इस्रायलकडून हुती दहशतवाद्यांवर हवाई हल्ले
वृत्तसंस्था/तेलअवीव
इस्रायलने गुरुवारी पहाटे येमेनमधील अनेक ठिकाणी हवाई हल्ले केले आहेत. येमेनच्या मोठ्या हिस्स्यावर नियंत्रण असलेल्या हुती दहशतवाद्यांच्या तळांना लक्ष्य करण्यात आल्याचा दावा इस्रायलने केला. येमेनमधून डागण्यात आलेल्या क्षेपणास्त्राच्या प्रत्युत्तरादाखल इस्रायलने ही कारवाई केली आहे. क्षेपणास्त्र हल्ल्याला प्रत्युत्तर देत इस्रायलने येमेनच्या पश्चिम किनारा आणि अंतर्गत भागांमधील हुती बंडखोरांच्या तळांवर हल्ले केले आहेत. सप्टेंबर महिन्यानंतर इस्रायलने पहिल्यांदाच येमेनमध्ये बॉम्बवर्षाव केला आहे.
इस्रायलच्या मध्य क्षेत्रात येमेनमधून क्षेपणास्त्र डागण्यात आले होते. हा हल्ला इस्रायलच्या एरो क्षेपणास्त्र सुरक्षा प्रणालीने हाणून पाडला होता. तेल अवीवनजीक रामत एफलमध्ये एका शाळेच्या मैदानात या क्षेपणास्त्राचे अवशेष कोसळले होते. यामुळे काही वाहने आणि इमारतींचे नुकसान झाले. यानंतर इस्रायलच्या वायुदलाने येमेनमध्ये हवाई हल्ले केले आहेत. हुती दहशतवादी अशा प्रकारच्या हल्ल्यानंतर वाचू शकत नाहीत, त्यांना प्रत्युत्तर मिळणारच. इस्रायलच्या दिशेने उचलला जाणारा हात तोडून टाकला जाईल असे इस्रायलचे संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज यांनी म्हटले आहे.
येमेनमध्ये हवाई हल्ले करण्याचा उद्देश हूती सैन्य क्षमता कमी करणे आणि इराणच्या शस्त्रास्त्रांची तस्करी रोखणे होता. येमेनमध्ये हूती सैन्यतळांवर आम्ही अचूक हल्ले केले आहेत. यात सना येथील बंदर तसेच ऊर्जा प्रकल्प देखील सामील आहे. हुती या ठिकाणांचा वापर स्वत:च्या दहशतवादी हल्ल्यांसाठी करतात. इस्रायलकडून स्वत:च्या नागरिकांचे रक्षण करण्यासाठी पुढील काळात देखील अशाप्रकारची कारवाई केली जाणार असल्याचे आयडीएफचे प्रवक्ते डॅनियल हगरी यांनी सांगितले.
सना शहरानजीकच्या दोन ऊर्जा केंद्रांवर इस्रायलने हल्ले केले आहेत. यामुळे आसपासच्या भागातील वीजपुरवठा ठप्प झाला आहे. रास इस्सा आणि होदेइदाह बंदरात तेल सुविधांवर हल्ले झाले आहेत, अशी माहिती येमेनमधील प्रसारमाध्यमांनी दिली आहे. इस्रायल आणि येमनमधील हूती बंडखोरांदरम्यान मागील वर्षाच्या ऑक्टोबरपासून तणाव आहे. हूती दहशतवाद्यांनी गाझामधील हमासच्या समर्थनार्थ इस्रायलवर क्षेपणास्त्रs अन् ड्रोन्स डागली आहेत. याच्या प्रत्युत्तरादाखल अमेरिका, ब्रिटन आणि इस्रायलने येमेनमध्ये हवाई हल्ले केले आहेत.