महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

कसोटी हाय की टी-20?,

06:58 AM Oct 01, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

चौथ्या दिवशी विक्रमांची बरसात : टीम इंडियाच्या शिलेदारांनी अनिर्णीत होणारी कसोटी विजयाकडे खेचली 

Advertisement

वृत्तसंस्था/ कानपूर

Advertisement

कानपूरच्या ग्रीन पार्क स्टेडियमवर खेळवला जात असलेला भारत व बांगलादेश यांच्यातील कसोटी सामना रोमांचक वळणावर पोहोचला आहे. पावसामुळे गेले दोन दिवस एकाही चेंडूचा खेळ झाला नव्हता, मात्र चौथ्या दिवशी पूर्ण खेळ झाला. सोमवारी बांगलादेशचा पहिला डाव 233 धावांवर आटोपला. यानंतर टीम इंडियाने टी-20 स्टाईल बॅटिंग करताना अवघ्या 34 षटकांत 285 धावा केल्या व आपला पहिला डाव घोषित करत 52 धावांची आघाडी घेतली. चौथ्या दिवसअखेरीस बांगलादेशने दुसऱ्या डावात 2 बाद 26 धावा केल्या आहेत. ते अद्याप 26 धावांनी मागे आहेत. भारताने कानपूर कसोटी अनिर्णीत राहण्याची चिन्हे असताना विजयाकडे वळवली आहे.

पहिले तीन दिवस पावसाने जोरदार बॅटिंग केल्यानंतर चौथ्या दिवशी पावसाने उघडीप दिल्यामुळे खेळाला सुरुवात झाली. चौथ्या दिवशी बांगलादेशने 3 बाद 107 धावसंख्येपासून पुढे खेळण्यास सुरुवात केली. 112 धावांवर संघाला चौथा धक्का बसला. मुशफिकुर रहीम 32 चेंडूत 11 धावा करून बुमराहच्या चेंडूवर बोल्ड झाला. लिटन दासने (13) काही चांगले शॉट्स खेळले, पण नंतर तो मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात रोहित शर्माच्या हाती झेलबाद झाला. रोहितने त्याचा हवेत उडी मारून एका हाताने जबरदस्त झेल घेतला. शकिब अल हसनही फारशी कमाल करू शकला नाही. तो 9 धावा करून तंबूत परतला. एकीकडे विकेट्स पडत असताना मोमिनुल हकने एकहाती किल्ला लढवताना 194 चेंडूत नाबाद 107 धावांची खेळी साकारली. त्याला इतर फलंदाजांची मात्र साथ मिळाली नाही. 74.2 षटकांत बांगलादेशचा डाव 233 धावांवर संपुष्टात आला.

टीम इंडियाची टी-20 स्टाईल बॅटिंग

बांगलादेशचा डाव गुंडाळल्यानंतर टीम इंडियाने आक्रमक फलंदाजी केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वालने पहिल्या 3 षटकातच 51 धावा तडकावताना चौकार षटकारांचा पाऊस पाडला. विशेष म्हणजे केवळ 12 षटकांत भारतीय संघाने 1 बाद 121 धावा  ठोकल्या. जैस्वालने 51 चेंडूत धडाकेबाज 72 धावा ठोकल्या. तर रोहित 11 चेंडूत 23 धावा करुन माघारी परतला. रोहित शर्मा माघारी परतल्यानंतर यशस्वीच्या साथीला शुभमन गिल आला. गिलनेही 36 चेंडूत 39 धावांची खेळी केली. पंत 9 धावा करुन माघारी परतला. यानंतर विराट आणि केएल राहुलने मोर्चा सांभाळला. या दोघांनीही आक्रमक खेळी केली. विराटने 35 चेंडूत 47 धावा तर केएलने 43 चेंडूत 68 धावा ठोकल्या. भारताकडून यशस्वी जैस्वाल (72) आणि केएल राहुल (68) यांनी अर्धशतके झळकावली. टी 20 स्टाईल बॅटिंग करताना टीम इंडियाने 34.4 षटकांत 9 गडी गमावत 285 धावा केल्या आणि 52 धावांची आघाडी मिळवली.

डाव घोषित करण्याचा निर्णय अन् बांगलादेशच्या 2 विकेट्स

टीम इंडियाने 9 विकेट पडताच पहिला डाव घोषित केला आणि बांगलादेशला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. याचा फायदा भारताला झाला. बांगलादेशने दुसऱ्या डावात 11 षटकांच्या खेळात 2 गडी गमावून 26 धावांपर्यंत मजल मारली. झाकीर हसन 10 धावा आणि हसन महमूद 4 धावा करून बाद झाला. अश्विनने या दोघांचे बळी घेतले. शदमान इस्लाम (7) आणि मोमिनुल हक (0) क्रिजवर आहेत. सामन्याच्या पाचव्या दिवशी (मंगळवारी) बांगलादेशला पहिल्या सत्रात लवकर गुंडाळण्याचा टीम इंडियाचा प्रयत्न असेल. ग्रीन पार्कच्या खेळपट्टी पाचव्या दिवशी फिरकीला अनुकुल असल्याने टीम इंडियाच्या कामगिरीकडे लक्ष्य असणार आहे.

