इस्रोकडून दुसऱ्यांदा डॉकिंग चाचणी यशस्वी
दोन उपग्रह जोडले : यापूर्वी जानेवारीमध्ये पहिल्यांदा स्पेस डॉकिंग
वृत्तसंस्था/ बेंगळूर, नवी दिल्ली
इस्रोने दुसऱ्यांदा दोन उपग्रह यशस्वीरित्या अवकाशात जोडल्याची किमया केल्याची माहिती सोमवारी केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी ‘एक्स’ पोस्टद्वारे दिली. आता री-डॉकिंगच्या यशानंतर येत्या दोन आठवड्यात पुढील वैज्ञानिक प्रयोग केले जातील, असे केंद्रीय मंत्री म्हणाले. डॉकिंग चाचणी यशस्वी होण्याचे अभियान अंतराळ तंत्रज्ञानातील भारताच्या स्वदेशी क्षमतांचे एक महत्त्वाचे उदाहरण म्हणून उदयास आले आहे.
इस्रोने 30 डिसेंबर 2024 रोजी पीएसएलव्ही-सी60/स्पॅडेक्स मोहीम यशस्वीरित्या प्रक्षेपित केली होती. त्यानंतर उपग्रहांचे पहिले डॉकिंग 16 जानेवारी रोजी सकाळी 6:20 वाजता झाले. त्यानंतर 13 मार्च रोजी सकाळी 9:20 वाजता ते यशस्वीरित्या अनडॉक करण्यात आले. अवकाशात दोन उपग्रह यशस्वीरित्या लॉक करणारा भारत चौथा देश ठरला होता.
16 फेब्रुवारी रोजी भारत अंतराळात दोन अंतराळयान यशस्वीरित्या लॉक करणारा चौथा देश बनला. यापूर्वी फक्त रशिया, अमेरिका आणि चीन हे देश अशी चाचणी करण्यात यशस्वी झाले आहेत. चांद्रयान-4, गगनयान आणि भारतीय अंतराळ स्थानक यासारख्या मोहिमा या चाचणीच्या यशावर अवलंबून असल्यामुळे डॉकिंग-अनडॉकिंग हे इस्रोचे एक मोठे यश मानले जात आहे. चांद्रयान-4 मोहिमेत चंद्राच्या मातीचे नमुने पृथ्वीवर आणले जातील. तर गगनयान मोहिमेत मानवाला अंतराळात पाठवले जाईल.