For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

इस्माचा अहवाल : देशात 2.45 लाख हेक्टर ऊसक्षेत्रात वाढ

05:15 PM Jul 24, 2022 IST | Abhijeet Khandekar
इस्माचा अहवाल   देशात 2 45 लाख हेक्टर ऊसक्षेत्रात वाढ

संतोष पाटील
कोल्हापूर: देशात 2021-22 गळीत हंगामात 55.83 लाख हेक्टर उसक्षेत्र होते. त्यात 2.45 लाख हेक्टर म्हणजेच चार टक्के वाढ होवून 58.28 लाख हेक्टर झाले. वाढलेल्या उसक्षेत्रामुळे साखरेचे उत्पादन किमान चार लाख टन वाढण्याची शक्यता इंडियन शुगर मिल्स असोसिएशनने (इस्मा) प्रसिध्द केलेल्या अहवालात व्यक्त केली आहे. 2020-21 च्या गळीत हंगामात 52.88 लाख हेक्टर क्षेत्र उसाखाली होते. मागील दोन वर्षात सुमारे पाच लाख हेक्टर उसक्षेत्र वाढल्याची आकडेवारी सांगते.

Advertisement

2021-22 मध्ये बी हेवी मोलॅसिस आणि उसाचा रस-सिरपचे इथेनॉलकडे न वळवता साखरेचे निव्वळ उत्पादन 399.97 लाख टन होईल असा अंदाज आहे. चालू हंगामात 10 जुलै 2022 पर्यंत 444.42 कोटी लिटर इथेनॉलचे उत्पादन झाले आहे. त्यापैकी 362.16 कोटी लिटर साखर उद्योगाचे आहे. यापैकी उसाच्या रसापासून तयार झालेले इथेनॉल आणि बी-हेवी मोलॅसेस 349.49 कोटी लिटर आहे. यासाठी 34 लाख टन साखर इथेनॉलकडे वळली.
पुढील वर्ष 2022-23 मध्ये, 12 टक्के इथेनॉल मिश्रणाचे उद्दिष्ठ ठेवले आहे. उदिष्ठपूर्तीसाठी एकूण 545 कोटी लिटर इथेनॉलची आवश्यकता असेल. यासाठी सरासरी 45 लाख टन साखर वळवली जाईल. मागील गळीत हंगामाच्या तुलनेत हे प्रमाण दहा लाख टन जादा आहे. इथेनॉलकडे वळवलेली साखरेचे प्रमाण गृहीत धरुन 2022-23 मध्ये सुमारे 355 लाख टन निव्वळ साखरेचे उत्पादन होईल. देशांतर्गत साखरेचा वापर 275 लाख टन होईल, तर सुमारे 80 लाख टन अतिरिक्त साखर निर्यात करणे आवश्यक असल्याचे इस्माने अहवालात म्हटले आहे.

चार लाख टन जादा साखरेचे उत्पादन
उत्तर प्रदेशात 23.09 वरुन 23.72 लाख हेक्टर क्षेत्र झाले असून 2022-23 च्या हंगामात इथेनॉल विचारात न घेता सुमारे 114.98 लाख टन साखरेचे उत्पादन अपेक्षित आहे. महाराष्ट्रातील ऊसक्षेत्र 13.50 लाख हेक्टर वरून 7 टक्के वाढले असून ते 14.41 लाख हेक्टर झाले आहे. गळीत हंगामात 148.65 लाख टन साखर उत्पादीत होईल, असा अंदाज आहे. कर्नाटकातील ऊसक्षेत्र 5.85 वरुन 6.25 लाख हेक्टर उपलब्ध होणार असून 66.22 लाख मे. टन साखरेचे उत्पादन कर्नाटकातून होईल. उर्वरित राज्यातून 13.04 लाख हेक्टरवरुन 23.96 लाख हेक्टरवर उसाचे उत्पादन घेतले जाईल, 57.87 लाख टन साखर उत्पादीत होईल, जी मागील गळीत हंगामाच्या तुलनेत चार लाख टन जादा असेल असे इस्माच्या अहवालात म्हटले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
×

.