अरुगमसंबंधी इस्रायलचा सतर्कतेचा इशारा
स्वत:च्या नागरिकांना त्वरित बाहेर पडण्याची सूचना : अमेरिकेकडूनही खबरदारीचे पाऊल : दोन दहशतवाद्यांना अटक
वृत्तसंस्था/कोलंबो
इस्रायलने स्वत:च्या नागरिकांना विदेशातील काही पर्यटन क्षेत्रांमधून त्वरित बाहेर पडण्याची सूचना केली आहे. दक्षिण श्रीलंकेत दहशतवादी हल्ला होण्याची शक्यता असल्याचे इनपूट इस्रायलला मिळाले आहेत. हा इशारा हिंदी महासागरात श्रीलंकेच्या एका सुंदर अरुगम किनारी क्षेत्रावरून आहे. इस्रायलने धोक्याच्या अचूकतेविषयी सांगणे टाळले आहे, परंतु अरुगम समवेत श्रीलंकेच्या उर्वरित हिस्स्यांमध्ये इस्रायली नागरिकांना सतर्क राहणे आणि खुल्या जागेत मोठा कार्यक्रम आयोजित करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे. असाच इशारा अमेरिका आणि जर्मनीने जारी करत स्वत:च्या नागरिकांना त्वरित अरुगम सोडण्याचे आवाहन केले. भारताने पुरविलेल्या इनपूटच्या आधारावर श्रीलंकेत दोन दहशतवाद्यांना अटक करण्यात आली आहे. यातील एक जण इराकमध्ये वास्तव्यास होता. भारताच्या मदतीमुळे श्रीलंकेला त्वरित कारवाई करता आली आहे. अरुगम खाडीला स्थानिक लोक अरुगम कुदाह नावाने ओळखतात. श्रीलंकेच्या दक्षिण पूर्व किनाऱ्याच्या ड्राय एरियात हिंदी महासागरावर हे स्थित आहे. प्राचीन बट्टिकलोआ क्षेत्राच्या एका ऐतिहासिक कराराच्या अंतर्गत हे श्रीलंकेला मिळाले होते.
हत्तींचा अधिवास
अरुगमची खाडी बट्टिकलोआपासून 117 किलोमीटर तर कोलंबोपासून 320 किलोमीटर अंतरावर आहे. याचे निकटवर्तीय गाव मुस्लीमबहुल असून त्याचे नाव पोट्टुविल आहे. हे गाव व्यवसाय आणि वाहतुकीचे केंद्र आहे. या क्षेत्राला कुमाना नावानेही ओळखतात. स्थानिक क्षेत्र हे अनेक हत्तींचा अधिवास आहे. अरुगम क्षेत्राच्या मुख्य वस्तीला उल्लाए नावाने ओळखले जाते. येथे मुस्लीम लोकसंख्या अधिक आहे. तर गावाच्या दक्षिणेत श्रीलंकन तमिळ आणि सिंहली लोकांचे वास्तव्य आहे. तसेच येथे आता मोठ्या प्रमाणात आंतरराष्ट्रीय नागरिक दिसून येतात. जे मुख्यत्वे युरोप अणि ऑस्ट्रेलियातून आलेले आहेत.
इस्रायली पर्यटकांचे आकर्षणाचे केंद्र
अरुगम खाडी इस्रायली पर्यटकांसाठी एक लोकप्रिय स्थळ आहे. तेथे अनेक रेस्टॉरंट, स्पा आणि अन्य दुकानांवर हिब्रू फलक दिसून येतात. इस्रायली पर्यटकांनी क्षेत्रात एक प्रार्थनास्थळही स्थापन केले आहे. अरुगममध्ये सर्फिंग करण्यासाठी युरोप, अमेरिका आणि इस्रायलमधून पर्यटक येत असतात.
अमेरिकन दूतावासाकडून इशारा
श्रीलंकेतील अमेरिकन दूतावासाने एक सुरक्षा इशारा जारी केला आहे. अरुगम खाडी क्षेत्रात लोकप्रिय पर्यटनस्थळांना लक्ष्य करत दहशतवाद्यांकडून हल्ले होण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत अमेरिकन नागरिकांनी पुढील माहितीपर्यंत अरुगम खाडी क्षेत्रापासून दूर राहण्याचे आवाहन केले जात आहे असे अमेरिकेच्या दूतावासाने म्हटले आहे.
त्वरित सोडा किनारी क्षेत्र
जर्मनीच्या विदेश मंत्रालयाने देखील पर्यटनस्थळांवर संभाव्य हल्ल्यांचा संकेत देत स्वत:च्या नागरिकांना लवकरात लवकर अरुगम समवेत किनारी पर्यटन क्षेत्रातून बाहेर पडण्याचे आवाहन केले आहे. दहशतवादी हल्ल्यापासून वाचण्यासाठी शक्य तितक्या लवकर अन्यत्र जाण्याची सूचना करण्यात आली आहे.
हिब्रूयुक्त टी-शर्ट घालू नका
इस्रायली तसेच अमेरिकन नागरिकांनी स्वत:ची ओळख दर्शविणाऱ्या कुठल्याही गोष्टीचा वापर उघडपणे करू नये असे अमेरिका आणि इस्रायलने स्वत:च्या इशाऱ्यात म्हटले आहे. हिब्रू लिपी असलेला टी-शर्ट किंवा ज्यू धर्माचे प्रतीक दर्शविणारा पोशाख परिधान न करण्याची सूचना करण्यात आली आहे.
मोठ्या संख्येत पोलीस तैनात
श्रीलंकेत अरुगम भागात मोठ्या संख्येत पोलीस तैनात करण्यात आले आहेत. सर्व यंत्रणांना हायअलर्ट देण्यात आला आहे. भागातील सुरक्षा वाढविण्यात आली आहे. इस्रायली पर्यटकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आम्ही अत्यंत दक्षपणे काम करत आहोत, असे पोलीस प्रवक्ते निहाल थल्दुवा यांनी म्हटले आहे.