कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

महायुतीतील कुरघोडीमुळे युती धोक्यात?

06:08 AM Nov 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांनी राजकीय वातावरण चांगलेच तापवले आहे. पंचायत समिती, नगरपरिषदा, महानगरपालिका या सर्व ठिकाणी आता पक्षनिहाय गणिते आखली जात आहेत. ज्या जिह्यात ज्या पक्षाचे वर्चस्व आहे, तो पक्ष त्या जिह्यात स्वबळाची भाषा करू लागला आहे. मात्र स्वबळाच्या इशाऱ्याचा परिणाम हा महायुतीवर होताना दिसत आहे. भाजपसोबत अजित पवारांची राष्ट्रवादी आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना ही सत्तेत असलेली महायुती, पण स्थानिक पातळीवर या तीन पक्षातच आता उघड उघड संघर्ष होताना दिसत आहे. 

Advertisement

पुण्यात मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात शिवसेनेचे रवींद्र धंगेकर, ठाण्यात एकनाथ शिंदे यांच्या विरोधात भाजपचे गणेश नाईक, संजय केळकर यांच्यानंतर शिवसेनेचा बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या कोकणात भाजपने स्वबळाचा नारा दिला आहे. भाजपच्या स्वबळाच्या इशाऱ्यानंतर ठाकरे आणि शिंदे यांच्या दोन्ही शिवसेना एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली होती. याबाबत स्वत: नारायण राणे यांना येऊन भूमिका मांडावी लागली. कोकणाप्रमाणेच ठाणे, कल्याण, नवी मुंबई आणि पुण्यात ही भाजपची भूमिका ही स्वबळाची असल्याने येथे महायुतीतील मित्रपक्षांची कोंडी होताना दिसत आहे. महायुतीत भाजप हा दिवसेंदिवस अधिकच प्रभावी पक्ष होत असल्याने शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी अजित पवार गटातून आता भाजपात पक्षांतर होण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे आगामी काळत महायुती राहणार की फुटणार हे बघणे महत्त्वाचे ठरणार आहे.

Advertisement

महाराष्ट्रात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीची घोषणा झाल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा सत्तासंघर्ष तीव्र होताना दिसत आहे. महायुतीत असणाऱ्या भाजपकडून आपल्या दोन प्रमुख मित्र पक्षांवरच एकनाथ शिंदे गट आणि अजित पवार गटावर टप्प्याटप्प्याने राजकीय कुरघोडी केली जात असल्याचे दिसत आहे. भाजपकडून अनेक ठिकाणी स्थानिक नेत्यांकडून स्वबळाची भाषा केली जात आहे, तर दुसरीकडे ऑपरेशन लोटस मोहीमेला पुन्हा सुरूवात झाली आहे. त्यामुळे महायुतीतील एकनाथ शिंदे आणि अजित पवार या दोन प्रमुख नेत्यांची अस्वस्थता वाढली आहे. ठाण्यात गणेश नाईक आणि संजय केळकर यांच्याकडे जबाबदारी सोपवून भाजपने एकनाथ शिंदेंच्या बालेकिल्ल्यातच पाय रोवण्याची तयारी केली आहे. दुसरीकडे, पुण्यात आणि पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार यांच्या गडातही भाजप स्वतंत्र उमेदवारी देत आपली ताकद आजमावत आहे. भाजपकडून चाललेल्या या राजकीय खेळीमुळे मित्रपक्षांना स्पष्ट संदेश दिला जात आहे की, “सत्ता हवी, पण आधारावर नाही तर स्वबळावर !”

