इस्रायलकडून गाझाचा नवा नकाशा प्रसिद्ध
50 टक्के भूभागावर कब्जा : आता हीच नवी सीमा असल्याचे सैन्यप्रमुखांचे वक्तव्य
वृत्तसंस्था/ तेल अवीव
अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या गाझा शस्त्रसंधी योजनेत गाझाला विभागणाऱ्या ‘येलो लाइन’चा उल्लेख असून इस्रायलचे सैन्यप्रमुख ऐयाल जमीर यांनी आता याला नवी सीमा संबोधिले आहे. ही रेषा आता इस्रायलच्या ‘सुरक्षा सीमे’प्रमाणे काम करणार असून सैन्य याच्या मागे हटणार नसल्याचे जमीर यांनी गाझामध्ये तैनात सैनिकांशी बोलताना म्हटले आहे.
इस्रायलचे सैन्य अद्याप गाझाच्या मोठ्या हिस्स्यावर नियंत्रण राखून आहे. यात गाझाचा निम्म्यापेक्षा अधिक भूभाग, शेतीयुक्त भाग आणि इजिप्तशी जोडलेला महत्त्वपूर्ण राफा बॉर्डर क्रॉसिंगही सामील असल्याचे जमीर यांनी स्पष्ट केले. हिंसा आणि हल्ल्यामुळे बहुतांश पॅलेस्टिनी लोकांनी या भागातून यापूर्वीच स्थलांतर केले आहे. आता जवळपास 20 लाखाहून अधिक लोक गाझाच्या पश्चिम हिस्स्यातील एका छोट्याच्या भागात वास्तव्य करण्यास हतबल आहेत.
गाझाला दोन हिस्स्यांमध्ये विभागणार अमेरिका
ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी योजनेच्या अंतर्गत अमेरिका गाझापट्टीला दोन हिस्स्यांमध्ये विभागणार आहे. यासाठी एक दीर्घकालीन योजना तयार करण्यात आली आहे. एका हिस्स्यावर आंतरराष्ट्रीय दल (आयएसएफ) आणि इस्रायलच्या सैन्याचे नियंत्रण राहिल आणि याला ग्रीन झोन म्हटले जाणार आहे. पॅलेस्टिनी लोकसंख्येला दुसऱ्या हिस्स्यात राहू दिले जाणार असून याला रेड झोन नाव देण्यात आले आहे. जवळपास सर्व पॅलेस्टिनी रेडझोनमध्ये विस्थापित झाले ओत. या दोन्ही भागांदरम्यान एक ‘येलो लाइन’ निश्चित करण्यात आली आहे.
ग्रीन झोनवर इस्रायलचे नियंत्रण
गाझाच्या पूर्व हिस्स्यात ग्रीन झोन तयार करण्यात येईल, येथे इस्रायली सैनिकांसोबत विदेशी सैनिकही तैनात असतील. येथे पुनर्विकासाचे काम होणार आहे. अमेरिका येथे तैनात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांना संयुक्त राष्ट्रसंघ सुरक्षा परिषदेकडून औपचारिक मंजुरी मिळवून देण्यासाठी प्रयत्नशील आहे. योजनेनुसार येथे प्रारंभी मोजके सैनिक तैनात होतील. नंतर ही संख्या वाढवून 20,000 पर्यंत केली जाणार आहे. ग्रीन झोनच्या बाहेर जाण्याची अनुमती कुठल्याही विदेशी सैन्याला नसेल. पॅलेस्टाइनच्या नियंत्रणातील येलो लाइनच्या पश्चिमेकडील हिस्सा रेड झोन असेल. येथे कुठलेच पुनर्विकासाचे काम केले जाणार आहे. 2 वर्षांच्या युद्धात सर्वाधिक नुकसान याच भागात झाले आहे. येथे जवळपास 20 लाख लोकसंख्या अडकून पडली आहे.
इस्रायलचा निर्णय ट्रम्प यांच्या उलट
इस्रायलच्या सैन्यप्रमुखांचे वक्तव्य ट्रम्प यांच्या शस्त्रसंधी कराराच्या उलट मानले जातेय, कारण करारात इस्रायल गाझावर कब्जा करणार नाही तसेच स्वत:ची सीमा वाढविणार नसल्याचे स्पष्ट नमूद आहे. ट्रम्प यांच्या योजनेनुसार इस्रायलला हळूहळू हा भाग आंतरराष्ट्रीय सुरक्षा दलांकडे सोपवायचा असून अखेरीस गाझामधून काढता पाय घ्यावा लागणार आहे. परंतु अद्याप या सुरक्षा दलात कोणते देश सामील होण्यास तयार आहेत, हे स्पष्ट झालेले नाही. तसेच ही प्रक्रिया कधी सुरू होणार हे देखील स्पष्ट झालेले नाही. याचदरम्यान इस्रायलने ‘येलो लाइन’नजीक नव्या चौक्या स्थापन करत याला एक धोकादायक सीमा घोषित केले आहे. येथे सैनिक कुठल्याही संशयित व्यक्तीवर गोळी झाडू शकतात. अनेकदा छोटी मुले देखील या गोळीबाराचे शिकार ठरली आहेत. काही जागांवर ही रेषा खऱ्या नकाशापेक्षा अधिक पुढे वाढविण्यात आल्याने इस्रायलचे नियंत्रण आणखी फैलावले आहे.