मोहम्मद युनुस राजीनाम्याच्या तयारीत ?
बांगलादेशच्या लष्कर प्रमुखांसमवेत वाद भोवणार
वृत्तसंस्था/ढाका
बांगलादेशच्या अंतरिम सरकारचे प्रमुख सल्लागार मोहम्मद युनुस हे राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्या देशाच्या लष्कर प्रमुखांशी त्यांचे निवडणूक घेण्यावरून मतभेद झाले आहेत. युनूस हे बांगलादेशचे अप्रत्यक्ष प्रमुख प्रशासक म्हणून ओळखले जातात. त्यांनी राजीनामा दिल्यास आधीच घसरणीला लागलेला हा देश अधिकच गाळात जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तर काही तज्ञांनी त्यांचा राजीनामा बांगलादेशात पुन्हा लोकशाहीची स्थापना होण्यासाठी अनुकूल ठरेल, असेही मत व्यक्त केले आहे.
बांगलादेशमध्ये सार्वत्रिक निवडणूक येत्या नोव्हेंबर किंवा डिसेंबरमध्ये व्हावी, अशी त्या देशाच्या लष्कर प्रमुखांची इच्छा आहे. त्यांनी तसा आग्रह युनूस यांच्याकडे धरला आहे. मात्र, निवडणूक घेण्यापूर्वी युनूस बांगलादेशात काही सुधारणा करू इच्छितात. आपल्या सुधारणा कार्यक्रमाला लोकांचा पाठिंबा असून लोक या सुधारणांची प्रतीक्षा करीत आहेत. या सुधारणा झाल्यानंतरच बांगलादेशात निवडणूक घेतली जावी, असे युनूस यांच्या विद्यार्थी संघटनेचे मत आहे.
युनूस यांची नाराजी
बांगलादेशातील लष्करी यंत्रणा आपल्याला काम करू देत नाही. आपल्या सुधारणा कार्यक्रमात सातत्याने अडथळा आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मला जे कार्य करण्यासाठी बांगलादेशच्या अंतरिम सरकारचा प्रमुख सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले आहे, ते काम जर मला करू दिले नाही, तर मी पदावर राहून काहीही उपयोग होणार नाही, असे युनूस यांचे म्हणणे आहे. हे म्हणणे त्यांनी आपल्या विद्यार्थी संघटनेचा नेता नहीद इस्लाम याच्याकडे बोलून दाखविल्याची माहिती आहे. याच विद्यार्थी संघटनेने बांगलादेशात सत्तांतर घडवून आणले होते आणि शेख हसीना यांना पदच्युत करण्यासाठी आंदोलन केले होते.
राजकीय पक्षांची मागणी
बांगलादेश नॅशनॅलिस्ट पक्षाच्या नेत्या खलिदा झिया यांनी देशात येत्या डिसेंबरमध्ये निवडणूक व्हावी, असा आग्रह धरला आहे. या पक्षाला बांगलादेशात मोठे समर्थन आहे. सुधारणांच्या नावाखाली अंतरिम सरकार आपल्या हाती जास्तीत जास्त काळ सत्ता ठेवू इच्छित आहे. पण आम्हाला त्वरित निवडणुका हव्या आहेत, असे या पक्षाचे म्हणणे आहे. या पक्षाच्या या मागणीला पाकिस्तानचे लष्कर प्रमुख वाकर उझ झमान यांनी पाठिंबा दिल्याने खलिदा झिया यांची बाजू भक्कम झाली आहे. त्यामुळे युनूस यांची कोंडी झाल्याचे दिसून येते. शेख हसीना यांच्या अवामी लीग या पक्षाची मान्यता काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे हा पक्ष निवडणुकीत सहभागी होऊ शकणार नाही. तथापि, या पक्षाचे नेते अपक्ष म्हणून सहभागी होऊ शकतात, किंवा ते आपला वेगळा पक्ष स्थापन करु शकतात, अशी स्थिती आहे.