कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सीरियातील सर्वात उंच शिखरावर इस्रायलचा कब्जा

06:07 AM Dec 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इराण, हिजबुल्लाह, एचटीएसला दिला दणका

Advertisement

वृत्तसंस्था/ तेल अवीव

Advertisement

बशर अल असादच्या सैन्याने एचटीएसच्या बंडखोरांसमोर शरणागती पत्करताच इस्रायलच्या कमांडोंनी सीरियातील सर्वात उंच पर्वत हेरमोनवर कब्जा केला आहे. इस्रायलच्या वायुदलाच्या सर्वात प्रशिक्षित कमांडो शालडाग पथकाने या सीरियन पर्वतावर कब्जा केला आहे. हा पर्वत सीरियाच्या सीमेच्या 10 किलोमीटर आतवर आहे. इस्रायलचे रणगाडे सध्या सीरियाची राजधानी दमास्कसपासून 20 किलोमीटर अंतरापर्यंत पोहोचले आहेत. इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांनी संधी पाहून सीरियाच्या सीमेत एक बफर झोन तयार केला आहे. हा बफर जोन रक्षात्मक स्वरुपाचा असून काही काळापर्यंतच राहिल असा इस्रायलचा दावा असला तरीही यावर जाणकार सहम नाहीत.

इस्रायलने गोळी न चालवता रणनीतिक स्वरुपात महत्त्वपूर्ण भागांवर नियंत्रण मिळविले असून यामुळे इराण, हिजबुल्लाहला निश्चितच झटका बसणार आहे. सीरियाचा माउंट हेरमोन हा सीरिया आणि लेबनॉनच्या सीमेवर आहे. माउंट हेरमोनची उंची 9,232 फूट असून याच्या शिखरावर संयुक्त राष्ट्रसंघाने सीरिया आणि इस्रायलदरम्यान बफर झोन तयार केला होता. या हेरमोन पर्वताचा दक्षिण हिस्सा इस्रायलच्या कब्जात असलेल्या गोलन हाइट्सच्या भागापर्यंत फैलावलेला आहे. इस्रायलच्या कब्जातील गोलन हाइट्स 7,336 फूटच उंच आहे.

इस्रायलला रणनीतिक आघाडी

हेरमोन पर्वत सीरियाची राजधानी दमास्कसपासून केवळ 40 किलोमीटर अंतरावर आहे. हेरमोनवर इस्रायलचे नियंत्रण आल्याने दमास्कस आता इस्रायलच्या सैन्याच्या तोफांच्या मारक पल्ल्यात आले आहे. यामुळे एचटीएसचे बंडखोरही आता इस्रायलकडे वाकड्या नजरेने पाहू शकणार नाहीत. दशकांपासून इस्रायलच्या उत्तर भागाची सुरक्षा सीरियाच्या माउंट हेरमोनमुळे धोक्यात होती. या भागातील सर्वात मजबूत नैसर्गिक किल्ला असलेला हा पर्वत आता इस्रायल सैन्याच्या कब्जात आहे. इस्रायलने अत्यंत गुपचूपपणे ही मोहीम फत्ते केली आहे.

नजर ठेवणे शक्य होणार

इस्रायलचे शक्तिशाली रडार या पर्वतामुळे सीरियातील घडामोडी टिपू शकत नव्हते. तर दुसरीकडे सीरियन आणि लेबनॉनच्या काही भागांवर पाळत ठेवता येत नव्हती. इराण इस्रायलच्या या कमजोरीचा फायदा घेत कमी उंचीवर उडणाऱ्या ड्रोन्सच्या मदीतेन हल्ला करत होता. आता इस्रायलने स्वत:चा रडार माउंट हेरमोनवर तैनात केला तर त्याला सीरिया आणि लेबनॉनच्या भूभागांवर सहजपणे नजर ठेवता येणार आहे. तर इस्रायलला यामुळे इराण, लेबनॉनमधील हिजबुल्लाह आणि सीरियाच्या कुठल्याही ड्रोन किंवा क्षेपणास्त्राची त्वरित माहिती मिळू शकणार आहे.

इस्रायलचे सैन्य या पर्वतावर सेंसर तैनात करत हेरगिरी करू शकणार आहे आणि शत्रू देशामधील संभाषण टिपू शकणार आहे. याचबरोबर इस्रायलचे स्पेशल फोर्सेस सीरियात सहजपणे घुसू शकतील आणि कुठल्याही मोहिमेला साकार करू शकणा आहेत. माउंट हेरमोनवरील कब्जामुळे लेबनॉनच्या हिजबुल्लाहला दक्षिण लेबनॉनमध्ये गुप्त कारवाया करणे अशक्य ठरणार आहे. इस्रायलने लेबनॉनच्या दिशेने जाणाऱ्या मुख्य मार्गालाच स्वत:चे प्रभावक्षेत्र केले आहे. तर पर्वताच्या उत्तर भागात असलेले हिजबुल्लाहचे तस्करीचे मार्ग देखील यामुळे संपुष्टात आले आहेत. आता इस्लामिक स्टेट असो किंवा एचटीएस किंवा हिजबुल्लाह कुणालाही इस्रायलच्या दिशेने कूच करता येणार नाही.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article