इस्रायल नरमला, प्रतिदिन 10 तासांचा संघर्षविराम
गाझापट्टीच्या 3 भागांमध्ये होणार लागू
वृत्तसंस्था/ तेल अवीव
गाझामध्ये वाढत्या उपासमारीदरम्यान इस्रायलने युद्धग्रस्त गाझापट्टीच्या तीन भागांमध्ये प्रतिदिन 10 तासांसाठी संघर्ष रोखण्याची घोषणा केली आहे. तीन क्षेत्रांमध्ये काही काळासाठी संघर्ष रोखला जाणार आहे. रविवारपासून पुढील आदेशापर्यंत स्थानिक प्रमाणवेळेनुसार सकाळी 10 ते रात्री 8 वाजेपर्यंत मवासी, दील अल-बलाह आणा गाझासिटीत स्वत:चे अभियान रोखणार असल्याचे इस्रायलच्या सैन्याने जाहीर केले आहे.
सहाय्य यंत्रणांना गाझामध्ये लोकांपर्यंत भोजन आणि अन्य पुरवठा पोहोचविण्यास मदत करण्यासाठी सुरक्षित मार्गही निश्चित केला जाणार असल्याचे इस्रायलने सांगितले आहे. पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू, संरक्षणमंत्री इस्रायल काट्ज आणि विदेशमंत्री गिदोन सार तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांदरम्यान चर्चा झाल्यावर गाझाच्या स्थितीवर आंतरराष्ट्रीय दबावामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी शनिवारी इस्रायलने गाझामध्ये मदतसामग्रीचा हवाईमार्गाने होणारा पुरवठा पुन्हा सुरू करणार असल्याचे स्पष्ट केले होते.
उत्तर गाझाच्या अनेक भागांमध्ये मदतसामग्री हवाईमार्गे पोहोचविण्यात आली आहे. इस्रायल डिफेन्स फोर्सेसकडून आटा, साखर आणि डबाबंद खाद्यसामग्री पुरविण्यात आली आहे. गाझामध्ये उपासमारीच्या स्थितीदरम्यान हे पाऊल उचलण्यात आले आहे. मार्च महिन्यात इस्रायलकडून सर्व क्रॉसिंग बंद करण्यात आल्यामुळे आवश्यक सामग्रीचा पुरवठा गंभीर स्वरुपात प्रभावित झाला होता. या पार्श्वभूमीवर जागतिक समुदायाने इस्रायलच्या कारवाईला विरोध दर्शवत मदतसामग्रीचा पुरवठा सुरू करण्याचा आग्रह धरला होता.
हमासच्या कमांडरचा खात्मा
गाझापट्टीत एका हल्ल्यात हमासच्या एका कमांडरला ठार केल्याचे आयडीएफकडून सांगण्यात आले आहे. हमासच्या जनरल सिक्युरिटी अपरेट्समध्ये काउंटर-इंटेलिजेन्स संचालनालयाचा प्रमुख अमजद मुहम्मद हसन शायर यात मारला गेला आहे.