टेस्टमध्ये टीम इंडियाच बेस्ट, अवघ्या तीन षटकांत अर्धशतक

बांगलादेशविरुद्ध कसोटीतील पहिल्या डावात भारताने अशी फलंदाजी केली, जी इतिहासात यापूर्वी कधीच झाली नव्हती. टीम इंडियाने या डावात सर्वात वेगवान 50 धावा, सर्वात वेगवान 100 धावा, सर्वात वेगवान 150 धावा, सर्वात वेगवान 200 धावा आणि सर्वात वेगवान 250 धावांचा विक्रम मोडला. आता कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात वेगाने या धावांचा टप्पा गाठण्याचा रेकॉर्ड भारतीय संघाच्या नावे झाला आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये सर्वात जलद धावा

एकमेव, अद्वितीय विराट कोहली, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27,000 धावा

आपल्या अद्भूत शैलीने जगभरातील क्रिकेट रसिकांवर राज्य करणाऱ्या विराट कोहलीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आणखी एक माईलस्टोन गाठला. बांगलादेशविरुद्ध दुसऱ्या कसोटीत त्याने 47 धावांची खेळी साकारली. या खेळीसह विराट कोहली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 27,000 धावांचा टप्पा गाठणारा फलंदाज बनला. कोहलीने या बाबतीत सचिन तेंडुलकरसह अनेक दिग्गजांना मागे सोडले आहे. विराटने 27,000 धावांचा आकडा गाठण्यासाठी 594 डाव खेळले. तर सचिन तेंडुलकरने 623 डावांत ही कामगिरी केली होती. अशी कामगिरी करणारा तो कसोटीतील पहिलाच खेळाडू आहे. याशिवाय, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 27 हजार धावा करणारा विराट जगातील चौथा क्रिकेटपटू ठरला आहे. सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत कोहलीच्या पुढे आता फक्त रिकी पाँटिंग, कुमार संगकारा आणि सचिन तेंडुलकर हेच आहेत.

सर्वात जलद 27 हजार धावा करणारे फलंदाज

रविंद्र जडेजाचे कसोटीत 300 बळी

टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविंद्र जडेजाने बांगलादेशविरु अनोख्या विक्रमाला गवसणी घातली. तळाचा फलंदाज खलीद अहमदला बाद करत त्याने कसोटी क्रिकेटमधील 300 वी विकेट मिळवली. यासह, तो आता निवडक खेळाडूंच्या यादीत सामील झाला आहे ज्यांनी 300 बळी घेतले आहेत आणि कसोटी क्रिकेटमध्ये 3 हजारांहून अधिक धावा केल्या आहेत. जडेजाने 300 बळी पूर्ण करताच इम्रान खान आणि कपिल देव सारख्या दिग्गजांना मागे सोडले. जडेजाने 74 व्या कसोटीतच 3000 हून अधिक धावा आणि 300 विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे.

कसोटीत सर्वात जलद 300 बळी व 3000 धावा करणारे खेळाडू

  1. इयान बॉथम- 72 सामने, 4153 धावा व 305 बळी
  2. रविंद्र जडेजा - 74 कसोटी, 3122 धावा व 300 बळी
  3. इम्रान खान - 75 कसोटी, 3000 धावा व 341 बळी
  4. कपिल देव - 83 कसोटी, 3486 धावा व 300 बळी.

2024 मध्ये टीम इंडियाचे कसोटीत सर्वाधिक षटकार

सोमवारचा दिवस टीम इंडियासाठी विक्रमी ठरला. टी 20 स्टाईल बॅटिंग करताना टीम इंडियाने अनेक विक्रम केले. टीम इंडियाने 2024 या वर्षात कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत. सध्याच्या घडीला, भारत कसोटीत सर्वात जास्त षटकार ठोकणारा संघ बनला आहे. भारतीय खेळाडूंनी 2024 मध्ये आतापर्यंत 96 षटकार मारले आहेत. यापूर्वी एका वर्षात कसोटी सामन्यात सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम इंग्लंडच्या नावावर होता. 2022 मध्ये इंग्लंडच्या खेळाडूंनी एकूण 89 षटकार मारण्याचा विक्रम केला होता.

एका वर्षात कसोटीत सर्वाधिक षटकार मारणारे संघ

संक्षिप्त धावफलक

बांगलादेश प.डाव सर्वबाद 233 व दुसरा डाव 11 षटकांत 2 बाद 26 (शादनाम इस्लाम खेळत आहे 7, झाकीर हसन 10, हसन महमूद 4, मोमीनल खेळत आहे 0, अश्विन 14 धावांत 2 बळी). भारत पहिला डाव 34.4 षटकांत 9 बाद 285 घोषित (जैस्वाल 72, रोहित शर्मा 23, गिल 39, विराट कोहली 47, केएल राहुल 68, अश्विन 12, शकिब व मेहदी हसन प्रत्येकी 4 बळी).

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article