एआय ह्यूमन वॉशिंग मशीन
वैशिष्ट्ये जाणून घेतल्यावर व्हाल दंग
माणसांच्या जीवनाला सुलभ करण्यासाठी बाजारात नवनवी उत्पादने सादर होत असतात. यावेळी जपानच्या नव्या नवोन्मेषात एक एआय आधारित पॉडसारखे मानव वॉशिंग मशीन सादर करण्यात आले आहे. हे यंत्र लोकांच्या हायजीनची विशेष काळजी घेणारे आहे. ओसाकामधील सायन्स कंपनीकडून निर्मित ही मशीन आरामावर भर देत लोकांच्या स्नान करण्याच्या पद्धतीला आणखी प्रभावी करण्याचे काम करते. या मशीनमध्ये स्नान करताना केवळ शरीराची सफाई होणार नाही. तर संबंधिताला 15 मिनिटांचा हा अनुभव मन शांत करणारा ठरेल असा कंपनीचा दावा आहे. कॅप्सूल सारख्या दिसणाऱ्या ह्यूमन वॉशिंग मशीनमध्ये अनेक फीचर्स आहेत. या मशीनच्या आत पाऊल ठेवताच व्यक्ती एखाद्या लढाऊ विमानाच्या कॉकपिटमध्ये दाखल झाल्यासारखे वाटते. यात माणसाला सेमी-इमर्सिव बाथ करण्याचीही संधी मिळते.
बुडबुडेयुक्त हायसपीड जेटचे काम सुरू होण्यापूर्वी वॉशिंग पॉडमध्ये गरम पाणी भरले जाते. जे अचूकपणे शरीरातील मळ हटविण्याचे काम करते. हाय स्पीड जेट स्वत:च्या ग्राहकाला क्लीन स्कीन प्रदान करते. याच्या सीटमध्ये असलेले इलेक्ट्रोड युजर्सच्या जैविक संकेतांवर नजर ठेवतात. ज्यात एआय सिस्टीम पाण्याच्या तापमानाला युजरच्या मूडनुसार मॅनेज करते. तसेच स्नान करताना समोर असलेल्या स्क्रीनवर संबंधिताच्या मूडनुसार दृश्य दाखविली जातात.
ही वॉशिंग मशीन पूर्णपणे वैयक्तिकीकृत अनुभवाला शुद्ध आणि शांत करण्यासाठी डिझाइन करण्यात आली आहे. या यंत्राद्वारे स्नान करण्याच्या प्रक्रियेत केवळ 15 मिनिटे लागणार असून कॅप्सूल आरामदायी व्हिडिओ दाखविणार आहे. तसेच नाडी अन् आरोग्य संकेतांकाच्या आधारावर तापमान मॅनेज करणार आहे.