स्वतंत्र पॅलेस्टाइनला इस्रायलने द्यावी मान्यता
अमेरिकेसमोर सौदी अरेबियाने केली मागणी
वृत्तसंस्था/ रियाध
पॅलेस्टाइनला जोपर्यंत स्वतंत्र देश म्हणून मान्यता मिळत नाही तोवर सौदी अरेबिया आणि इस्रायलदरम्यान कुठलेच राजनयिक संबंध प्रस्थापित होणार नसल्याचे सौदी अरेबियाकडून अमेरिकेसमोर स्पष्ट करण्यात आले आहे. इस्रायल-सौदी अरेबिया यांच्यात संबंध प्रस्थापित व्हावेत म्हणून अमेरिकेकडून प्रयत्न सुरू आहेत. परंतु जोपर्यंत पॅलेस्टिनींना त्यांचे अधिकार मिळत नाही तोवर इस्रायलसोबत संबंध प्रस्थापित करणार नसल्याचे सौदी अरेबियाने बुधवारी स्पष्ट केले आहे.
इस्रायल आणि सौदी अरेबिया यांच्यात राजनयिक संबंध प्रस्थापित करण्यासंबंधी चर्चा होणार असल्याचा दावा अमेरिकेने मंगळवारीच केला होता. या पार्श्वभूमीवर सौदी अरेबियाने इस्रायलसोबत कुठल्याही प्रकारचे संबंध प्रस्थापित करण्यास नकार दिला आहे. अमेरिकेचे विदेशमंत्री एंटनी ब्लिंकेन यांनी रियाध येथे सौदीचे युवराज मोहम्मद बिन सलमान यांची भेट घेत गाझामधील स्थितीवर चर्चा केली होती.
सौदी अरेबियाने अद्याप इस्रायलला एक देश म्हणून मान्यता दिलेली नाही. याचमुळे दोन्ही देशांदरम्यान राजनयिक संबंध नाहीत. इस्रायलने 2002 च्या अरब शांतता प्रस्तावाच्या अटी मान्य केल्या तरच त्याच्यासोबत संबंध प्रस्थापित होऊ शकतील असे सौदीचे सांगणे आहे. 1967 च्या युद्धादरम्यान कब्जा केलेल्या सर्व क्षेत्रांवरील स्वत:चे नियंत्रण इस्रायलने सोडून द्यावे, पॅलेस्टाइनला एक स्वतंत्र देश मानावे लागेल, पूर्व जेरूसलेम ही पॅलेस्टाइनची राजधानी असावी असे या प्रस्तावात नमूद होते.