For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

धोका जीबीएसचा की पाण्याचा?

06:23 AM Feb 16, 2025 IST | Tarun Bharat Portal
धोका जीबीएसचा की पाण्याचा
Advertisement

दूषित पाण्याचा प्रश्न ऐरणीवर

Advertisement

दहा ते पंधरा वर्षांपूर्वी ‘स्वाईन फ्लू’ने कहर केल्याने पुण्यात तीन दिवस संचारबंदी लागू करण्याची वेळ प्रशासनावर आली होती. 2020 मध्ये कोरोनाचा पहिला ऊग्णही पुण्यातच आढळला होता. त्यानंतर ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात जीबीएसनेही पुण्यातच सर्वप्रथम एन्ट्री केली आहे. पुणे, पिंपरी-चिंचवड शहरासह जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मागच्या काही दिवसांपासून ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ या नव्या विषाणूचे ऊग्ण आढळून येत आहेत. जिल्ह्यातील या आजाराच्या ऊग्णांची संख्या जवळपास 200 वर पोहोचली असून, आत्तापर्यंत आठ जणांचा या आजाराने मृत्यू झाल्याचेही समोर आले आहे. असे असले, तरी 109 जण खडबडीत बरे झाले असून, त्यांना घरीही सोडण्यात आल्याचे दिसून येते. किंबहुना, या आजाराला प्रामुख्याने अशुद्ध पाणी कारणीभूत असल्याचे स्पष्ट झाले असून, यातून पाण्याच्या शुद्धतेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आल्याचे पहायला मिळते.

महाराष्ट्राची सांस्कृतिक आणि शैक्षणिक राजधानी ही पुण्याची एकेकाळची मुख्य ओळख. पेन्शनरांचे शहर असाही पुण्याचा लौकिक होता. त्यामुळे निवृत्तीनंतर शांत, निवांत आणि चांगली हवा-पाणी असलेल्या पुण्यामध्ये स्थायिक होण्याकडे अनेकांचा कल असे. मात्र, मागच्या काही वर्षांमध्ये पुण्यातील हवा-पाण्याचा दर्जा कमालीचा खालावल्याचे दिसून येते. आजवर पुण्यातील हवा प्रदूषणावर बोलले जात असे. तथापि, पुण्यातील भूजल आणि एकूण पाण्याची गुणवत्ता ढासळल्यावर जीबीएसच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाल्याचे दिसते. पुण्यात प्रामुख्याने सिंहगड रोड व खडकवासला परिसरात या आजाराचे ऊग्ण आढळले आहेत. याला तेथील विहिरींतील खराब पाणी तसेच टँकरच्या माध्यमातून पुरविण्यात येणारे पाणी कारणीभूत असल्याचे पुढे आले आहे.

Advertisement

‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ अर्थात जीबीएस हा तसा काही नवा व्हायरस नाही. तो जुनाच आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार, ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ हा एक न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर आहे. हा आजार श्वसन किंवा पंचनसंस्थेच्या संसर्गानंतर होतो. यामध्ये शरीरातील रोगप्रतिकारशक्ती स्वत:च्याच मज्जातंतूवर हल्ला करू लागते. यामुळे स्नायूंमध्ये कमकुवतपणा येतो. स्नायू सुन्न पडतात. त्यात वेदनाही होतात. या आजारात कधी-कधी अर्धांगवायूचा झटका येण्याचीही शक्मयता असते. या आजाराचा फैलाव वेगाने होत असला तरी ऊग्ण लवकर बरेदेखील होतात. मात्र, रुग्णांना बरे होण्यासाठी लागणारा वेळ वेगवेगळा असू शकतो.

पेरू देशामध्ये विषाणूचा उच्छाद

‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ विषाणूने पेरू देशात मधल्या काळात उच्छाद मांडला होता.  तेथे आरोग्य आणीबाणीही घोषित करण्यात आली होती. त्यानंतर अन्य काही देशांतही या आजाराचे ऊग्ण आढळून आल्याचे सांगण्यात येते. तसा हा आजार कुणालाही होऊ शकतो. विशेषत: 12 ते 30 वयोगटातील लोकांमध्ये याचे प्रमाण जास्त दिसून येत असल्याचे म्हटले जाते. पुण्यातील एकूणच ऊग्णांचा विचार करता 20 ते 29 या वयोगटात सर्वाधिक 44 रुग्ण आढळले आहेत. मात्र, वयस्कर व्यक्तींनाही या आजाराची लागण होत असल्याचे आढळून येते. असे असले तरी 60 हून अधिक वय असलेल्या रुग्णांची संख्या 25 ते 30 पर्यंत मर्यादित असल्याचे दिसते. हा आजार धोकादायक नाही. त्यामुळे घाबरून जाऊ नये. काळजी घ्यावी, असे आवाहन वैद्यकीय तज्ञांनी केले आहे.

