For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्रायल विमानसेवा तात्पुरती बंद

06:44 AM Aug 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
इस्रायल विमानसेवा तात्पुरती बंद
Advertisement

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे एअर इंडियाचा निर्णय

Advertisement

वृत्तसंस्था/ जम्मू

इराणमध्ये हमासचे सर्वोच्च नेते इस्माईल हनिया यांच्या हत्येनंतर पश्चिम आशियात तणाव शिगेला पोहोचला आहे. हानियाच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी इराणने इस्रायलवर हल्ला करण्याची धमकी दिली आहे. इस्रायल हाय अलर्टवर असल्याने भारतीय विमान कंपनी एअर इंडियाने भारत आणि इस्रायलची राजधानी तेल अवीव दरम्यानची विमानसेवा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement

एअर इंडियाने एक निवेदन जारी करून विमानसेवेबाबत माहिती दिली. पश्चिम आशियातील परिस्थिती पाहता तेल अवीवकडे जाणाऱ्या सेवा त्वरित प्रभावाने थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. तेल अवीव येथून येणारी आणि येथून तेल अवीवकडे जाणारी विमानसेवा सध्या 8 ऑगस्ट 2024 पर्यंत बंद ठेवण्यात येणार आहे. एअर इंडिया प्रशासन तेथील परिस्थितीवर सतत लक्ष ठेवून आहे, असे एअर इंडियाने सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये लिहिले आहे. पुढील काही दिवसांसाठी ज्या प्रवाशांनी तिकीट बुक केले आहे त्यांनी पुन्हा तिकीट बुक केल्यास त्यांना एकवेळ सवलत आणि रद्दीकरण शुल्कातून सवलत दिली जाईल. आमच्या प्रवाशांची सुरक्षा ही आमची पहिली प्राथमिकता आहे. अधिक माहितीसाठी तुम्ही आम्हाला 011-69329333 / 011-69329999 वर कॉल करू शकता, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

इराणमध्ये बुधवारी हमासचा सर्वोच्च नेता इस्माईल हानिया यांची हत्या करण्यात आली होती. हमासने यासाठी इस्रायलला जबाबदार धरले. त्याचवेळी इराणनेही इस्रायलला हल्ल्याची धमकी दिली. याला प्रत्युत्तर देताना इस्रायलनेही इराणला जोरदार प्रत्युत्तर देणार असल्याचे म्हटले आहे. इस्माईल हनियाच्या मृत्यूच्या एक दिवस आधी लेबनॉनमधील बैरुतमध्ये इस्रायली हल्ल्यात हिजबुल्लाहचा एक उच्च कमांडर मारला गेला. त्यानंतर हिजबुल्लाहनेही इस्रायलचा बदला घेण्याची धमकी दिली आहे. हिजबुल्लाहने तर इस्रायलवर रॉकेट हल्ले सुरू केले आहेत.

इस्रायल-हमास युद्धामुळे पश्चिम आशियात आधीच तणाव वाढला होता, मात्र आता ताज्या घडामोडींमुळे तणाव शिगेला पोहोचला असून इस्रायल-हमास युद्ध आता संपूर्ण पश्चिम आशियात पसरण्याची भीती व्यक्त केली जात आहे. इराणने इस्रायलवर हल्ला केल्यास इस्रायलच्या संरक्षणासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही अमेरिकेने जाहीर केले आहे. त्यामुळेच खबरदारीचा उपाय म्हणून एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी विमानसेवा सध्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.

Advertisement
Tags :

.