इस्रायलचा बेरूतवर हल्ला
ड्रोन हल्ल्याला प्रत्युत्तर : दहियाह परिसर रिकामा करण्याचे आदेश; हिजबुल्लाहने मोठी चूक केल्याचा नेतान्याहूंचा इशारा
वृत्तसंस्था/ तेल अवीव
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या निवासावर शनिवारी झालेल्या ड्रोन हल्ल्यानंतर इस्रायलने लेबनॉनमधील हिजबुल्लाहच्या ठाण्यांवर हल्ला केला आहे. इस्रायली सैन्य लेबनॉनमध्ये आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई करत आहे. हिजबुल्लाहने इस्रायलच्या उत्तरेकडील भागांवरही अनेक रॉकेट हल्ले केले आहेत. याचदरम्यान नेतान्याहू यांनी आपल्या निवासावरील हल्ल्याला हिजबुल्लाहची मोठी चूक म्हटले आहे. आपल्या हत्येचा हा प्रयत्न हिजबुल्लाहला उद्ध्वस्त होण्यापासून रोखू शकत नाही, असा इशारा नेतान्याहू यांनी दिला.
हिजबुल्लाहने नेतान्याहू यांच्या होम टाऊन सिसेरियाला ड्रोनने लक्ष्य केले होते. इस्रायलच्या पंतप्रधान कार्यालयाने (पीएमओ) हल्ल्याला दुजोरा दिला आहे. या हल्ल्यात पंतप्रधान नेतान्याहू यांचे वैयक्तिक निवासस्थान लक्ष्य करण्यात आल्याचे पीएमओने म्हटले आहे. हल्ल्याच्या वेळी नेतान्याहू आणि त्यांची पत्नी सारा घरी नसल्यामुळे कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. हिजबुल्लाहने डागलेली ड्रोन सिझेरिया येथील एका इमारतीवर पडले. इस्रायली संरक्षण दलाने (आयडीएफ) दिलेल्या माहितीनुसार, लेबनॉनमधून इस्रायलवर 3 ड्रोन डागण्यात आले. त्यापैकी इस्रायली सैन्याने 2 ड्रोन पाडले.
दहियाह परिसर रिक्त करण्याचा आदेश
इस्रायली लष्कराने लेबनॉनची राजधानी बेरूतमधील दहियाह परिसर तात्काळ रिकामा करण्यास सांगितले आहे. आयडीएफने येथील दोन इमारतींना लक्ष्य करण्यास सांगितले आहे. इस्रायलने या इमारतींचे वर्णन हिजबुल्लाहचे अ•s असे केल्यामुळे त्या इमारतींजवळ राहणाऱ्या लोकांना किमान 500 मीटर दूर जाण्यास सांगण्यात आले आहे.
गाझामध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 73 ठार
गाझाच्या उत्तरेकडील बीट लाहिया भागात इस्रायलने केलेल्या हल्ल्यात 73 लोकांचा मृत्यू झाला आहे. तसेच शेकडो लोक अजूनही ढिगाऱ्याखाली अडकले आहेत. गाझाच्या राज्य माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ल्याच्या ठिकाणी बचावकार्य सुरू आहे. मात्र, मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो. इस्रायली लष्कराने गाझाच्या उत्तरेकडील भागात 16 दिवसांपासून नाकाबंदी केल्यामुळे अन्न, पाणी आणि औषधांचा पुरवठा खंडित झाला आहे. त्याचवेळी दक्षिण गाझामधील खान युनिसमध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये चार अभियंते आणि एका कर्मचाऱ्याचा समावेश आहे. ते सर्व पायाभूत सुविधांच्या दुऊस्तीच्या कामात गुंतले होते.