गाझापट्टीत इस्रायलचे शोध अभियान
ओलीस महिलेचा मृतदेह हाती, हमासचा शस्त्रसाठा हस्तगत, पाणी-विजेची तीव्र टंचाई
वृत्तसंस्था / तेल अवीव
इस्रायलने गाझापट्टीतील सर्वात मोठे रुग्णालय अल्शिफावर पूर्णत: नियंत्रण मिळविले असून त्या परिसरात व्यापक शोध अभियान हाती घेतले आहे. या परिसरात आतापर्यंत मोठा शस्त्रसाठा इस्रायली सैन्याच्या हाती लागला असून हमास दहशतवाद्यांच्या काही भुयारांचाही पत्ता लागला असल्याची माहिती देण्यात आली आहे. तथापि, संपूर्ण गाझापट्टीत आता पाणी, वीज आणि अन्न यांची तीव्र टंचाई निर्माण झाली असून परिस्थिती हाताबाहेर गेल्याचा दावा रेडक्रॉसने केला आहे.
इस्रायलच्या सेनेने गाझा शहरात खोलवर मुसंडी मारली आहे. शिफा रुग्णालयात हमासचे मुख्यालय असून त्याचे अवशेष सेनेकडून शोधले जात आहेत. भुयारे आणि शस्त्रांस्त्रांच्या साठ्यांचे पुरावे मिळालेले आहेत. तथापि, येथे मुख्यालय असल्याचे पुरावे अद्याप मिळालेले नाहीत, असे पॅलेस्टाईन प्रशासनाचे म्हणणे आहे.
केवळ 10 टक्के अन्न
गाझा पट्टीला प्रतिदिन आवश्यक असणाऱ्या अन्नापैकी केवळ 10 टक्के अन्नाचा पुरवठा होत आहे. येथील 23 लाख निवासींना आता अन्नाची तीव्र टंचाई भेडसावत आहे. लाखो लोकांवर अर्धपोटी राहण्याची वेळ आली आहे. अन्न, पाणी आणि औषधे यांचा त्वरित पुरवठा न झाल्यास हजारो लोकांचा मृत्यू होण्याची शक्यता संयुक्त राष्टसंघाच्या आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
संपर्क व्यवस्था कोलमडणार
गाझातील लोकांपर्यंत अन्न आणि औषधे पुरविण्यासाठी आवश्यक असणारी संपर्क यंत्रणा पूर्णपणे कोलमडण्याच्या बेतात आहे. आणखी दोन-तीन दिवस असेच गेल्यास ती पूर्णत: बंद होईल. त्यानंतर या प्रदेशात हाहाकार उडण्याची शक्यता आहे, असे प्रतिपादन आरोग्य यंत्रणेकडून करण्यात आले आहे.
इस्रायलचा प्रस्ताव
दक्षिण गाझातील भूमध्य समुद्रतटानजीक असलेल्या मिसावा या गावात सर्व पॅलेस्टाईनींना हलवावे. तेथे त्यांना पुरेसे अन्नपाणी देता येणे सोयीचे होईल, असा प्रस्ताव इस्रायलने दिला आहे. तथापि, तो संयुक्त राष्ट्रसंघाच्या संस्थांनी फेटाळला आहे. या एका शहरात विस्थापितांची व्यवस्था करणे अशक्य आहे. तेथेही याच समस्या उद्भवतील, असे कारण या संस्थानी पुढे केले आहे.
हिजबुल्लावरही कारवाई
उत्तर इस्रायलच्या सीमेवर इस्रायलने इराण समर्थित हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या अनेक ठिकाणांवर आणि तळांवर गेल्या दोन दिवसांपासून हल्ले केले आहेत. त्यात 15 हून अधिक दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याचे प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात आले आहे. हिजबुल्लाची अनेक शस्त्रागारेही उद्ध्वस्त करण्यात आल्याचे प्रतिपादन इस्रायलकडून करण्यात येत आहे.
दहशतवादी बळकावितात अन्न
जे अन्न, पाणी आणि औषधे गाझात येत आहे, त्यापैकी बराचसा भाग दहशतवाद्यांकडून बळकाविला जातो. त्यामुळे सर्वसामान्य लोकांपर्यंत बराच कमी भाग पोहचतो. दहशतवादी स्वत:च्या संरक्षणासाठी या उपाशी लोकांचा मानवी ढाल म्हणून उपयोग करीत आहेत. लहान मुलांचा उपयोगही अशा प्रकारे होत आहे. त्यामुळे सर्वच बाजूंनी सर्वसामान्यांची कोंडी होत असल्याचेही गाझा प्रशासनाचे म्हणणे आहे. यावर उपाय शोधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
लष्करी व्यवस्था उद्ध्वस्त
हमासची लष्करी व्यवस्था उत्तर गाझापट्टी भागातून उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे, असे प्रतिपादन इस्रायल सेनेच्या प्रवक्त्याने केले आहे. हमास या दहशतवादी संघटनेची संपर्क यंत्रणा, शस्त्रास्त्रांची कोठारे आणि उत्तर गाझातील बहुतेक भुयारे नष्ट करण्यात आली असून उत्तर गाझावर इस्रायलचे पूर्ण नियंत्रण लवकरच प्रस्थापित होईल, असेही प्रतिपादन सेना प्रवक्ते हगारी यांच्याकडून करण्यात आले.
युद्ध आघाडीवर दिवसभरात...
ड इस्रायलची गाझापट्टीत आणि गाझा शहरात खोलवर मुसंडी
ड संपूर्ण गाझा पट्टीत आता अन्न आणि पाण्याची तीव्र टंचाई
ड संयुक्त राष्ट्रसंघाकडून तात्पुरत्या युद्धविरामाची पुन्हा मागणी
ड हमासचे मुख्यालय असणाऱ्या परिसराची इस्रायलकडून पाहणी