाला करून देणे, हे इस्रोचे ध्येय राहिले आहे. मुख्य म्हणजे कोणताही गाजावाजा न करता शांतपणे इस्रोकडून अवकाश संशोधनावर काम सुरू होते. उ•ाणांच्या खर्चाचा विचार केला, तर त्या स्तरावरही इस्रोची कामगिरी चमकदार ठरते. ज्या ठिकाणी अमेरिकी संस्था नासाच्या उ•ाणाचा खर्च सहा ते साडेसहा हजार कोटी ऊपये इतका येतो, तेथे इस्रोच्या उड्डाणाचा खर्च फक्त 100 कोटी ऊपये इतका येत असल्याचे दिसून येते. या पार्श्वभूमीवर दस्तुरखुद्द अमेरिका व अन्य देशांतील कंपन्या भारताकडे आपले उपग्रह प्रक्षेपित करण्यासाठी पाठवू लागले आहेत. त्यामुळे देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठाही इस्रोकरिता उपलब्ध होत आहेत. याचा अमरिकेसारख्या देशाला मोठा फटका बसत असून, अवकाश संशोधन क्षेत्रात भारत एक महासत्ता म्हणून उदयास येत असल्याचे दिसत आहे. ही समस्त भारतीयांसाठी नक्कीच अभिमानास्पद बाब म्हणता येईल. जागतिक पातळीवर मागच्या काही वर्षांत अवकाश संशोधन हा अत्यंत महत्त्वाचा विषय बनला आहे. खरे तर अवकाश संशोधनातील प्रगती वा कोणतेही नवे पाऊल हे मानवजातीच्या कल्याणाकरिता पडत असते. त्याचा लाभ केवळ एकट्या दुकट्या देशाला होत नसतो. तर जगातील प्रत्येक नागरिकाला होत असतो वा व्हायला हवा. हे लक्षात घेता अवकाश संशोधन क्षेत्रामध्ये इस्रो, नासा किंवा इतर देशांतील संस्था असतील, त्यांनी एकमेकांच्या हातात हात घालून काम केले पाहिजे. संशोधन ही अव्याहतपणे चालणारी प्रक्रिया आहे. म्हणूनच संशोधनाचा ध्यास घेणाऱ्या शास्त्रज्ञांकरिता संशोधनपूरक वातावरण निर्माण होणे, ही काळाची गरज म्हणावी लागेल.

Advertisement

Advertisement
Tags :

.