For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इराणच्या आण्विक तळाजवळ इस्रायलचा क्षेपणास्त्रहल्ला?

06:32 AM Apr 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
इराणच्या आण्विक तळाजवळ इस्रायलचा क्षेपणास्त्रहल्ला
Advertisement

खमेनींना थेट संदेश, कुठेही कहर करण्याचा इशारा

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

इराणने केलेल्या हल्ल्यानंतर 6 दिवसांनी शुक्रवारी सकाळी इस्रायलने प्रत्युत्तर दिले. इस्रायलने इराणच्या आण्विक तळाचे शहर इस्फहानला लक्ष्य केले. इराणच्या एअरबेसवर हा हल्ला झाल्याचे टाईम्स ऑफ इस्रायलने म्हटले आहे. याशिवाय इराक आणि सीरियामध्येही हवाई हल्ले करण्यात आले आहेत. मात्र, इस्रायलने या हल्ल्याबाबत अधिकृतपणे भाष्य न केल्याने संभ्रमावस्था कायम आहे.

Advertisement

इस्फहानमध्ये इराणची नतान्झसह अनेक आण्विक क्षेत्रे आहेत. या भागालाच टार्गेट करत इस्रायलने इराणला ‘आम्ही कुठेही हल्ला करू शकतो’ असा स्पष्ट संदेश दिला आहे. इराणचे सर्वोच्च नेते अली खमेनी यांच्या वाढदिवसालाच हा हल्ला झाला. इराणच्या फार्स न्यूज एजन्सीनेही स्फोटांचे आवाज ऐकल्याचे वृत्त दिले आहे. मात्र, इराणने इस्फहानमध्ये 3 ड्रोन पाडल्याचे सांगितले आहे. यापूर्वी 13 एप्रिल रोजी इराणने इस्रायलवर 300 हून अधिक क्षेपणास्त्रे आणि ड्रोनने हल्ला केला होता. हा हल्ला रोखण्यासाठी फ्रान्स, ब्रिटन आणि अमेरिकेने इस्रायलला मदत केली. इराणचे 99 टक्के हल्ले थांबवण्यात आल्याचे इस्रायलने म्हटले होते. इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलने बदला घेण्याचा इशारा दिला होता. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी प्रतिशोधात्मक कारवाई करण्यासाठी युद्ध मंत्रिमंडळाच्या 5 बैठका घेतल्या होत्या.

इराण-इस्रायल संघर्ष नव्या वळणावर

इराणच्या हल्ल्यानंतर इस्रायलनेही प्रत्युत्तर दिल्यामुळे दोन्ही देश युद्धाच्या उंबरठ्यावर उभे आहेत. मात्र, सध्या तरी युद्धाची शक्मयता नाही. इस्रायलने इराणवर मोठा हल्ला केलेला नाही. तसेच हा हल्ला आपल्या बाजूने झाल्याचे इस्रायलनेही मान्य केलेले नाही. साहजिकच इराण आजच्या हल्ल्याचा बदला घेणार नाही. हल्ल्याचा उद्देश केवळ इराणला हानी पोहोचवणे हा नव्हता तर केवळ इशारा देणे हा होता. इराणचा हल्ला आणि इस्रायलचा पलटवार यावरून असे दिसते की दोन्ही देशांचे उद्दिष्ट केवळ संदेश पाठवण्यापुरतेच मर्यादित असल्याचा तज्ञांचा दावा आहे. तरीही दोन्ही देशांमधील संघर्ष आता नव्या वळणावर असल्याचे दिसत आहे.

एअर इंडियाने उड्डाणे रोखली

इस्रायलने शुक्रवारी इराणवर केलेल्या हल्ल्यामुळे एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी उड्डाणे 30 एप्रिलपर्यंत रद्द केली आहेत. कंपनीने एक निवेदन जारी करून मध्यपूर्वेतील परिस्थितीमुळे तेल अवीवमधून जाणारी उड्डाणे 30 एप्रिल 2024 पर्यंत स्थगित राहतील, असे स्पष्ट केले. आम्ही परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहोत. परिस्थिती पूर्वपदावर आल्यास सेवा सुरू केली जाईल. मात्र, विमानफेऱ्या रद्द झाल्यास तिकीट आरक्षित केलेल्या प्रवाशांना त्यांची तिकीट रक्कम परत केली जाईल, असेही सांगण्यात आले.

Advertisement
Tags :

.