इस्रायलचा इराणला थेट इशारा
हमासनंतर इतरही हस्तक संघटनांचा नाश करणार
वृत्तसंस्था / जेरुसलेम
तात्पुरती शस्त्रसंधी म्हणजे युद्धाची समाप्ती नव्हे, असा स्पष्ट इशारा इस्रायलने इराणला दिला आहे. तसेच हमासच्या नाश केल्याशिवाय युद्ध थांबविणार नाही. तसेच हमासनंतरही इराणच्या हस्तक म्हणून ज्या संघटना दहशतवाद माजविण्याचे काम करीत आहेत, त्यांनाही नष्ट केले जाईल, असे या देशाने स्पष्ट केले आहे.
हमासला इराण साहाय्य करीत आहे. हमासच्या माध्यमातून इस्रायलला संपविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तथापि, इस्रायल केवळ हमासच नव्हे, तर इराण पोसत असलेल्या प्रत्येक दहशतवादी संघटनेचा नायनाट करुनच विश्रांती घेणार आहे, असे इस्रायली सेनेचे प्रवक्ते जोनाथन कॉन्रिकस यांनी प्रतिपादन केले आहे. हा माझा तेहरानच्या मुल्लांना इशारा आहे, असे त्यांनी म्हटले आहे.
इराणची धमकी
इराणने गुरुवारी इस्रायल आणि अमेरिकेला धमकी दिली होती. गाझा पट्टीतून लवकरच इस्रायलच्या सैनिकांची हकालपट्टी केली जाईल, तसेच अमेरिकेला धूळ चारली जाईल, अशी भाषा त्यांनी उपयोगात आणली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून शुक्रवारी इस्रायलच्या सेना प्रवक्त्याने इस्रायलची योजना स्पष्ट केली आहे.