इस्रायलने पाकिस्तानला शिकवला धडा
संयुक्त राष्ट सुरक्षा परिषद बैठकीत पाकिस्तानचे दुतोंडी राजकारण पाडले उघडे, बोलती केली बंद
वृत्तसंस्था / संयुक्त राष्ट्रसंघ (न्यूयॉर्क)
दहशतवादाच्या मुद्द्यावर इस्रायलने पाकिस्तानला संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषद बैठकीत उघडे पाडले आहे. अमेरिकेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार ओसामा बिन लादेन याला पाकिस्तानने आश्रय दिला आणि तो पाकिस्तानच्या भूमीवर मारला गेला. आज हाच पाकिस्तान इस्रायलला ‘विदेशी भूमीवर का हल्ला केला’ असा प्रश्न विचारत आहे. यातून पाकिस्तानची दुतोंडी नीती स्पष्ट होते, असे दाहक बोल इस्रायलच्या प्रतिनिधीने पाकिस्तानला ऐकवले.
सुरक्षा परिषदेच्या बैठकीत शनिवारी इस्रायल आणि पाकिस्तान यांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार शब्दयुद्ध झाले आहे. इस्रायलने तीन दिवसांपूर्वी कतार या देशातील हमासच्या मुख्यालयावर जोरदार वायुहल्ला केला होता. या हल्ल्यात हमासचे अनेक प्रमुख नेते ठार झाल्याचे बोलले जात आहे. इस्रायलने कतारसारख्या विदेशी भूमीवर असा हल्ला का केला, असा प्रश्न पाकिस्तानच्या प्रतिनिधीने त्याच्या वक्तव्यात उपस्थित केला होता. त्याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलच्या प्रतिनिधींनी पाकिस्तानला दहशतवादासंबंधी दुहेरी नीतीचा अवलंब केल्याप्रकरणी धारेवर धरले. जगातील सर्वात क्रूर दहशतवादी म्हणून ओळखला जाणारा दहशतवादी ओसामा बिन लादेन हा पाकिस्तानच्या भूमीवरच मारला गेला आहे, हे पाकिस्तानने कधीही विसरु नये आणि जगाला शांततेचा दांभिक आणि शहाजोग उपदेश करु नये, असे इस्रायलच्या प्रतिनिधीने त्याच्या प्रत्युत्तरात स्पष्ट केले.
न्यूयॉर्कमध्ये बैठक
संयुक्त राष्ट्रसंघाच्या सुरक्षा परिषदेची बैठक अमेरिकेतील न्यूयॉर्क शहरात पार पडली. ही बैठक ओसामा बिन लादेनच्या सूत्रसंचालनात अमेरिकेवर झालेल्या इस्लामी दहशतवादी हल्ल्याच्या 24 व्या स्मृतीदिनी, अर्थात, गेल्या गुरुवारी पार पडली होती. या बैठकीत इस्रायल आणि पाकिस्तान यांच्यात जोरदार वादावादी झाली. पाकिस्तानचा प्रतिनिधी इफ्तिकार अहमद याने इस्रायलने कतारची राजधानी दोहा येथे केलेल्या हल्ल्यावर टीका केली. इस्रायलचा हा हल्ला अवैध आणि अकारण होता. इस्रायल हा निरंतर आक्रमण करणारा देश आहे. यामुळे मध्य आशिया क्षेत्रातील शांती भंग पावत आहे, असा आरोप त्याने केला.
गाझावरील हल्ल्यावरही टीका
इस्रायलने गाझा पट्टीवर केलेल्या हल्ल्याचीही पाकिस्तानने निंदा केली. हा हल्ला क्रूर आहे. त्यामुळे हजारोंच्या संख्येने निरपराध पॅलेस्टाईनी नागरीकांची हत्या झाली आहे. या हत्यांना इस्रायल उत्तरदायी आहे. गाझा पट्टी, येमेन, सिरीया, लेबेनॉन, इराण आणि इतर देशांवर हल्ले करुन इस्रायलने आंतरराष्ट्रीय कायदे आणि नियम यांचा भंग केला आहे, असे पाकिस्तानच्या प्रतिनिधीचे म्हणणे होते.
पाकिस्तान निरुत्तर
पाकिस्ताच्या आरोपांच्या नंतर इस्रायलनेही पाकिस्तानच्या दुतोंडी नीतीचा उल्लेख पुराव्यांच्या साहाय्याने करत पाकिस्तानची बोलती बंद केल्याचे दिसून आले. इस्रायलचे स्थायी प्रतिनिधी डॅनी डॅनन यांनी पाकिस्तानला त्याची योग्य जागा दाखवून दिली. ओसामा बिन लादेन याला पाकिस्तात मारण्यात आले. त्यावेळी पाकिस्ताने हा प्रश्न का उपस्थित केला नाही, असा प्रतिप्रश्न डॅनन यांनी उपस्थित केला. लादेन हा पाकिस्तानात कसा सापडला ?, त्याच्यासारख्या क्रूर दहशतवाद्याला पाकिस्ताने आश्रय दिलाच का अणि कसा ? अशा अनेक प्रश्नांची सरबत्ती डॅनन यांनी केली. ज्या प्रमाणे लादेन आणि त्याची दहशतवादी संघटना अल् कायदा यांना सूट मिळू शकत नाही, त्याचप्रमाणे हमास आणि या दहशतवादी संघटनेचे नेते यांनाही सूट दिली जाऊ शकत नाही, हे पाकिस्तानने लक्षात ठेवावे, अशी स्पष्टोक्ती डॅनन यांनी केली. इस्रायलच्या या युक्तीवादावर पाकिस्तानला कोणतेही प्रत्युत्तर देता आले आही, असे दिसून आले आहे.
सुरक्षा परिषदेच्या प्रस्तावाची आठवण
अमेरिकेवरील दहशतवादी हल्ल्यानंतर सुरक्षा परिषदेत संमत करण्यात आलेल्या एका प्रस्तावाचीही इस्रायलच्या प्रतिनिधींनी आठवण करुन दिली. कोणत्याही देशाने यापुढे दहशतवाद्यांना आपल्या भूमीवर आश्रय देऊ नये, असे या प्रस्तावात स्पष्ट करण्यात आले होते. पाकिस्ताननेही हा प्रस्ताव मान्य केला होता. तरीही पाकिस्तानने लादेन याला आश्रय दिल्याने पाकिस्ताननेच आंतरराष्ट्रीय नियमांचा भंग केला आहे, असा पलटवार करत डॅनन यांनी पाकिस्तानचे तोंड बंद केले.
इस्रायलचा घणाघात...
ड सुरक्षा परिषदेत दहशतवादाच्या प्रश्नावर इस्रायलचा पाकिस्तानवर घणाघात
ड पाकिस्तानची दहशतवादाच्या संदर्भात भूमिका संशयास्पद असल्याची टीका
ड इस्रायलला स्वसंरक्षासाठी दहशतवाद्यांना विदेशातही मारण्याचा पूर्ण अधिकार
ड इस्रायलने कतार येथील हमासच्या मुख्यालयावर केलेला हल्ला पूर्णत: योग्य