इस्रायलच्या कमांडोंनी एका ओलिसाला वाचविले
गाझाच्या भुयारांमध्ये राबविली मोहीम : हमासच्या तावडीतून सोडविण्यास यश
वृत्तसंस्था/तेल अवीव
इस्रायलच्या सैन्याने एका विशेष मोहिमेत हमासच्या कब्जातील इस्रायली ओलिसाला मुक्त करविण्यास यश मिळविले आहे. 52 वर्षीय कायद फरहान अलकादीला दक्षिण गाझा पट्टीत राबविण्यात आलेल्या एका मोहिमेंतर्गत सोडविण्यात आले आहे. अलकादीला मागील वर्षी 7 ऑक्टोबर रोजीच्या हल्ल्यादरम्यान हमासच्या दहशतवाद्यांनी ताब्यात घेतले होते. 10 महिन्यांपेक्षा अधिक काळापर्यंत कैदेत राहिल्यावर दहशतवादी गटाच्या एका भुयारातून आयडीएफच्या विशेष पथकांनी त्याला सुरक्षित बाहेर काढले आहे.
आयडीएफने ओलीस आणि सैन्याच्या सुरक्षेचे कारण देत मोहिमेची अधिक माहिती देणे टाळले आहे. कायद फरहाद अलकादी हा अरब बेडॉइन समुदायाशी संबंधित आहे. 7 ऑक्टोबर रोजी हल्ल्याच्या दिवशी तो गाझाच्या सीमेपासून 5 किलोमीटर अंतरावरील किबुत्ज मॅगनमध्ये पॅकिंग फॅक्ट्रीत सुरक्षारक्षक म्हणून काम करत होता. हमासच्या दहशतवाद्यांनी त्याचे अपहरण करत अन्य ओलिसांसोबत त्याला गाझा येथे नेले होते. अलकादीला दोन पत्नी आणि 11 मुलं आहेत.
आयडीएफ प्रवक्ते रियल अॅडमिरल डॅनियर हगारी यांनी या मोहिमेला साहसी आणि जटिल संबोधिले. अचूक आणि गुप्त माहितीच्या आधारावर अलकादीला कैदेत ठेवण्यात आलेल्या ठिकाणी सैनिक पोहोचले होते. सैनिकांना अलकादी हा भूमिगत भुयारांमध्ये आढळून आल्याचा दावा हगारी यांनी केला आहे. आयडीएफ अनेक दिवसांपासून दक्षिण गाझापट्टीच्या एका भागावर लक्ष केंद्रीत करून होते. गुप्तचरांकडून संबंधित भागात ओलिसांना ठेवले गेल्याचे कळले होते. शायेट 13 कमांडो आणि शिन बेटच्या एजंट्सनी या भागातील भुयारांमध्ये शोध घेतला असता अलकादी आढळून आले. तेथे अन्य कुणी ओलीस तसेच हमासचे दहशतवादी आढळून आले नाहीत, यामुळे सैनिकांना कुठल्याही प्रतिकाराला सामोरे जावे लागले नाही.