आजार संसर्गजन्य नाही

एखादा नवा व्हायरस आला, की लोकांमध्ये घबराट पसरते. विशेषत: कोरोनानंतर लोकांच्या मनात एक प्रकारची भीती बसली आहे. जीबीएचे ऊग्ण सापडू लागल्यानंतरही पुण्यात सुऊवातीला अशीच भीती पहायला मिळाली. मात्र, या आजाराची वैशिष्ट्यो समोर आल्यानंतर लोक सजग झाले आहेत. मुख्य म्हणजे हा काही संसर्गजन्य आजार नाही. तो एकाच्या संपर्कातून दुसऱ्याला होत नाही. अशुद्ध पाणी, हेच या आजाराला कारणीभूत ठरते. यासाठी वेगळी ट्रीटमेंट घ्यावी लागत नाही. नेहमीचे उपचार पुरेसे आहेत. तसेच आजार लवकर बरा होतो, असे वैद्यकीय तज्ञांनी म्हटले आहे.

आरओचे पाणीही अस्वच्छच

खरंतर आरओचे पाणी स्वच्छ मानले जाते. त्यामुळे प्रवासात, हॉटेलमध्ये लोक आरओला प्राधान्य देतात. परंतु, हे पाणीही सुरक्षित नसल्याची माहिती पुढे आली आहे. या पार्श्वभूमीवर दूषित पाणी आढळलेल्या आरओ प्रकल्पांना टाळे ठोकण्यात आले आहे. याशिवाय खासगी टँकर भरणा केंद्रे, खासगी विहिरी अशा आणखी काही ठिकाणचे नमुने पाणीपुरवठा विभागाकडून घेण्यात आले आहेत. त्यात अनेक भागांतील पाणी पिण्यायोग्य नसल्याचे आढळून आले आहे.

उकळलेले पाणीच स्वच्छ

पुणे महापालिकेतर्फे खबरदारीचा उपाय म्हणून शहरातील पाण्याच्या लहान मोठ्या मिळून सुमारे साडेतीनशे टाक्या पुढील महिनाभरात धुण्यात येणार आहेत. जीबीएसचे प्रमुख कारण हे दूषित पाणी हेच असल्याचे राष्ट्रीय विषाणू विज्ञान प्रयोगशाळा अर्थात एनआयव्हीने स्पष्ट केले आहे. त्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून या पाण्याच्या टाक्या स्वच्छ करण्यात येणार आहेत. रोजचा पाणीपुरवठा करताना पाण्याच्या टाक्या स्वच्छ करताना अडचणी येतात. पाणीपुरठा विस्कळीत झाल्याच्या नागरिकांच्या तक्रारी येतात. त्यामुळे विशेष मोहीम आखून टाक्या स्वच्छ करण्यात येत आहेत. शहरातील मोठा भाग पाण्यासाठी पर्वती जलकेंद्रावर अवलंबून आहे. तेथून शहराच्या विविध भागांतील टाक्यांना पाणीपुरवठा होतो. त्यामुळे तेथून टाक्यांचा पाणीपुरवठा टप्प्याटप्प्याने बंद ठेवला जाईल. त्यामुळे नागरिकांना त्रास होणार नाही, असे पालिकेने म्हटले आहे

भूजलही प्रदूषित

‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’च्या पार्श्वभूमीवर विंधन विहिरींचेही सर्वेक्षण केले जात असून, यात बोअरवेलचे पाणीही दूषित असल्याची माहिती पुढे आली आहे. त्यामुळे शहरातील विहिरी आणि विंधन विहिरींच्या गुणवत्तेच्या दर्जाबाबत साशंकता व्यक्त करण्यात येत आहे. मुख्य म्हणजे पुण्यातील भूजलात पूर्वीपासून क्षाराचे प्रमाण अधिक असल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. त्यात मैलापाणी, सांडपाण्याच्या भूमिगत वाहिन्यांमधून मोठ्या प्रमाणात गळती होते. हे पाणी तसेच पावसाळ्यातही आता भूगर्भात प्रदुषित पाणी मुरते. हेच प्रदुषित पाणी भूजलात मुरते. हे पाणी पिण्यास योग्य नाहीच. मात्र, ते वापरण्यासही योग्य नसल्याचे दिसते. त्यातूनच त्वचेचे, पोटाचे तसेच इतर आजार वाढत आहेत. आता जीबीएसचा फैलाव लक्षात घेता बोअरवेलचे पाणी पिण्यासाठी धोकादायक असल्याचे दिसून येते.

