युद्धशास्त्रातील इस्त्रायलचे वॉकीटॉकी स्फोटाचे धक्कादायक तंत्र
लेबनॉनमधील नागरिकांच्या खिशात पेजर फोनचे स्फोट होऊ लागले. पेजरच्या स्फोटाने मरण पावलेल्या नेत्याच्या अंत्ययात्रेत सहभागी अतिरेक्यांच्या हातातील वॉकीटॉकीही फूटू लागल्याने दहशतवादी गटात एकच खळबळ माजली असून दळणवळणाचे साधनच विस्फोटक बनले आहे. चिमुकला इस्त्रायल अरब राष्ट्रांनी घेरलेला असला तरी इराणमध्ये घुसून हमास संघटनेचे प्रमुख इस्माईल हनिए याला ठार करण्याचे कसब राखतो. तरीही इस्त्रायली नागरिकांना त्यांचे 200 बंधक इस्त्रायली नेतृत्व सोडवू शकत नसल्याने रस्त्यावर उतरून आपला राग व्यक्त करून शत्रूला धडा शिकविण्यासाठी दबाव आणत आहे.
हमास प्रमुखांना ठार केल्यानंतर इस्त्रायलची वाहवा सुरु असतानाच लेबनॉनमधील हिजबुल्ला दहशतवादी संघटनेने डागलेला तोफगोळा गोलान हाईट येथील इस्त्रायलच्या मजदल श्याम या छोट्या शहरावर पडला. त्यात 12 कोवळी मुले मृत्यूमुखी पडली. त्याचा बदला इस्त्रायल घेणार असे वाटले होते. पण थेट पारंपारिक पद्धतीचे युद्ध न छेडता जवळपास 2700 हिजबुल्ला अतिरेकी आणि समर्थकांच्या खिशातील पेजर फोनचा धमाका झाला. महिन्याभरानंतर झालेल्या या पेजर फोनच्या हल्याने इस्त्रायलच्या नवीन युद्ध तंत्रज्ञानाने संपूर्ण जग अवाक झाले. जगभरात प्रत्येकाच्या खिशात आज मोबाईल असतो. याच मोबाईलचा वापर शत्रूपक्ष करत असेल तर ती एक चिंताजनक व धक्कादायक बाब बनली आहे.
मोसादच्या नव्या युद्ध तंत्राचा फटका हिजबुल्ला संघटनेशी संबंध असलेल्या अतिरेकी आणि समर्थकांसोबत झालेला आहे. मोबाईल फोनचा वापर केल्यामुळे हिजबुल्ला दहशतवाद्यांचा ठावठिकाणा शोधून काढण्यास इस्त्रायली सेनेला सोपे जात असल्याने या संघटनेने त्यांच्यासाठी पेजरची व्यवस्था केली होती. त्याचाच फायदा मोसादने उठविला. पेजर फोन केवळ लिखीत संदेश पाठविण्यासाठी वापरत असल्याने त्याचा फायदा मोसाद उठवू शकणार नसल्याचे हिजबुल्ला नेतृत्वाने गृहीत धरले होते. पण मोसादने पेजर वापरणाऱ्यांचा माग काढून त्यांच्या बॅटरीत स्फोटकं बसविण्यात आपली चलाखी दाखविली. पेजर फोनचा धमाका झाल्यामुळे केवळ 9 अतिरेक्यांचा बळी गेला असला तरी हजारोंचे अवयव तुटून पडल्यामुळे ते गंभीर जखमी अवस्थेत इस्पितळात उपचार करून घेत आहेत. त्यामुळे बळी गेलेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
पेजर फोनच्या धमाक्यात मृत्यूमुखी पडलेल्या हिजबुल्ला समर्थक लेबनीझ खासदाराच्या मुलाच्या अंत्ययात्रेत हजारोंच्या संख्येने सहभागी झालेल्या हिजबुल्लाच्या सदस्यांच्या हातातील वॉकीटॉकीमध्ये स्फोट घडवून आणण्यास सुरुवात केल्याने मोठी अफरातफरी माजली. हिजबुल्लाच्या अतिरेक्यांचे हात फूटून गेले. अचानक झालेल्या हल्ल्याने सध्या लेबनॉनमध्ये खळबळ माजली आहे. हिजबुल्ला गटापाशी दळणवळणाची साधने नाहिशी झालेली आहेत. ज्या वस्तूमध्ये इलेक्ट्रॉनचा समावेश आहे, अशा वस्तूंना इस्त्रायलने आपले लक्ष्य केलेले
आहे.
