विधेयकाची प्रत फाडून सभागृहात हाका नृत्य
न्युझीलंडची महिला खासदार पुन्हा चर्चेत
वृत्तसंस्था/ वेलिंग्टन
न्युझीलंडच्या संसदेत गुरुवारी वेगळाच प्रकार दिसून आला, तेथे एक अनोखे निदर्शन पाहण्यास मिळाले. संसदेतील सर्वात युवा खासदार हाना-रावहिती यांनी एका विधेयकाला विरोध करत सभागृहातच हाका नृत्य केले आहे. हे विधेयक ब्रिटन आण माओरी समुदायादरम्यान झालेल्या एका कराराशी संबंधित आहे.
संबंधित विधेयकावर मतदान करण्याप्रसंगी 22 वर्षीय माओरी खासदाराने पारंपरिक माओरी हाका नृत्य करत करत विधेयकाची प्रत फाडली आहे. सभागृहातील अन्य सदस्य आणि प्रेक्षक दालनात बसलेले लोक हाना-रावहिती करियारीकी मॅपी-क्लार्कसोबत हाका नृत्य करू लागले. यामुळे सभापती गेरी ब्राउनली यांनी सभागृहाचे कामकाज काही काळासाठी स्थगित केले.
1840 मधील वेटांगी करार हा सरकार आणि माओरी समुदायामधील संबंधांना निर्देशित करतो. यात आदिवासी समुहांना ब्रिटिश प्रशासनाला सत्ता सोपविण्याच्या बदल्यात स्वत:ची भूमी कायम राखणे आणि स्वत:च्या हितसंबंधांचे रक्षण करण्याचे व्यापक अधिकार देण्यात आले आहे. हे अधिकार सर्व न्यूझीलंडवासीयांकरता देखील लागू होणार असे विधेयकात नमूद आहे. वादग्रस्त विधेयकाला फारच कमी प्रमाणात समर्थन मिळाल्याने ते संमत होण्याची शक्यता नसल्याचे मानले जात आहे. न्युझीलंडमध्ये हजारो नागिरक या विधेयकाच्या विरोधात देशभरात यात्रा करत आहेत.
हाना-रावहिती करियारीकी मॅपी-क्लार्क या न्युझीलंडच्या सर्वात युवा खासदार आहेत. 22 वर्षी खासदार संसदेत माओरी पार्टीचे प्रतिनिधित्व करतात. हाना यांनी न्युझीलंडच्या संसदेतील स्वत:च्या पहिल्या भाषणात पारंपरिक हाका नृत्य सादर केले होते. हाना यांनी तत्पूर्वी सर्वाधिक काळ खासदार राहिलेल्या नानिया महुता यांना पराभूत केले होते. हाका एक युद्धगीत असून जे पूर्ण शक्ती आणि भावासोबत केले जाते.