‘स्मार्ट’ सिटीबाबत सरकार खरोखरच गंभीर आहे का?
माजी महापौर उदय मडकईकर यांचा सवाल
पणजी : ऐन पावसाच्या तोंडावर हॉटमिक्स डांबरीकरण केलेला रस्ता पावसाच्या तडाख्याने चक्क वाहून जातो हा प्रकारच आकलनापलिकडील आहे. त्याही पलिकडे सरकार त्याबद्दल ब्र सुद्धा न काढता सदर कंत्राटदारांना पाठिशी घालत आहे. ही उधळपट्टी पाहता हे सरकार पणजीला ‘स्मार्ट’ बनविण्याच्या बाबतीत खरोखरच गंभीर आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे, अशी संतप्त प्रतिक्रिया पणजीचे नगरसेवक तथा माजी महापौर उदय मडकईकर यांनी व्यक्त केली आहे. खास पणजीच्या विकासासाठी स्थापन करण्यात आलेली ‘इमेजिन पणजी स्मार्ट सिटी’ ही कंपनी म्हणजेच एक गौडबंगाल आणि भ्रष्टाचाराचे आगर ठरली आहे, हे माजी सीईओ स्वयंदिप्त पाल यांच्यावरील कारवाईवरून स्वत: सरकारनेच सिद्ध केले आहे.
स्वत: सरकारनेच जाहीर केलेल्या अधिकृत आकडेवारीनुसार आतापर्यंत 1200 कोटी ऊपये खर्च करण्यात आले आहेत. परंतु प्रत्यक्षात तेवढा विकास कुठेच दिसत नाही. केवळ कॅमेरे बसविण्यावरच करण्यात आलेला 300 कोटींचा खर्च हा तर आतापर्यंतचा सर्वात मोठा घोटाळा असल्याचा आरोप करण्यास वाव आहे, असेही मडकईकर म्हणाले. दुऊस्तीच्या नावाखाली खोदकामे केल्यामुळे तर सुस्थितीतील रस्त्यांचीही वाताहत करण्यात आली आहे. ‘गणेश चतुर्थीपूर्वी खड्डे दुऊस्त करण्याची घोषणा करण्यात आली होती, मात्र काहीच झाले नाही. हे सरकार केवळ जनतेलाच नव्हे तर न्यायालयाला मूर्ख बनवत आहे. ते न्यायालयाला घाबरत नाहीत आणि जनतेलाही घाबरत नाही, असे मडकईकर यांनी सांगितले.