इस्रायलचा बैरुतवर जोरदार हल्ला
हिजबुल्लाचे शस्त्रभांडार उद्ध्वस्त, 15 ठार
वृत्तसंस्था / जेरुसलेम
लेबनॉनची राजधानी बैरुतवर इस्रायलने मोठा वायुहल्ला केला आहे. या हल्ल्यात हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेचे शस्त्रभांडार उद्ध्वस्त करण्यात आले. तसेच या संघटनेचे 15 हून अधिक हस्तक या हल्ल्यात ठार झाल्याची माहिती देण्यात आली आहे. हिजबुल्लाच्या शस्त्रसाठ्याची अचूक माहिती इस्रायलच्या गुप्तचरांनी पुरविली होती. या माहितीच्या आधारावर शुक्रवारी हा हल्ला करण्यात आला.
अमेरिकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक पार पडल्यापासून इस्रायलने हिजबुल्ला आणि हमास या दहशतवादी संघटनांविरोधातली कार्यवाही काहीशी मंद केली होती. या काळात हिजबुल्लाने इस्रायलवर अग्निबाण आणि ड्रोनचे हल्ले केले होते. मात्र, या हल्ल्यांमध्ये इस्रायलची फारशी हानी झाली नव्हते. तथापि, आता इस्रायलने पुन्हा हिजबुल्लाला लक्ष्य करण्यास प्रारंभ केल्याचे या हल्ल्यावरुन स्पष्ट होत आहे. हमासवरही इस्रायलने गेल्या दोन दिवसांमध्ये अचूक हल्ले केले आहेत.
नागरी भागांमध्ये तळ
बैरुतच्या नागरी वस्त्यांमध्ये हिजबुल्ला या संघटनेने आपले तळ आणि शस्त्रसाठे केले आहेत. इस्रायलला या साठ्यांवर हल्ले करता येऊ नयेत म्हणून ही उपाययोजना या संघटनेकडून केली जाते. नागरी वस्त्यांवर हल्ले झाल्यास सर्वसामान्य नागरिकांची जीवितहानी होते आणि त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर त्याची तीव्र प्रतिक्रिया उमटून असे हल्ले करणाऱ्या सेनांवर दबाव येतो. त्यामुळे दहशतवादी संघटना सर्वसामान्यांची ढाल पुढे करुन आपले कारनामे करत असतात. मात्र, इस्रायलच्या गुप्तचरांनी अचूक माहिती दिल्याने सर्वसामान्यांची फारशी जीवितहानी न होताही इस्रायलने आपले लक्ष्य साध्य केले आहे, असे प्रतिपादन इस्रायली सेनेच्या प्रवक्त्याने या हल्ल्यानंतर केले आहे.
हानी टाळण्यासाठी उपाययोजना
हिजबुल्लावर हल्ला करण्याआधी इस्रायलने दक्षतापूर्वक योजना केली होती. नागरिकांची हानी कमीतकमी व्हावी, अशा प्रकारे हल्ल्याचे स्वरुप ठेवण्यात आले होते. त्यामुळै हिजबुल्लाचे मोठे नुकसान झाले असले तरी, सर्वसामान्यांना फारसा त्रास झालेला नाही, असे इस्रायलचे म्हणणे आहे. हिजबुल्लाने अद्याप यावर त्याची प्रतिक्रिया दिलेली नाही, इराणनेही या हल्ल्यासंबंधात मौन पाळले आहे.
अमेरिकेची शांती योजना
अमेरिकेच्या जेसेफ बायडेन प्रशासनाने इस्रायल आणि हमास तसेच हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष थांबविण्यासाठी एक योजना सज्ज केली असून ती संबंधितांना पाठविली आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. सर्व बाजूंचा सन्मान राखला जाईल, अशाप्रकारे ही योजना बनविण्यात आली आहे, असे प्रतिपादन करण्यात येत आहे. अमेरिकेत अद्यापही जोसेफ बायडेन यांचेच प्रशासन आहे. भावी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प 20 जानेवारीला राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेणार आहेत. त्यानंतर ते इस्रायलसंबंधी कोणते धोरण अवलंबितात यासंबंधी उत्सुकता आहे.