संगणक आहे की स्टोव्ह?
सीपीयूवर बनवला ‘आलू पराठा’
आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्यासाठी लोक कोणत्याही पातळीवर जायला तयार असतात. कोणीतरी-काहीतरी वेगळे आणि अनोखे काम करत ‘भाव’ मारून जातात. असाच प्रकार एका व्यक्तीच्या बाबतीत नुकताच घडला असून एका व्यक्तीने प्रसिद्धीसाठी आलू का पराठा (बटाटा पराठा) स्टोव्हवर नाही तर आपल्या संगणकाच्या ‘सीपीयू’वर बनवला. त्याला हा प्रयोग करताना पाहून लोकांनाही आश्चर्य वाटते. यासंबंधीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
कॉम्प्युटरसाठी वापरला जाणाऱ्या सीपीयूला (सेंट्रल प्रोसेसिंग युनिट) संगणकाचा ‘मेंदू’ मानला जातो. त्याच्या कमांडनुसारच सर्व प्रक्रिया घडत असतात. ‘सीपीयू’च्या आत मदरबोर्ड असतो. या मदरबोर्डचा आधार घेत एका व्यक्तीने आलू पराठा बनवल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येत आहे. सीपीयू चालू केल्यावर त्याचा मदरबोर्ड गरम होऊ लागतो. याच उष्णतेचा फायदा घेत एका व्यक्तीने त्यावर पराठा बनवण्याचा निर्णय घेतला.
यापूर्वी त्याने एक व्हिडिओ पोस्ट केला होता त्यामध्ये त्याने ऑम्लेट बनवले होते. आता तो शाकाहारी लोकांना लक्षात घेऊन बटाट्याचा पराठा बनवताना दिसत आहे. तो प्रथम सीपीयू चालू करतो. ते गरम झाल्यावर त्यावर तेल लावले जाते. मग तो खूप छोटा पराठा बनवून सीपीयूवर ठेवतो. तो इतका गरम होतो की बटाट्याचा पराठा आपोआप शिजतो. त्यानंतर हे कोणत्या प्रकारच्या सीपीयूवर करता येईल हेदेखील तो सांगतो. कोणीही लॅपटॉपवर असे प्रकार करण्याचा प्रयत्न करू नये, असा सल्ला त्याने दिला आहे.
या विचित्र व्हिडिओला 41 लाख व्ह्यूज मिळाले आहेत तर अनेकांनी कमेंट करून आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका कमेंटमध्ये, ‘भाऊ, पुढच्या वेळी मोमो बनवा!’ अशी प्रतिक्रिया दिली. तर दुसऱ्या एकट्याने पुढच्या वेळी चहा बनवायला सांगितले. स्विगीच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटनेही यावर प्रतिक्रिया दिली आहे. ‘हे आईने बनवलेले अन्न नाही, हे मदरबोर्डवर तयार केलेले अन्न आहे’ असे त्यांनी लिहिले आहे.