बांगलादेशातील इस्कॉन प्रमुखांना अटक
हिंदूंवरील अत्याचारांविरोधात आवाज उठविल्यामुळे सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप
वृत्तसंस्था / ढाका
बांगलादेशातील एक प्रमुख हिंदू नेते आणि त्या देशातील इस्कॉनचे प्रमुख कृष्णदास प्रभू यांना अटक करण्यात आली आहे. त्यांना ढाका विमानतळावर बांगलादेश पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांना अज्ञात स्थानी नेण्यात आले आहे, अशी माहिती उपलब्ध झाली आहे. त्यांच्या विरोधात अनेक एफआयआर नोंद करण्यात आले असून हे सर्व एफआयआर खोटे आहेत, असा आरोप बांगलादेशातील हिंदू संघटनांनी आणि इस्कॉनच्या अन्य कार्यकर्त्यांनी केला आहे.
भारताच्या सूचना आणि प्रसारण विभागाचे प्रमुख सल्लागार कांचन गुप्ता यांनी ही माहिती दिली. कृष्णदास प्रभू तथा चिन्मोय कृष्णदास ब्रम्हचारी यांनी बांगलादेशात होणाऱ्या हिंदूंवरील अत्याचारांच्या विरोधात आवाज उठविला होता. त्यामुळे बांगलादेश पोलिसांनी त्यांना सूडबुद्धीने अटक केल्याचा आरोप त्या देशातील अनेक मान्यवरांनी केला आहे. त्यांच्याविरोधात देशद्रोहाचा आरोप ठेवण्यात आल्याची माहितीही उपलब्ध झाली आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांनी ढाका येथे हिंदूंच्या एका प्रचंड सभेचे आयोजन केले होते. या सभेत हिंदूंवर होणाऱ्या अत्याचारांचा निषेध करण्यात आला होता. कृष्णदास प्रभू यांनीही या सभेत भाषण करताना हिंदूंवरील अत्याचार थांबविण्याचे आवाहन केले होते. कृष्णदास प्रभू हे बांगलादेशातील सर्वात महत्वाचे हिंदू नेते मानले जातात. त्यांना अटक करुन बांगलादेशच्या प्रशासनाने हिंदूंच्या मनात भीती निर्माण करण्याचा प्रयत्न केला आहे, असा आरोपही तेथील अनेक हिंदू नेत्यांनी केला आहे.
भारताने हस्तक्षेप करावा
पश्चिम बंगालमधील भारतीय जनता पक्षाचे नेते सुवेंदू अधिकारी यांनी कृष्ण दास प्रभू यांच्या अटकेचा निषेध केला आहे. भारताच्या परराष्ट्र व्यवहार विभागाने या प्रकरणात हस्तक्षेप करावा आणि त्यांची सुटका करण्याचा प्रयत्न करावा, असे आवाहन त्यांनी सोमवारी केले. कृष्ण दास प्रभू हे शांतताप्रेमी नेते आहेत. त्यांच्या संरक्षणासाठी विश्व समुदायाने पुढे यावे, असे प्रतिपादनही त्यांनी केले.
बांगलादेशची टोकाची भूमिका
बांगलादेशातील हिंदूंना संपविण्याचा प्रयत्न तेथील मोहम्मद युनुस यांचे सरकार करीत आहे. हे सरकार धर्मनिरपेक्ष नसून धर्मांध आहे. त्यांनी कृष्णदास प्रभू यांचे अपहरण केले असून त्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. युनूस यांचे सरकार हिंदूंच्या विरोधात सूडबुद्धीने वागत असून हिंदूंना त्रास देण्यासाठी ते कोणत्याही थराला जाऊ शकते, असे प्रतिपादन बांगलादेश सनातनी समाजाने केले आहे. जगातील हिंदूंनी एकत्र येऊन बांगलादेशच्या प्रशासनावर दबाव आणावा. त्याशिवाय हे अत्याचार थांबणार नाहीत, असेही आवाहन करण्यात आले.