इस्रायलकडून पुन्हा गाझापट्टीत हल्लाबोल
हमासचा प्रमुख दाईफसह 71 जण ठार
वृत्तसंस्था/ गाझासिटी
गाझामध्ये इस्रायलची लष्करी कारवाई सुरूच आहे. इस्रायलने गाझापट्टीवर पुन्हा एकदा जोरदार हल्ला केल्याचे वृत्त समोर आले आहे. या हल्ल्यात 71 जणांचा मृत्यू झाला असून शेकडो लोक जखमी झाले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने शनिवारी अधिकृत निवेदनात ही माहिती दिली आहे. दुसरीकडे, इस्रायली अधिकाऱ्यांच्या दाव्यानुसार हमासच्या लष्करी तुकडीच्या प्रमुखाला लक्ष्य केले होते.
इस्रायलने गाझापट्टीतील खान युनिस भागात हा हल्ला केला आहे. हमासचा प्रमुख मोहम्मद दाईफच्या ठाण्यांवर हवाई हल्ले केल्याचे इस्रायली अधिकाऱ्यांनी सांगितले. मोहम्मद दाईफ हा 7 ऑक्टोबर 2023 रोजी इस्रायलवर झालेल्या हल्ल्याचा मास्टरमाईंड मानला जातो. 7 ऑक्टोबर रोजी हमासने इस्रायलमध्ये कहर केला होता. त्या काळात 1,200 लोक मारले गेले. त्यामुळे इस्रायल आणि हमास यांच्यात युद्ध सुरू झाले. इस्रायल आणि हमास यांच्यात गेल्या नऊ महिन्यांपासून युद्ध सुरू आहे. इस्रायलने हमासचा खात्मा करण्याची ठाम प्रतिज्ञा केली आहे.