इस्रायल ईशान्य भारतातील 5,800 यहुदींना नेणार
प्रस्तावाला मान्यता : 240 कोटी रुपये खर्च होणार
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
इस्रायल सरकारने पुढील पाच वर्षांत (2030 पर्यंत) भारताच्या ईशान्य राज्यांमध्ये राहणाऱ्या उर्वरित 5,800 बनी मेनाशे ज्यूंना इस्रायलमध्ये आणण्याच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हा निर्णय समुदायाला त्यांच्या ऐतिहासिक मातृभूमीत पुनर्वसन करण्याच्या दीर्घकालीन प्रक्रियेतील एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. इस्रायल सरकारने या महत्त्वपूर्ण आणि व्यापक उपक्रमाला अधिकृतपणे मान्यता दिली आहे.
इस्रायल सरकारने संमत केलेल्या उपक्रमांतर्गत ईशान्य भारतात राहणाऱ्या 5,800 लोकांना इस्रायलमध्ये नेले जाणार आहे. हे पाऊल समुदायाची अनेक दशकांपासूनची जुनी इच्छा पूर्ण करण्यासोबतच इस्रायलच्या लोकसंख्याशास्त्र, सामाजिक रचना आणि सांस्कृतिक विविधतेवर महत्त्वपूर्ण परिणाम करणारे मानले जाते. या निर्णयामुळे भारत आणि इस्रायलमधील सामाजिक-सांस्कृतिक संबंध आणखी मजबूत होतील. या योजनेसाठी अंदाजे 240 कोटी रुपये इतके विशेष बजेट राखून ठेवण्यात आले आहे. लोकांची उ•ाण व्यवस्था, निवास व्यवस्था, हिब्रू भाषा प्रशिक्षण, धार्मिक शिक्षण आणि एकात्मता कार्यक्रम यावर हा निधी खर्च केला जाईल. पुढील वर्षी, म्हणजे 2026 मध्ये 1,200 सदस्यांना इस्रायलमध्ये आणण्याच्या प्रक्रियेलाही पूर्वमंजूर करण्यात आली आहे. भारताच्या ईशान्य भागात प्रामुख्याने मणिपूर आणि मिझोरममध्ये राहणारा बनी मेनाशे समुदायाने त्यांच्या ज्यू परंपरा, सण आणि धार्मिक रीतिरिवाज फार पूर्वीपासून जपले आहेत.