जीबीएस नियंत्रणात, पण....

महिन्यानंतरही जीबीएस रुग्ण अद्याप आढळून येत असले, तरी ऊग्ण आढण्याचे प्रमाण मागच्या काही दिवसांत काहीसे कमी झाले आहे. हे बघता जीबीएस नियंत्रणात असल्याचे मानले जाते. सध्या दैनंदिन 5 ते 7 रुग्ण आढळत आहेत. रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण समाविष्ट गावांमध्ये आहे. शहरात नव्याने समाविष्ट झालेल्या गावातील ऊग्ण 90 ते 100, पुण्यातील 35 ते 40, तर पिंपरी चिंचवडमधील 30 ते 35, तर पुणे ग्रामीणमधील 25 च्या आसपास ऊग्ण आहेत. अर्थात हा आजार नियंत्रणात ठेवण्यात यंत्रणा यश येत असले, तरी त्यावर पूर्णपणे मात करण्यासाठी स्वच्छ पाण्याबरोबरच नागरिक आणि प्रशासनाने जागरूकतेचा मंत्र जपणे आवश्यक होय. त्यादृष्टीने स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि पाणी उकळून आणि गाळून पिणे या दोन्हीकडे लक्ष देणे आवश्यक असेल.

सांडपाणी गळती रोखण्याची गरज

पाणी म्हणजे जीवन असे आपण म्हणतो. पाणी ही माणसाची मूलभूत गरज आहे. मात्र, हे पाणी स्वच्छ व शुद्ध असणे अपेक्षित होय. मात्र, मागच्या काही वर्षांत पाण्याच्या गुणवत्तेचा आलेख झपाट्याने घसरला आहे. महानगरे असोत, शहरे असोत वा गावे. त्या भागातील नद्या, नैसर्गिक प्रवाह, तलाव, नाले प्रचंड प्रदुषित झाले आहेत. अनेक नद्यांनाही गटारगंगेचे स्वऊप प्राप्त झाले आहे. पुण्यासारख्या महानगराचा विचार केला, तर मुळा, मुठा या नद्यांचे अवस्था अतिशय दयनीय झाल्याचे दिसून येते. या नद्यांच्या जवळून जातानाही नाक दाबून जावे लागते. नद्यांचे आरोग्य बिघडल्याने शहराचे आरोग्यही धोक्यात आले असून, जीबीएससारख्या आजारांमुळे पाण्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असल्याचेच अधोरेखित होते.

पर्यावरणाच्या प्रश्नावर आपल्याकडे सातत्याने चर्चा होत असते. झाडे, पशूपक्षी, डोंगर, नद्या, झरे, हवा यांसह निसर्गाशी संबंधित सर्वच घटकांचा पर्यावरणामध्ये समावेश होतो. हेच घटक पर्यावरणाची साखळी अबाधित राखण्यास मदत करतात. यातल्या एका घटकाला धक्का लागला, तरी ही साखळी तुटण्याची शक्यता असते.   तथापि, त्याबाबत नागरिक, सरकार, कारखाने यांच्यासह कुणीच सजगता बाळगताना दिसत नाही. त्यामुळे दिवसेंदिवस प्रदूषणात भर पडत आहे. मात्र, हवा, पाणी, ध्वनी अशा सर्वच प्रदूषणाचा धोका लक्षात घेऊन वेळीच पावले उचलली गेली, तर भविष्यात वेगवेगळ्या साथीच्या आजारांपासून आपल्याला दूर राहता येऊ शकेल. जीबीएसने हाच धडा दिला आहे. त्यामुळे आता तरी आपण जागे व्हायला हवे.

काय आहे ‘गुईलेन बॅरे सिंड्रोम’ विषाणू?

- जीबीएस नसांवर परिणाम करणारा आजार. यात स्नायू कमकुवत होतात.

- स्नायू कमकुवत झाल्याने वेदना होतात. संवेदना कमी होतात.

- चेहरा, डोळे, छाती शरीरातील स्नायूंवर परिणाम होतो.

- तात्पुरता अर्धांगवायू तसेच श्वसनासही त्रास होतो.

- हाताची बोटे तसेच पायामध्ये वेदना होतात.

- चालताना त्रास आणि चिडचिडही होते.

 काय घ्यावी काळजी...

पाणी उकळून व गाळून प्यावे

शिजवलेले व ताजे अन्न खावे

वैयक्तिक स्वच्छतेवर भर द्यावा

बोअरवेल वा तत्सम पाण्याची तपासणी करावी

संकलन - प्रशांत चव्हाण, पुणे

Advertisement
Tags :

.