इस्लामाबाद कार बाँबर अफगाणिस्तानचा
वृत्तसंस्था/इस्लामाबाद
पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद येथे मंगळवारी झालेला कार स्फोट हा अफगाणिस्तानच्या एका नागरीकाने घडविला आहे, असा आरोप पाकिस्तानने केला आहे. या स्फोटात, पाकिस्तानने दिलेल्या माहितीनुसार 12 जणांचा मृत्यू झाला असून 30 हून अधिक जखमी झाले आहेत. हा स्फोट सोमवारी दिल्लीत झालेल्या स्फोटानंतर जवळपास 18 तासांनी झाला होता. या स्फोटात भारताचा हात आहे, असा बेछुट आरोप पाकिस्तानने गुरुवारी केला होता. मात्र, आता तो अफगाणिस्तानच्या नागरीकाने घडविल्याचे नवे प्रतिपादन पाकिस्तानने केले आहे. पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी इस्लामाबादचा स्फोट अफगाणिस्तानच्या नागरीकाने केल्याचा आरोप पाकिस्तानच्या सिनेटसमोर भाषण करताना केला आहे. आम्ही या हल्लेखोराचा माग काढला आहे. तो आत्मघाती बाँबर होता. तो अफगाणिस्तानचा नागरीक असून स्फोट घडविण्यासाठीच पाकिस्तानात आला होता, अशीही माहिती नकवी यांना या संदर्भात दिली आहे.