For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

इस्लामी दहशतवादाचा भारतासह जगाला धोका

06:58 AM Mar 18, 2025 IST | Tarun Bharat Portal
इस्लामी दहशतवादाचा भारतासह जगाला धोका
Advertisement

अमेरिकेच्या गुप्तचर संचालकांचा इशारा : तुलसी गब्बार्ड यांनी पाकिस्तानला फटकारले

Advertisement

► वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गब्बार्ड यांनी भारतात सतत होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना ‘इस्लामिक दहशतवाद’ असे म्हटले आहे. हा इस्लामिक दहशतवाद भारत आणि अमेरिकेसह मध्य-पूर्वेतील अनेक देशांसाठी धोका बनत आहे, असा इशारा देत त्यांनी आपल्या भारत दौऱ्यादरम्यान पाकिस्तानला फटकारले. तसेच या समस्येचे निराकरण करण्यासाठी भारतीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे दोन्ही नेते एकत्र काम करत असल्याचे सुतोवाचही त्यांनी केले.

Advertisement

तुलसी गब्बार्ड ‘रायसीना डायलॉग’मध्ये सहभागी होण्यासाठी भारतात आल्या आहेत. याचदरम्यान त्यांनी एएनआयला दिलेल्या मुलाखतीत अध्यात्म, भगवद्गीता, कृष्णाच्या शिकवणी आणि भारतावरील प्रेम याबद्दलही परखडपणे भाष्य केले. आपण कृष्णभक्त असून भगवंतांशी असलेला आपला संबंध हा जीवनाचा केंद्रबिंदू असल्याचेही त्यांनी नमूद केले. आपल्या भारत दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी गब्बार्ड यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. पंतप्रधान मोदींशी झालेल्या भेटीवेळी त्यांना प्रयागराजमधील महाकुंभमेळ्यातील पवित्र जलाने भरलेला कलश प्रदान करण्यात आला.

तुलसी गब्बार्ड यांनी अमेरिकेच्या विविध रणनीतींबाबत भूमिका मांडली. तसेच विद्यमान राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डावपेचांवरही भाष्य केले. राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे इस्लामिक दहशतवादाविरुद्ध लढण्याच्या आपल्या वचनाबद्दल अगदी स्पष्ट आहेत. इस्लामिक दहशतवादाने बऱ्याच देशांना वेढले असून अमेरिकन लोकांनाही धोका देत आहे. याचा परिणाम भारत, बांगलादेशमधील लोकांवर होत आहे आणि सध्या सीरिया, इस्रायल आणि मध्य-पूर्वेतील अनेक देशांमधील लोकांनाही याच फटका बसत असल्याचे गब्बार्ड म्हणाल्या.

राजनाथ सिंह यांच्याशी चर्चा

अमेरिकेच्या राष्ट्रीय गुप्तचर संचालक तुलसी गब्बार्ड यांनी परिषदेपूर्वी भारताचे संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील संरक्षण संबंध मजबूत करण्यावर या चर्चेत भर देण्यात आला. गब्बार्ड तीन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. राजनाथ सिंह आणि तुलसी गब्बार्ड यांच्यातील बैठकीत संरक्षण संबंध मजबूत करण्याच्या मार्गांवर चर्चा झाल्याची माहिती संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याकडून देण्यात आली.

अध्यात्म हा जीवनाचा केंद्रबिंदू

माझा आध्यात्मिक प्रवास आणि देवाशी असलेले माझे नाते हे माझ्या जीवनाचे केंद्रबिंदू आहेत. मी दररोज देवाचे स्मरण करतच जीवन जगण्याचा प्रयत्न करते. देवाची सेवा करण्यापेक्षा अन्य चांगला मार्ग कोणता असू शकतो? असा प्रश्नही त्यांनी याप्रसंगी उपस्थित केला. भगवद्गीतेच्या शिकवणींमधून आपल्याला मौल्यवान धडे मिळतात. माझ्या आयुष्यातील वेगवेगळ्या प्रसंगात मी युद्धक्षेत्रात असताना किंवा आजच्या आव्हानांना तोंड देत असताना नेहमीच कृष्णाच्या शिकवणींमधून काहीतरी मौल्यवान शिकले आहे. देवच मला शांती आणि शक्ती देत असतात, असेही गब्बार्ड यांनी स्पष्ट केले.

भारताविषयी प्रेमभावना व्यक्त

मला भारत देश खूप आवडतो. मी जेव्हा भारतात येते तेव्हा मला माझ्या स्वत:च्या घरी आल्यासारखे वाटते. येथील लोक खूप दयाळू आणि स्वागतशील आहेत. येथील जेवण नेहमीच चविष्ट असते. दाल मखनी आणि ताज्या पनीरने बनवलेले सर्व पदार्थ चविष्ट असतात, अशा काही गोष्टींवर भाष्य करत गब्बार्ड यांनी भारताविषयी असलेली प्रेमभावना व्यक्त केली.

Advertisement
Tags :

.