सिरीयामध्ये सोलर पॅनलमध्ये मोसादने स्फोट घडवून आणण्यास सुरुवात केलेली आहे. त्यामुळे सिरीयातील अनेक शहरातील छप्परावर बसविलेल्या सोलार पॅनलमध्ये स्फोट झाल्याने घरे आणि इमारतींना आगी लागण्याचे प्रकार दिसू लागले. सिरीयाने हमास प्रमुखांच्या हत्येनंतर इस्त्रायलवर हल्ले करण्यासाठी पावले उचलण्यास सुरुवात केली होती. त्यासाठी हिजबुल्ला व अन्य अतिरेकी गटांना सिरीयाचे राष्ट्राध्यक्ष बशर अल् अशद यांनी पाठबळ देण्याचा निर्णय घेतला होता. सिरीयाला इस्त्रायलवर हल्ले करण्यापासून रोखण्यासाठीच तेथील सोलार पॅनलमध्ये धमाके घडवून मोसादने अशद सरकारला थेट इशारा दिलेला आहे.
इस्त्रायलने युद्ध तंत्राला आता नवा आयाम दिलेला आहे. भविष्यातील युद्धशास्त्राची ही नांदीच म्हणावी लागेल. दुसऱ्या महायुद्धात जपानवर अणुबॉम्ब टाकल्यानंतर जगात अण्वस्त्र आणि क्षेपणास्त्रांचा मोठ्याप्रमाणात प्रसार होऊ लागला. अनेक देशांनी अणुबॉम्ब विकसीत करण्यास सुरुवात केलेली आहे. रशिया, चीन, अमेरिका आणि नाटो देशांनी दीर्घ पल्ल्याची क्षेपणास्त्रे विकसीत केलेली आहेत. रशिया आणि युक्रेनच्या युद्धात अणुयुद्ध होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र इस्त्रायलने पेजर फोन आणि वॉकीटॉकीचा बॉम्बप्रमाणे वापर केल्याने पुढील युद्धाचे तंत्रच बदलून टाकलेले आहे.
पंतप्रधान नेतन्याहू यांच्यावर इस्त्रायलमध्ये जबरदस्त दडपण आहे. त्याचाच परिणाम म्हणून नेतन्याहू आणि संरक्षण मंत्री यांच्यात तणाव निर्माण झालेला आहे. अकरा महिन्यांपूर्वी 7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासच्या क्षेपणास्त्रांनी इस्त्रायलचे संरक्षण कवच भेदून इस्त्रायली शहरात अफरातफरी माजविली व हमासच्या लढाक्यांनी इस्त्रायली नागरिकांचे अपहरण केले. या घटनेत जवळपास 1100 इस्त्रायली आणि विदेशी नागरिकांचा बळी गेला होता. तसेच तेथील 251 इस्त्रायली व काही विदेशी नागरिकांचे अपहरण करून हमासने गाझा पट्टीत त्यांना लपवून ठेवलेले आहे. त्यातील 30 ते 40 नागरिकांना हमासच्या अतिरेक्यांनी ठार केलेले आहे.
या सर्वांचा इस्त्रायलने टप्प्याटप्याने बदला घेण्यास सुरुवात केलेली आहे. मात्र पेजर फोन आणि वॉकीटॉकीचा बॉम्बप्रमाणे वापर करण्याचा इस्त्रायलचा युद्धशास्त्रातील डाव जगाला वेगळ्याच दिशेने घेऊन जात आहे.
- प्रशांत कामत