इस्रायल-हमास यांच्यात लवकरच शस्त्रसंधी
सोमवारपर्यंत घोषणा होण्याची शक्यता : अमेरिकेच्या अध्यक्षांनी दिली माहिती : 6 आठवड्यांसाठी थांबणार युद्ध
वृत्तसंस्था/ जेरूसलेम
इस्रायल-हमास दरम्यान 4 मार्च म्हणजेच सोमवारपर्यंत शस्त्रसंधी होऊ शकते. शस्त्रसंधीच्या अत्यंत नजीक पोहोचलो असल्याची कल्पना राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनी दिली असल्याचे अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी सांगितले आहे. इस्रायल आणि हमास यांच्यात शस्त्रसंधीच्या कराराशी निगडित काही अटींवर सहमती झाली आहे. यामुळे दोन्ही बाजूंकडून शस्त्रसंधी आणि इस्रायली ओलीसांची मुक्तता होण्याची शक्यता बळावली आहे. 23 फेब्रुवारी रोजी फ्रान्स येथे अमेरिका, इजिप्त, इस्रायल आणि कतारच्या अधिकाऱ्यांदरम्यान बैठक झाली होती.
शस्त्रसंधीचा पहिला टप्पा 6 आठवड्यांचा असू शकतो. यादरम्यान हमासच्या कैदेत असलेल्या इस्रायली महिला, मुले आणि वृद्धांची मुक्तता केली जाणार आहे. तसेच इस्रायल देखील पॅलेस्टिनी कैद्यांना मुक्त करणार असल्याचे समजते. हमासकडून गाझामधून इस्रायलचे सैनिक मागे हटावेत आणि युद्ध संपुष्टात आणण्याची मागणी केली जात होती अशी माहिती अमेरिकेच्या अधिकाऱ्याने दिली आहे.
राफामध्ये कारवाईचे संकेत
इस्रायली सैनिकांची मुक्तता आणि युद्ध संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावरील चर्चा पुन्हा स्थगित होऊ शकते. राफामध्ये सैन्य मोहीम सुरू करण्याचे संकेत इस्रायलच्या नेत्यांकडून देण्यात आले आहेत. राफामध्ये सध्या 15 लाख पॅलेस्टिनींनी आश्रय घेतला आहे. तर आपण दुसऱ्या टप्प्यात युद्ध संपुष्टात आणण्याच्या मुद्द्यावर चर्चा करू इच्छित असल्याचे हमासकडून सांगण्यात आले. इस्रायल आणि हमास यांच्यात लवकरच शस्त्रसंधी होईल अशी आम्हाला अपेक्षा आहे. हमास जर खरोखरच पॅलेस्टिनींची पर्वा करत असेल तर त्याने अटी मान्य कराव्यात असे अमेरिकेच्या विदेश मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलकर यांनी म्हटले आहे.
..तर राफावर हल्ला करू
हमासकडून ओलिसांची मुक्तता न करण्यात आल्यास आम्ही राफा येथे सैन्य पाठविणार आहोत. आमचे लक्ष्य पूर्णपणे विजय मिळविण्याचे आहे. हमासच्या अखेरच्या ठिकाणाला आम्ही असेच सोडू शकत नसल्याचे इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी म्हटले आहे.
इस्रायल-हमास यांच्यात 7 ऑक्टोबर रोजी युद्ध सुरू झाले होते. या युद्धात आतापर्यंत गाझामध्ये सुमारे 29 हजार 800 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 70 हजार जण जखमी झाले आहेत. तर हमासच्या हल्ल्यात इस्रायलचे 1139 लोक मारले गेले आहेत.