अमेरिकेतील हल्ल्यामागे इस्लामिक स्टेट
हल्लेखोर अमेरिकेचा माजी सैनिक : वाहन हल्ल्यात 15 जणांचा मृत्यू : एफबीआयच्या तपासात महत्त्वाचे धागेदारे हाती
वृत्तसंस्था/वॉशिंग्टन
अमेरिकेच्या न्यू ऑर्लियन्सच्या फ्रेंच क्वार्टरमध्ये नववर्षाच्या पहिल्या सकाळी पिकअप ट्रक जमावावर चढविण्याचा प्रकार घडला होता. या घटनेत 15 जणांना जीव गमवावा लागला तर 30 जण जखमी झाले. तर पोलिसांनी संबंधित चालकाला घटनास्थळीच ठार केले होते. या ट्रकचालकाचे नाव शम्सुद्दीन जब्बार असल्याचे समोर आले आहे. जब्बार हा अमेरिकेचा नागरिक होता आणि दीर्घकाळ सैन्यात कार्यरत राहिला होता. अमेरिकेची तपास यंत्रणा या हल्ल्याला दहशतवादी कृत्य मानून तपास करत आहे. तसेच या हल्ल्यामागे आयएसआयएस असल्याचे मत एफबीआयने व्यक्त केले आहे.
42 वर्षीय शम्सुद्दीन बहार जब्बार हा टेक्सास प्रांताचा रहिवासी आणि माजी सैनिक होता. याच्या वाहनाच्या ट्रेलर हिचवर आयएसआयएसचा झेंडा मिळाला आहे. जब्बारचा इस्लामिक स्टेटशी थेट संपर्क होता का, याचा तपास आता एफबीआय करत आहे. एफबीआयच्या न्यू ऑर्लियन्स फील्ड ऑफिसच्या असिस्टेंट स्पेशल एजंट इन्चार्ज एलेथिया डंकन यांनी हा हल्ला एकट्या जब्बारने घडवून आणल्याचे वाटत नसून यामागे एखादा दहशतवादी गट असू शकतो, असे पत्रकार परिषदेत सांगितले आहे.
जब्बार हा अमेरिकेच्या सैन्यात मार्च 2007 मध्ये दाखल झाला होता, त्याने मनुष्यबळ आणि माहिती-तंत्रज्ञान विभागांमध्येही काम केले होते. तो फेब्रुवारी 2009 ते जानेवारी 2010 पर्यंत अफगाणिस्तानात तैनात राहिला होता. 2015 मध्ये युएस आर्मी रिझर्व्हमध्ये त्याची बदली झाली आणि जुलै 2020 पर्यंत स्टाफ सार्जंट पदावर त्याने सेवा बजावली होती. जब्बारच्या वाहनातून बंदुका, पाइप बॉम्ब मिळाले आहेत. ही स्फोटके कूलरमध्ये लपविण्यात आली होती आणि रिमोट डेटोनेशसाठी वायर्ड करण्यात आली होती, ज्याचा रिमोट कंट्रोल देखील वाहनात मिळाला आहे. जब्बारने हा हल्ला नववर्षाच्या पहिल्या सकाळी केला होता. हल्ल्यापूर्वी बॉर्बन स्ट्रीट नववर्षाचा जल्लोष करणाऱ्या लोकांनी भरून गेला होता. न्यू ऑर्लियन्समध्ये जॉर्जिया आणि नोट्रे डेम यांच्यात होणाऱ्या शुगर बाउल कॉलेज फुटबॉल प्लेऑफ स्पर्धेसाठीही लोक जमले होते. हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा सामना काही काळासाठी स्थगित केला आहे.
ट्रम्प अन् बिडेन यांचे वक्तव्य
हल्ल्याच्या काही तासांपूर्वी चालकाने सोशल मीडियावर पोस्ट केलेले व्हिडिओ एफबीआयला प्राप्त झाले आहेत. या व्हिडिओत जब्बारने आपण इस्लामिक स्टेट समूहामुळे प्रेरित असल्याचे म्हणत हत्या करण्याची इच्छा व्यक्त केली होती, अशी माहिती अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेन यांनी दिली आहे. तर अमेरिकेचे आगामी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही न्यू ऑर्लियन्समधील हल्ल्याबद्दल वक्तव्य जारी केले आहे. देशात जे गुन्हेगार येत आहेत, ते देशात असलेल्या गुन्हेगारांपेक्षा अधिक क्रूर आहेत, या माझ्या वक्तव्यावर टीका करण्यात आली होती, परंतु आता हे सत्य ठरले आहे. आमच्या देशात गुन्ह्यांचे प्रमाण खूपच अधिक झाले आहे. आम्ही न्यू ऑर्लियन्सच्या शूर पोलीस अधिकाऱ्यांसोबत आहोत. या क्रूर घटनेच्या तपासात ट्रम्प प्रशासन न्यू ऑर्लियन्सला पूर्ण समर्थन देणार असल्याचे ट्रम्प यांनी म्हटले आहे.