सिंधुदुर्ग हा पेंद्रीय मंत्री नारायण राणे यांचा बालेकिल्ला मानला जातो. राणे भाजपात गेल्यानंतर हा जिल्हा भाजपमय झाला, मात्र भाजपने येथे स्वबळाची भाषा केल्यानंतर येथे भाजपला दूर ठेवण्यासाठी दोन्ही शिवसेना गटांची एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली, या चर्चेनंतर नारायण राणे संतापले असून त्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. “ज्यांनी एकमेकांवर आरोप केले, ते आता सत्तेसाठी हातमिळवणी करत आहेत,” अशी टीका त्यांनी केली.राजकीय निरीक्षकांच्या मते, ही केवळ स्थानिक पातळीवरील हालचाल नाही, तर राज्यात भाजपविऊद्ध मनोमिलन पॅटर्नच्या नावावर पुन्हा एकत्र येण्याची चाचपणी सुरू असल्याचे संकेत आहेत. शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये “एकच सेना” ही भावना वाढत आहे, आणि याचा परिणाम भविष्यातील महाराष्ट्राच्या राजकारणावर होऊ शकतो. एकीकडे सिंधुदुर्गात दोन्ही शिवसेना एकत्र येत असल्याची चर्चा होत असताना, तिकडे कोल्हापूरातील चंदगड नगरपंचायत आणि जिल्हा परिषद निवडणुकांसाठी दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे मनोमिलन झालं आहे. चंदगडमधील कुपेकर गट आणि राजेश पाटील यांना हसन मुश्रीफ यांनी एकत्र आणल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. चंदगडमध्ये संयुक्त पत्रकार परिषद घेत याबाबत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीत फुट पडल्यानंतर लोकसभा आणि विधानसभा निवडणुका शिवसेना व राष्ट्रवादीने महायुतीत भाजपसोबत एकत्र लढवल्या, या दोन्ही पक्षाला भाजपने शरद पवार व उध्दव ठाकरेंच्या विरोधात बळ दिले, मात्र या दोन पक्षांचा भाजपला फायदा होण्यापेक्षा भाजपचाच फायदा या दोन पक्षाला अधिक झाल्याची भूमिका भाजपची अ्राहे.

राष्ट्रवादीचे प्रमुख अजित पवार यांच्या मुलावरच जमीन घोटाळ्याचा आरोप करण्यात आल्यानंतर राष्ट्रवादी बॅकफुटला गेल्याचे दिसत आहे. अजित दादांची बार्गेनिंग पॉवरच या प्रकरणानंतर कमी झाली आहे, त्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील या प्रकरणात चांगलेच अॅक्टीव्ह झाल्याने राष्ट्रवादीतील इच्छुक आणि उत्सुकांनी भाजपची वाट धरण्याची भूमिका घेतली आहे. तिकडे ठाकरे गटातील कल्याण जिल्हाप्रमुख दिपेश म्हात्रे यांनी ठाकरे गटाला जय महाराष्ट्र करत भाजपात प्रवेश केला आहे. म्हात्रे यांची कल्याण आणि डोंबिवली या भागात चांगली ताकद आहे, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे स्वत: या भागातील आहेत, तर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे हे कल्याणचे स्थानिक खासदार आहेत. म्हात्रे यांच्या भाजपात जाण्याने कल्याणमध्ये श्रीकांत शिंदे यांच्यासमोरच आव्हान निर्माण केले आहे. कोकणात तर भाजप व शिवसेना शिंदे गटात रोज एकमेकांना ताकद दाखवण्याची भाषा केली जात आहे. भाजपात येऊन अजुन एक महिना पण झाला नाही, तोच पूर्वश्रमीचे मनसे नेते वैभव खेडेकर यांनी आपली पत्नी वैभवी खेडेकर यांच्यासाठी खेड नगराध्यक्ष पदासाठीच दावा केला आहे, त्यामुळे राज्यात महायुतीत ठिकठिकाणी असा बेबनाव झाल्याचे बघायला मिळत आहे. राज्यातील युती-आघाड्यांपुढे सध्या “एकत्र राहूनही स्पर्धा” अशी विचित्र परिस्थिती आहे. प्रत्येक पक्षाला सत्ता हवी, पण भागीदारी नको. भाजपला कोणत्याही कुबड्यांशिवाय आपला विस्तार वाढवायचा आहे, तर शिंदे गटाला आपली वेगळी ओळख टिकवायची आहे. अजित पवारांना प्रशासनावर आपली पकड मजबूत करायची आहे.

मात्र भाजपशिवाय हे करणे पवार आणि शिंदेना अशक्य आहे. शरद पवार व उध्दव ठाकरे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये जागा वाटपावरून मतभेद आहेत. मात्र या सगळ्या घडामोडींचा परिणाम बघता “युती बदलली तरी नेते तेच” राहणार असल्याचे चित्र दिसत आहे. राज्याच्या महत्त्वाच्या नेत्यांच्या राजकीय भवितव्याचा कस लावणाऱ्या मुंबई, ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पिंपरी-चिंचवड व पुणे महापालिका निवडणुकांसाठी प्रभाग आरक्षण सोडत आज जाहीर होणार आहे, या सोडतीनंतर पक्षांतराचा नवा हंगाम सुरू होईल. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण हेच पक्षांतराचे कारण ठरते, पक्षनिष्ठा, राजकीय त्याग, पक्षाची शिकवण, शिस्त वैगेरे या गोष्टींना राजकारणात किती महत्त्व असते हे येणाऱ्या दिवसात कळेलच.

प्रवीण काळे

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article