इस्कॉनतर्फे कार्तिक मासानिमित्त गोवर्धन पूजा
बेळगाव : टिळकवाडी येथील इस्कॉनच्या श्री श्री राधा गोकुळानंद मंदिरात नुकतेच गोवर्धन पूजेचे आयोजन केले होते. कार्तिक मासानिमित्ताने दीपदान, दीपोत्सव तसेच गो-पूजा आयोजिली होती. इस्कॉन बेळगावचे अध्यक्ष भक्तीरसामृत महाराजांच्या हस्ते आरती केली. यानंतर महाराजांनी प्रवचन करून गोवर्धन लीलेचे सुंदररीत्या वर्णन केले. भगवान श्रीकृष्णांनी आपल्या जीवनात अनेक लीला केल्या. त्यामध्ये गोवर्धन लीला ही सर्वात महत्त्वाची आहे. गोवर्धन पूजेतून भगवान श्रीकृष्णांनी भक्ती, नम्रता व निसर्गसेवेचा संदेश दिला असल्याचे महाराजांनी स्पष्ट केले. यावेळी महाराजांनी गोवर्धन पर्वताची कथा सांगितली. प्रवचनानंतर भक्तांनी मंदिरात उभारलेल्या गोवर्धन पर्वताला प्रदक्षिणा घातली. श्रीकृष्ण भगवान की जय या घोषणांनी भक्तीरस दुमदुमला. यानंतर नैवेद्य दाखविला व भाविकांना महाप्रसादाचे वितरण करण्यात आले. दररोज सकाळी व सायंकाळी 7 ते 8 या वेळेत होणाऱ्या दीपदानाच्या कार्यक्रमात अधिकाधिक भाविकांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले.
आज प्रभूपाद शिरोभाव दिन
इस्कॉनचे संस्थापक आचार्य श्रील प्रभूपाद यांचा शिरोभाव दिन शनिवार दि. 25 रोजी आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्ताने पहाटे 4.30 वाजता मंगलारती, हरिनाम जप, गुरुपूजा, श्रीमद् भागवत कथाकथन व पुष्पांजली होईल. सायंकाळी 6.30 वाजल्यानंतर आरती व भक्तीरसामृत महाराजांचे प्रवचन, दामोदर अष्टकम व महाप्रसादाचे वितरण होणार आहे. यावेळी भाविकांना उपस्थित राहण्याचे आवाहन इस्कॉनतर्फे करण्यात आले आहे.